नेटवर्क मार्केटिंगचे वास्तव

मी अनेक नेटवर्क मार्केटींग कंपन्यांना प्लॅन आणि सॉफ्टवेअर बनवून दिले आहेत. काही टॉप नेटवर्क मार्केटींग कंपन्यांच्या माध्यमातून मी माझे प्रॉडक्ट विकले आहेत. त्या अनुभवातून मी खालील गोष्टी सांगतो –

  • भारतात चालणाऱ्या बहुतेक सर्व (९९%) नेटवर्क मार्केटींग कंपन्यांचे प्लॅन फसवणूकीचे आहेत. मुळात लक्षात घ्या, जी प्रत्येक कंपनी तुम्हाला इंट्रोची सुरूवात “इक्स्ट्रा इंकम”, “परदेश दौरा”, गाडी, बंगला इ. गोष्टीपासून करते ते सारे फ्रॉड आहे. ऍमवे सारख्या फार कमी कंपन्या असतील ज्या प्रॉडक्ट मार्केटींगवर भर देतात. भारतात ऍमवेदेखील फार चुकीच्या आणि घाणेरड्या पद्धतीने चालते. भारतीय नेटवर्क मार्केटींग कंपन्यांसारखीच..
  • एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की साधारणपणे कुठल्याही उत्पादनाची किंमत आणि विक्रीची किंमत ह्यात साधारण ३०-४०% मार्जीन असते. जनरल डिस्ट्रीब्युशन मॉडेलमधे कंपन्या ह्यातले ६०% डिस्ट्रीब्युटर्स ना वाटतात, १५% पर्यंत जाहिराती असतात इतर १०% खर्च सेल्स, ऍडमिनिस्ट्रेशन, ट्रांसपोर्ट इ. विषयात होत असतो. ह्या सर्व फिगर्स उत्पादना नुसार बदलतात..
  • नेटवर्क मार्केटींग मधे मात्र उत्पादनाची मूळ किंमतच १५-२०% असते. नेटवर्क मार्केटींग व्यवसायात सर्वात जास्त विकले गेलेले नोनी, अलोयव्हेरा, एनर्जी ब्रेसलेट, इंपर्टेड घड्याळे, मोरींगा आणि अशा अनेकविध गोष्टी आहेत ज्यांची मूळ किंमत, ज्याला आम्ही प्लॅनर “ट्रान्सफर प्राईज” म्हणतो ती १०% पेक्षा देखील कमी असते. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल पण ह्या क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या मालकांना, चालकांना आणि त्यांना उत्पादने देणाऱ्या अनेक दलालांना वैयक्तिक ओळखतो, ह्या सर्वांबरोबर मी व्यवसाय केलाय.. हे आकडे १००% बरोबर आहेत.. २५००/- जोडी ह्या किमतीला नेटवर्कमधे विकले जाणारी इंपोर्टेड घड्याळे प्रत्यक्ष २००/- ची देखील नाहीत. हाच प्रकार नोनी, अलोयव्हेरा इ. लागू पडतो..
  • अनेक कंपन्या तुम्हाला सांगतात स्पेशालिटी फॉर्मुलेशन आहे.. नोनी + क्ष + क + फ आणि हे जे आहे ते आपल्याच कंपनीने पहील्यांदा आणलेय आणि हे प्यायले की तुम्ही सुपरमॅन व्हाल.. असे काही नसते. ही फॉर्म्यूलेशन टेबलवर फक्त लेबल चकचकीत बनवण्यासाठी बनवली जातात..
  • पण ह्यात कुठेही गुन्हा नाही! ह्यातील कुठलाही प्रकार तुम्ही पोलीसात रिपोर्ट करू शकत नाही. ४/- बनणारी टुथपेस्ट ४०/- घेतोच ना आपण रोज दात घासायला?? तक्रार करता येते का?? कारण आपल्या देशात “प्राईज कंट्रोल ऍक्ट” नाही. कुणीही कुठलीही गोष्ट कितीही रुपयाला विकावी!
  • पुर्वी काही कंपन्या चूक करून त्यांचा प्लॅनच मांडताना रुपयात मांडायच्या. २ लोक जोडा मग तुम्हाला ३००/- मिळतील. ४ जोड्या झाल्या की १०००/- चे कॅश प्राईज.. इ.. हा गुन्हा आहे. तुम्ही माणसे जोडण्यासाठी पैसे देऊ शकत नाही. उत्पादन विक्रीसाठी देखील पैसे देता येत नाही. एकतर तुम्हाला % मधे ठरवावे लागते, जी कमीशन असते किंवा तुम्हाला पॉइंटमधे बोलावे लागते. जसे कसीनो मधे असते. म्हणजे २ लोक जोडा मग तुम्हाला ३००PV मिळतील.. आणि मग १ PV म्हणजे १/- असे डिस्क्लेमरमधे द्यावे लागते. आता कुणी कंपनी ही चूक करत नाही.. हुशार झालेत सारे!
