साधारण २००८-२००९ चा काळ. आयटी क्षेत्रात नेटवर्क मार्केटींग कंपन्यांचे सॉफ्टवेअर आणि पॉवर सेव्हर मधे चांगला व्यवसाय करून एकूणच व्यवसाईक आणि आर्थिक परीस्थिती चांगली होती. माझाकडे स्कोडा होती. एक छोटा मॅन्यूफॅक्चरींग सेटप होता. इ. इ.
अशा काळात माझाकडे विवीध प्रकारचे प्रॉडक्ट किंवा संकल्पना येत असत. आणि ह्या दरम्यान एक ऑरगॅनिक ग्रोथ प्रोमोटर प्रॉडक्टने माझे लक्ष वेधून घेतले. ह्या प्रॉडक्टच्या वापरामुळे शेतकऱ्याचे शेतीचे उत्पन्न १००% ऑरगॅनिक इनपुट वापरून “दुपटी पर्यंत” वाढवता येऊ शकते.. “Israel Based 4 Way Treatment” असे ह्याचे नाव आहे आणि भारत, केनया, नायजेरीया ह्या तिनही देशात अत्यंत सक्सेसफुल ट्रायल मी घेतल्या आहेत..
तर ह्या प्रॉडक्टवर काम करायला सुरूवात केली. आधी माझा बँकबॅलन्स संपवला. थोडे पैसे इकडून तिकडून ऊभे केले.. ह्या प्रॉडक्ट आणि कंसेप्टवर काम करायला सुरूवात केली तेव्हा पक्के ठरवले होते की जे लागेल ते सारे करायचे, पूर्ण ताकद आणि अनुभव पणाला लावायचा आणि ह्याला यशस्वी करायचे.. पण काही कंसेप्ट खूप डिमांडींग असतात. एकतर मला कृषी क्षेत्राची काहीच माहिती नव्हती. मी १०वी नंतर डिप्लोमा केल्याने बायोलॉजी, झुऑलॉजी वगैरै विषय लांबूनही माहीत नव्हते .. आणि उमेद बाळगली होती कृषी क्षेत्रातील प्रॉडक्ट घेऊन काम करायची…
इथे एक प्रेरणा मी तानाजी मालूसरेंच्या गोष्टीतून घेतली होती.. परतीचे दोर कापायचे.. मी माझा आयटी मधील व्यवसाय बंद केला. पॉवर सेव्हरचे युनिट बंद केले. हे प्रॉडक्ट डेव्हलप केले आणि पहिल्या बॅचसाठी, फिल्ड ट्रायल व इतर सर्व गोष्टींसाठी साधारण ४ लाख रुपये खर्च केले. माझासाठी तेव्हा ही मोठी रक्कम होती. पैसे संपले.. बॅच हवी तशी सरकत नव्हती.. आणि परतीचे दोर तर कापले होते.. नविन उत्पन्न काही नाही. तेव्हा RCM नावाची देशातील सर्वात मोठी नेटवर्क मार्केटींग कंपनी होती.. मी निर्धार केला की मी IB4WT हे प्रॉडक्ट RCM च्या माध्यमातून आणणार. त्यासाठी मला बरेच सेटअप करावे लागणार होते. साधारण २-३ लाख खर्च अपेक्षीत होता. आता कुठून पैसे आणणार?? तेव्हा एका लोकल छोट्या सहकारी बँकेच्या जनरल मॅनेजर बरोबर सेटप केला. तेव्हा मी एक मोठा झोल केला आणि बँकेत माझी गाडी मॉरगेज केली. बँकींग क्षेत्रात न घडणारी घटना आहे. गाडी कधी मॉरगेज होत नाही. पण माझी झाली. आणि मला तेव्हा बँकेने ६ लाख दिले..
