You are currently viewing पैसे खर्चून आनंद!

पैसे खर्चून आनंद!

मनमुराद पैसे खर्च करण्यात खरेच खूप मजा आहे. आणि आपले आवडते माणूस जर अशा वेळीस बरोबर असेल तर विचारूच नका…

जेव्हा माझा बिझनेस यशस्वी होऊ लागला तेव्हा मी नविन स्कोडा घेतलेली आणि माझा गुरूंच्या दर्शनाला मी आणि आई बरेचदा गावी जात असू. महिन्या दोन महिन्यातून एकदा असे…

आई माझी साधी. टिपीकल शासकीय कर्मचारी. हॉटेलमधे गेले की डावीकडे पदार्थांची नावे पहाण्यापेक्षा उजवीकडे किमती आधी पहायच्या. आणि त्यातल्या त्यात कमी किमतीचे पदार्थ दिसले की डावीकडे त्याचे नाव पहायचे.. हे नेहमीचेच..

पण ह्या प्रवासात कंट्रोल माझाकडे असायचा. त्यामुळे मी तिला मेन्यूकार्डच दाखवायचो नाही. तुला आज काय खायचे आहे ते सांग म्हणून सांगायचो. पण ही जुनी खोडे लबाड असतात. सहज बधत नाही. मला डाल तडका रोटी मागव असेच बहुतेकवेळा म्हणायची. मग हळूहळू गळ्यात पडून हट्टाने थोडे दटावून काढून घेतले. तिला पनीर चे आयटम खूप आवडतात.. मला नाही आवडत 🙁 … मग गडबड व्हायची. अख्खी डिश तिला जायची नाही आणि माझी डिश वेगळी असायची. मग ह्या लोकांना पानात अन्न टाकायला देखील नको असते. …

एकदा एका मोठ्या हॉटेलमधे असोर्टेड कबाब बास्केट होते. ते मुद्दाम मागवलेले. खूप आनंद झाला तिला ३-४ रंगाचे पनीर कबाब खायला मिळाल्यावर. लहान मुलाला रंगीत गोळ्या मिळाल्यावर होतो तसा.. नंतर तिला एकदा “मलई मेथी मटर” खायला घातली. ही आम्हा दोघांचीही आवडती डिश. असेच कोफ्ताच्या बाबतही होते.

मग एकदा तिला पूर्ण बिघडवली. तिला मॅकला बर्गर खायला घातले. आधी तिचा विरोध. खूप कायकाय ऐकलेले. पण मॅकचा व्हेज बर्गर खरेच छान असतो. फ्राईज सुद्धा. आणि बरोबर स्प्राईट दिले. हा कॉम्बो तिला खूप आवडला.. आणि हे सारे खूप जास्त देखील नव्हते. तिला बरोबर पुरायचे.. फुकट गेली ना हो बाई. स्प्राईटचे तर व्यसनच लागले. कुठेपण गेली आणि मॅक दिसले की हिला बर्गर आणि स्प्राईट लागायचे! धमाल यायची..

जेव्हा तुमचे आवडते माणूस तुमच्या कडून मागून एखादी गोष्ट घेते तेव्हा जास्त मजा येते असे मला वाटते!

Leave a Reply