  • पण आपल्या देशात १९७८ साली अस्तित्वात आलेला “मनि सर्क्यूलेशन ऍक्ट” आहे. ह्या कायद्या अंतर्गत रूपया ही देशाची संपत्ती असल्याने, केवळ रुपयाचा व्यापार करणे प्रतिबंधीत आहे. हा विषय निट लक्षात घ्यायला हवा. जर तुम्हाला एखादी MLM कंपनी १०००/- ला एखादी वस्तू विकते, तर ती त्याचे अधिकृत बिल बनवते. जर ते बनवले नाही, तर तुम्ही तात्काळ तक्रार करू शकता, कंपनी GST प्रकरणात अडचणीत येईल. आता बिल बनवल्यावर कंपनीला GST भरणे क्रमप्राप्त आहे आणि अशा वेळेस प्रतिबंधीत वस्तू (जसे की ड्रग्स) सोडले तर कंपनी तुम्हाला काहीही, कितीही रुपयाला विकू शकते. पण ज्या क्षणी कंपनी हे विकते, त्या क्षणी कंपनीच्या सॉफ्टवेअरमधे पूर्ण अपलाइनला मेसेज जातो की तुमच्या खाली तमूक माणूस जोडला गेला असून तुमचे उत्पन्न क्ष/- इतके झाले आहे.. जर हे असे झाले, जे बहुतांश कंपन्यांच्या बाबत होते, तर तिकडे खरी गोम आहे. जर त्याक्षणी कंपनीने तुम्हाला प्रॉडक्ट दिलेले नसले तर हा १००% मनी सर्क्यूलेशन ऍक्टच्या मार्फत गुन्हा आहे. अनेक कंपन्या प्रॉडक्ट उशीरा देतात.. २-३ दिवसांपासून ८-१० दिवसही लागतात. आणि बरेचदा जॉइनिंग ग्रुपचे असते..
  • उदा. लिडर एकदम २० लोकांना घेऊन येतो आणि सांगतो, हे ह्या २० लोकांचे २००००.. पण हे अमुक प्रकारे नेटवर्कमधे जोडा म्हणजे माझे २०००, अ चे १२००, ब आणि क चे ८०० असे मी ४००० वजा करून १६००० च देतो.. हा १००% मनी सर्क्युलेशन चा गुन्हा आहे. काही वेळेस तर लिडर स्वत:च्या तोंडाने सांगतो, प्रॉडक्टच नको. त्याचे पैसे कमी करा! तेव्हा तर कंपनी बुडालीच समजा. मनि सर्क्यूलेशन ऍक्ट वाचाल तर तुमच्या लक्षात येईल, तो एक प्रकारचा देशद्रोह आहे कारण तुम्ही देशाच्या चलनाशी खेळताय..
  • आपल्याकडे economic offense wing नावाची पोलीसांची स्वतंत्र यंत्रणा आहे जी अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर काम करते. पण खरे सांगतो, आता तर माझा पोस्ट वाचणारे काही पोलीस अधिकारी देखील आहेत, त्या सर्वांची क्षमा मागून सांगतो, ह्या विंगला देखील हे गुन्हे थांबवण्यापेक्षा, त्यात गफला कितीचा झाला आणि त्यात काय सेटलमेंट करता येईल ह्यात जास्त इंटरेस्ट असतो.
  • आपला कायदा ह्या बाबत खूपच तोकडा आहे आणि त्यातून माझा सारखे गणितज्ञ, आणि अनेक कायदेतज्ञ सहज ह्यातून पळवाटा काढून देतात हे देखील वास्तव आहे. कोर्टात जर सिद्ध झाले की तुम्ही “अनलिमीटेड डेप्थला” उत्पन्न देऊ शकता तर तुम्ही फसता. “पॉन्झी पिरॅमिड प्लॅन” ह्या संज्ञेमधे हे सारे येते आणि त्यात तुम्ही वाईट अडकू शकता. आणि तुम्ही कोर्टात लॉजीकली सिद्धच करू शकत नाही की अनलिमीटेड डेप्थला इंकम कसे देणार. पण… मी असा एक प्लॅन बनवला होता ज्यात टेक्निकली अनलिमीटेड डेप्थ उत्पन्न शक्य आहे. मॅथेमॅटीकली आणि लिगली सेफ.. असे अनेक तज्ञ ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. “बजाज अलायंझ” सारख्या कंपनीने IRDA चे सारे नियम वाकवून/मॅनेज करून इंशुरन्स लिंक्ड पॉलीसी नेटवर्क कंपन्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात विकली होती. त्या वेळेस ठाण्याला बजाजचे जनरल ऑफीस वेगळे आणि केवळ नेटवर्क वाल्यांचे वेगळे अशा दोन ब्रँचेस चालायच्या आणि नेटवर्क ब्रँचचा टर्नओव्हर नेहमी जास्त असायचा! इतका चांगला सिस्टीमॅटीक फ्रॉड मी पाहीला नाही. मी हा पूर्ण फ्रॉड सिद्ध करू शकतो, आकडेवारी सहीत. पण भारतात कुठल्याच कायद्या अंतर्गत ह्यावर ऍक्शन होऊ शकत नाही!