मी प्रयत्न चालू केले. विवीध माध्यमातून लातूरमधे असलेल्या एका मोठ्या नेटवर्क लिडरला गाठले. त्याला विश्वासात घेऊन थेट RCM ला जायला निघालो. माझा बरोबर RCM च्या अध्यक्षांचे “रमेश जैन” नावाचे एक विश्वासू सहकारी होते. मी थेट भिलवाड्याला गेलो. प्रवास करत .. स्कोडाने.. बरोबर प्रेझेंटेशन्स, प्रॉडक्ट सँपल, टेस्टीमोनिअल्स.. बरेच काही.. आणि मनात प्रचंड जिद्द..
भिलवाड्याला RCM म्हणजे प्रचंड मोठा अजगर होता. दीड कोटी लोकांचे नेटवर्क असलेली प्रचंड मोठी कंपनी. जैन मला थेट चेअरमनकडे घेऊन गेले. मी महाराष्ट्रात नेटवर्क कंपन्यांमधे स्टार होतो. कधी कुठल्या कंपनीत मिटींगला मी वेटींग केले नाही. डायरेक्ट एंट्री होती.. इथे मला दीड तास रिसेप्शनला बसवले.. खूप राग आलेला.. पण करतो काय? चेअरमन त्रिलोकचंद छाबडा प्रचंड बिझी होते. कसेबसे जैन साहेबांनी त्यांची वेळ घेतली आणि आम्ही आत गेलो.. मोठ्ठे टेबल.. पलीकडे छाबडा साहेब.. चेहरा, वागणे सेम MDH मसाले वाल्या आजोबांसारखे.. मला पाहीले आणि पहीले वाक्य “सामंत, मुझे आपका प्रॉडक्ट नही चाहीये. मै ८०० प्रॉडक्ट खूद बनाता हूं.. मुझे दुसरे मॅन्यूफॅक्चरर के प्रॉडक्ट नही बेचने.” … झाले.. विषय संपला होता.. तरी जैन सरांनी विनंती केली की, इतक्या लांब आलोय ऐकून तर घ्या.. मग छाबडा साहेब बोलले, “५ मिनीट मे समझाऔ क्या चीज है?” .. जे प्रॉडक्ट मी इतक्या मेहनतीने गेले ४-६ महीने डेव्हलप करत होतो आणि इतके पैसे खर्च केलेले.. ते ५ मिनीटात काय घंटा सांगणार.. इतका वेळ तर मला लॅपटॉप चालू करून दोन स्लाईड दाखवायला लागला असता.. पण ही एकच संधी होती. डायरेक्ट चेअरमन माझा समोर होता.. मी एक वाक्य बोललो, “सर आपके पास भले ८०० प्रॉडक्ट है.. मगर जो मै ले आया हूं, वो नही है. और अगर एक मौका मुझे आप दे, तो मै वादा करता हूं की आपके गोडाऊनसे निकलने वाले एक हर ट्रकमे आधा माल मेरा होगा” .. त्रिलोकचंद छाबडा ते एक वाक्य आणि माझा डोळ्यातला निश्चय पाहून स्तब्ध झाले.. छद्मि हसले..
छाबडाजी : “ऐसा प्रॉडक्टही नही हो सकता…”
मी : “हो भी सकता है..”
छाबडाजी : “ठीक है बताऔ..”
मी : “५ मिनीटमे नही होगा..”
छाबडाजी : “ठीक है.. तुझे चाहीये जितना समय ले, और बता..”
अर्धे युद्ध जिंकलो होतो. जैन सरांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. लंच ब्रेकला जायच्या आधी निपटवायचे म्हणून चालू झालेले प्रेझेंटेशन पाऊण तास चालले. शेवटी छाबडा सरांनी लंचब्रेक घेतला आणि मला अर्ध्या तासात जेवून परत यायला सांगीतले..
