भिती!

मी तेव्हा लातूरला होतो.. २०००-२००३ दरम्यानचा काळ! तेव्हा स्थानिक वहातुकीसाठी लोक “वडाप” नावाची व्यवस्था वापरायचे. जीपसारखी गाडी व त्यात जमेल तितके लोक भरायचे. अतिशयोक्ती वाटेल पण विश्वास ठेवा एका वडापमधे २५-३० लोक भरून नेत असत. चारी दरवाजातून लोक लटकत जायचे. खूप भयानक होते ते दृष्य…

तर एकदा आम्ही एका साखर कारखान्यावर जात होतो, मी आणि माझा मित्र. बाइकवर होतो. तर मागून खूप वेगात एक वडाप आली आणि आम्हाला जोरात हॉर्न देत ओव्हरटेक करून गेली. माझा मित्राने सहाजीक शिवी घातली “मरशील ना.. ” … आणि केवळ ३-४ किमी पुढे त्या चालकाचा ताबा सुटला आणि जीप सरळ एका झाडात घुसली.. आम्ही पाठोपाठच होतो. आम्ही थांबलो, अजून २-३ गाड्या थांबल्या बाजूलाच वस्ती होती बहुतेक तिथली माणसे धावली..

खरे तर खूप उशीर झाला होता. गाडीतली पुढील बाकावर व मधल्या बाकावरील जवळजवळ सर्वच माणसे जागीच मेली होती. आणि जीप अर्धी झाडाच्या खोडात व अर्धी खड्डयात अडकून बंद पडली होती. मागील दरवाज्याने ७-८ लोकांना बाहेर काढले. पलीकडच्या बाजूने एक दोघांना काढले असेल. जीप अर्धी कलंडली असल्याने मदत करायला देखील अडचण येत होती. ह्याजीपमधे मधल्या बाकावर मधोमध एक लहान मुलगी होती, ६-७ वर्षे वय असेल. दोन्ही बाजूने २ माणसे व एकाच्या मांडीवर असावी. चमत्कारीक रित्या ती जिवंत होती. पण तीच्या कमरेपासून पायापर्यंत पुढली सिट पूर्णपणे तिच्या अंगावर होती. तिला काढता येत नव्हते. सर्वात आश्चर्य म्हणजे तिची संवेदना गेली होती. तिला वेदनाच जाणवत नव्हती. फक्त रडत होती की “मला माझा बाबा हवाय. माझा बाबा कुठे.” .. तीच्या बाजूला बसलेला माणूस तिचा बाबा होता, जो मृत होता व हे आम्हाला सर्वांना कळत होते पण हे तिला सांगणे शक्य नव्हते..

आम्ही प्रयत्नात होतो की तिला बाहेर काढता यावे. पण जेव्हा जेव्हा आम्ही पुढील सिट किंवा बॉडीज मॅनेज करायचो तेव्हा तिच्या पोटावर खूप जोर यायचा व ती कळवळायची. गाडी तिरकी असल्याने खूपच अडचण येत होती. तेव्हा तिथे असलेली काही माणूस आणि मी ठरवले की गाडीत इतर लोक तशीपण मेलेली आहेत तर गाडी जी तिरकी आहे ती पाडायची आणि हिला बाहेर काढायची. गाडीला ह्या सर्वांनी दोरीने झाडावरून खेचून धरले व मी मागच्या दरवाज्यात चढलो. दोन डेडबॉडीजवर रेलून त्या मुलीला मी मिठीत घेतले आणि तिला माझा मानेला घट्ट पकडायला सांगीतले. तिने पकडले. मी ह्यांना सिग्नल दिला की ते गाडीला धक्का देऊन पाडणार होते. तेव्हा मला एक-दोन सेकंदाचा वेळ असणार की हीचे शरीर त्या सीट्सच्या सापडीतून सुटले की तिला खेचून गाडीतून बाहेर उडी मारायची..

मला ज्या क्षणी ग्रिप आली आणि मी आवाज दिला की पाडा गाडी म्हणून त्या क्षणी ती मुलगी मला म्हणाली “तू नक्की काय करतो आहेस ते तुला माहीत आहे का??” .. मला कळलेच नाही.. त्याक्षणी ती त्या सापडीतून सुटली होती आणि पूर्णपणे माझा मिठीत होती. मी पायावर जोर दिला आणि गाडीतून बाहेर उडी मारली.. आणि गाडीपण एका बाजूवर पडली..

आता मी माझा मिठीत पाहीले तर त्या मुलीच्या शरीराला कमरेखालचा भाग नव्हता. फक्त कातडी आणि पायाचा काही भाग लोंबकळत होता. ते दृष्यच इतके विचीत्र होते की मला भोवळ आली. ती मुलगी तर आधीच बेशुद्ध पडली होतीच. मी ४-५ मिनीटांनी शुद्धीवर आलो असेन तोवर तिला एका रिक्षात घालून जवळच्या हॉस्पिटलमधे नेले होते. ३ दिवसांनी ती मुलगी वारली. परत शुद्धीवर आलीच नाही. तिने मला बोललेले शब्द तिचे शेवटचे शब्द होते…

ती ६-७ वर्षाची मुलगी. आधी ७-८ मिनीटे बोलताना मला काका म्हणत होती, बाबांबा भेटायचे म्हणत होती. ती मला “तू” असे का म्हणाली आणि इतक्या छोट्या मुलीला हा प्रश्न मला विचारताना नक्की काय विचारायचे होते, की तिला तिच्या शरीराचे काय झालेय आणि पुढे काय वाढून ठेवलेय हे आधीच कळले होते? हे सारे अनुत्तरीत आहे. पण तो क्षण, तो प्रश्न आणि तो आवाज आजही क्लिअर लक्षात आहे..

Leave a Reply