तेव्हा… मूळ प्रश्नाचा रोख पाहता, १९७८ मनी सर्क्यलेशन ऍक्टचा आधार घेता व economic offense wing च्या सहकार्याने १००% आणि तात्काळ कारवाइ करता येते. अधिकारी निर्भीड असेल तर २४ तासात सर्व डायरेक्टरना रिमांडमधे घेऊ शकतो आणि इनवेस्टीगेशन करू शकतो… पण … खूप मोठ्ठा पण आहे हा! … प्रत्यक्ष काही सिद्ध होणार का, त्यांना शिक्षा होणार का आणि न्याय मिळणार का हे सारे खूप कल्पनातीत आहे..

इतकेच लिहीतो.. MLM च्या खूप गमतीजमती आहेत माझ्याकडे.. त्या पु्न्हा कधीतरी!

सर्वात महत्वाचे आणि परखड : मी नेटवर्क कंपन्यांमधे खूप पैसे कमवले. किंबहुना आजवर कमवलेले ८०% तिकडेच कमवले. पण मी कधीच कुठल्या नेटवर्क कंपनीत आयडी घेतला नाही. प्लॅन दिले, रिवॉर्ड सिस्टीम दिल्या, ६५०+ कंपन्यांना सॉफ्टवेअर्स दिली, प्रॉडक्ट दिले.. कधी एंट्री घेतली नाही. MLM करू नका! दारूपेक्षा वाईट व्यसन आहे. MLM मधे गेलेला माणूस कंपन्या आणि प्लॅन बदलत बदलत रसातळाला जातो. मी लोकांची घरेदारे विकली गेलेली पाहीलीत. आयुष्यातून ऊठलेले लोक पाहीलेत. MLM मधे कधीच, मी परत सांगतो कधीच तुमचे स्वप्न साकारत वगैरे नाही. तुमच्या आयुष्याचा चुराडा होतो. तुमच्या सामाजीक प्रतिष्ठेची तर वाट लागते.. कुटूंबे उध्वस्त होतात.. तुमच्या बायका-पोरांना तुमची थट्टा ऐकावी लागते, अपमान सहन करावे लागतात. ह्या इतके वाईट काहीच नाही… एकही MLM कंपनी तुमचे आयुष्य पणावर लावावे ह्या लायकीची नाही! अजून काय सांगू??

Leave a Reply