जेवून परत एक तास प्रेझेंटेशन आणि प्रश्नोत्तरे चालली. माझा ६ महीन्यांचा सारा अभ्यास कामी येत होता. अनेक विषयांवर चर्चा चालू होती. शेवटचा विषय आला, ट्रायल.. छाबडांनी विचारले, “कितने प्रॉडक्ट दोगे ट्रायल के लिये? बिना ट्रायल तो प्रॉडक्ट लेंगे नही..” .. माझाकडे २५० प्रॉडक्ट पडले होते.. पण छाबडाजी बोलले इतक्याश्यात काही नाही होणार. १००० तरी प्रॉडक्ट ट्रायल ला हवे.. आणि जर ट्रायल सक्सेस झाली तर(च) ह्या ट्रायलचे देखील पैसे देऊ.. शिवाय नंतरची ऑर्डर…
माझा डोक्यात बँकबॅलन्स, गाडीची ओडी इ. कॅल्क्युलेशन चालूच.. पण परतीचे दोर कापलेले.. मी हिय्या केला आणि तयार झालो. त्याच दिवशी संध्याकाळी RCM ची पेपर ऑर्डर माझा हाती होती.. परत आलो.. सारे अंदाजपत्रक काढले. सेटप करण्यात सव्वालाख खर्च झाले होते. आणि एक १००० ची बॅच बनवायला साधारण साडेतीन लाख खर्च होता. हे करून माझाकडे लाखभरापेक्षा थोडे जास्त पैसे उरणार होते.. सटासट सूत्र फिरवायला सुरूवात केली आणि हजार प्रॉडक्टची बॅच RCM ला गेली. तो पावसाळा होता.. UP, MP, Bihar, Gujrath मधे मुख्यत्वे सँपले गेले. थोडे महाराष्ट्रात आले. RCM ने सांगीतले तुमचे प्रॉडक्ट आहे, तुम्ही सपोर्ट करा.. ट्रेनिंग करा, कँप भरवा.. माझी गंगाजळी धडाधड संपत होती..
त्यात ओडीचे हफ्ते.. मानसून संपेस्तोवर सारे पैसे संपले.. बँकेत १०-१२ हजार.. बँकेचा हफ्ता ड्यू.. नाहीतर स्कोडापण उचलणार.. शिवाय ते प्रकरण माझा आणि त्या बँक मॅनेजरच्या दोघांच्याही अंगावर येणार होते.. ह्या नादात मी गेले ९ महीने सॉफ्टवेअर मार्केट पासून दूर गेलेलो. त्यामुळे तिथे सारे प्रतिस्पर्धी माझे अनेक योजने पुढे गेलेले.. तिथे रिएंट्री म्हणजे दीव्यच.. ह्या खेळात मी सरळ ७-८ वर्षे मागे फेकला गेलो होतो.. सारे संपल्यात जमा आणि पुन्हा शून्यातून सुरूवात..
दरम्यान शैतकऱ्यांचे फोन येत होते. अनेक फोन चांगले रिझल्ट आल्याचे होते. किमान ८०-९० महाराष्ट्र गुजराथच्या शेतकर्यांचे माझाकडे पॉझीटीव्ह रिझल्ट होते.. तीच एक शेवटची आशा… अशात मी एकदा छाबडांना फोन केला.. “विनयभाई.. प्रॉडक्टमे दम नाही है! कुछ पॉझीटिव्ह रिस्पॉन्स नही..” … संपली आशा.. मी सुन्न.. माझातले मार्केटींग, आशावाद, हिरीरी .. सारे स्तब्ध.. मी म्हटले, “ठीक है सरजी.. मेरेपास कुछ अच्छे फीडबॅक है.. मगर आप कह रहे है तो सही होगा..” … इतक्यात समोरून आवाज “अरे एक काम करो.. भिलवारा आ जाओ… बैठके बात करेंगे..” आणि फोन कट..
मी रात्रभर जागून काढली. एकीकडे म्हणतोय रिझल्ट नाही. मग बोलावता कशाला? मग विचार केला, काहीतरी करून सँपलचे थोडे पैसे मिळतात का तरी पाहू.. काहीतरी आशा आहे का पाहू.. महाराष्ट्रात तर चांगले फीडबॅक आहेत.. अजून एक ट्रायल मागता येईल का.. पण पैसे कुठून आणणार अजून एका बॅच चे? आशा आणि निराशाचा खेळ रात्रभर चालू होता.
सकाळी चेक केले, जयपूर एअर तिकीट होते ६५०० आणि पुढे जायचा खर्च होता २००० .. बँकेत तितकेच पैसे होते.. थोडे जास्त.. एक क्रेडीट कार्ड बाकी होते.. वापरले आणि तिकीट काढले. बँकेतल्या पैशाला हात लावला नाही..
छाबडाजींकडे पोचलो.. माझातला आशावाद टॉप गिअरमधे.. काय काय साईन्स मिळतात पॉझीटिव्ह ते शोधत होतो.. दोन साळूंख्या दिसतात का.. भारद्वाज दिसतो का.. एखाद्या देवळात दिवा तेवताना दिसतो का.. आशावाद जाम जबर असतो ना आपला.. एक फरक पडला होता.. मला थेट जेवायला स्वत:बरोबर घेतले.. जेवायला बसताना चर्चा चालू होती.. जेवून उठताना साहेव बोलले, “अच्छा है तेरा प्रॉडक्ट… काम करेंगे..” मला ते जेवण सर्वात गोड लागले! मग थोडा भाव तोल.. किंमत किती कमी होऊ शकते.. असे बरेच झाले आणि मला त्या दिवशी ५००० प्रॉडक्टची ऑर्डर… विथ ऍडवान्स द्यायचे त्यांनी कबूल केले. शिवाय सँपलचे देखील पैसे मिळणार होते.. एका प्रॉडक्टमागे माझे साधारण १५०/- चे मार्जीन होते.. ह्या एका ऑर्डमधे माझी गाडी back on track! खूप खूष झालो.. परत येताना विमानाचे तिकीट काढले.. आधी ट्रेनने स्लिपर क्लासला तरी येता येईल का खात्री नव्हती.. ते परत प्लेनचे तिकीट.. हिंमतच वाढली होती ना…
मुंबई एअरपोर्टला उतरलो.. विमानात फोन बंद होता.. लँडींगनंतर चालू झाला. छाबडांचे २ मिसकॉल्स.. छातीत धस्स झाले.. परत डोळे सारे साईन्स शोधू लागले.. काहीतरी पॉझिटिव्ह मिळतेय का?? फोन वाजला.. TC Calling .. प्रचंड हिम्मत करून फोन कानाला लावला… “विनयजी… अपनी बात हुईथी ५००० प्रॉडक्टके ऑर्डरकी… वो जरा…” माझे डोके सुन्न झाले होते.. जमीन सरकत होती… पुढील शब्द माझा कानात लाव्ह्यासारखे घुसणार होते.. ऑर्डर कँसल झाली होती… आणि मी हताश .. “वो ऑर्डर रिव्हाइज करो.. १५००० कर लो.. मै मेल करवाता हूं.. ऍडवान्स आज आपके अकाऊंटमे आजायेगा.. पहीली डिलीव्हरी २० दिनमे…. ” बाकी पुढे काय बोलले ते अजूनही आठवत नाही… सारे बदलले होते..
आदल्या दिवशी पूर्ण बँकरप्ट झालेलो होतो, तो परत पोझीशनमधे आलो होते.. त्या आठवड्यात ती ऑर्डर २५००० प्रॉडक्टची झाली आणि मी लखपती झालो होतो. त्या वर्षी आम्ही १ लाख ३० हजार प्रॉडक्ट RCM ला दिले.. गोडाऊनमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक ट्रकमधे अर्धा माला माझा होता…
universe conspires!