अस्विकरण : अर्थपूर्ण जीवन म्हणजे ६ आकडी पगार, सिलीकॉन व्हॅलीमधे नोकरी, मर्सिडीज/ऑडी किंवा IAS/IPS असेच डोक्यात असेल, तर ही गोष्ट तुमच्यासाठी नाही! वाचू नका. गुगल करा, खूप अशा गोष्टी आहेत..
तर ही गोष्ट आहे एका शाळा शिक्षकाची.. त्यांचे नाव क्ष … बोर होईल ना अशाने? त्यांचे खरे नाव सांगेन. आपल्या गोष्टीपुरता आपण त्यांना काका म्हणूया… चला जाऊया ४० वर्षे भूतकाळात..
काका मूळ शेगावचे! शेतकरी कुटूंब. घरची परिस्थिती बेताचीच. कसेबसे बिए झाले… नोकऱ्यांची वानवा होती. काकांना शिक्षक व्हायचे होते. त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते… स्थानिक शिक्षणाधिकारी, आमदार.. जमेल तसे जमेल त्याला मदत मागत होते. असे करता करता त्यांना एकदा एका अधिकाऱ्यांनी सांगीतले की एक ओपनिंग आहे. पण ती आहे कुडाळला प्राथमिक शाळेत. काकांना कोकणाचे काहीच माहित नव्हते. 800 किलोमिटर्स.. पण काकांना जिद्द होती. स्वत:च्या पायावर उभे रहायचेच.. ते तयार झाले.
मग टिपीकल मराठी अडचण आली! घरच्यांचा विरोध. आई-वडील हट्टाला पेटले की इतक्या लांब पाठवणार नाही. परत कधी दिसेल पोरगा माहित नाही. १०-१२ दिवस रोज घरात नुस्ता गोंधळ.. पण काकांचा विचार पक्का होता. त्यांनी सरळ सांगीतले की परवानगी दिली नाही तर पळून जाईन. मग जे व्हायचे ते होऊदे.. शेवटी घरचे ऐकले एकदाचे.. त्यांनी एक लोखंडी ट्रंक भरून सामान दिले. कपडे, भांडी वगैरे. आणि एक बादली आणि दोरी.. कुठेही विहीरीतून पाणी काढून जेवण तरी बनवता यावे म्हणून! काकांनी ती ट्रंक आजही जपून ठेवली आहे..
शेवटी काका येऊन थडकले कुडाळला. ४०-४२ वर्षापूर्वीची ती कुडाळची सरकारी प्राथमिक शाळा. काकांनी प्रचंड मेहनत घेतली. हळूहळू नोकरीत सेटल झाले. गावाकडील एका मुलीशी लग्न केले. तिची केवळ १०वी झालेली. पुढील शिक्षण झालेले नव्हते. तिला घेऊन कुडाळला आले. ती बिचारी दिवसभर घरी असायची. जुने गावातले घर. आजूबाजूला माकडे, प्राणी असायचे. तिला भिती वाटायची. दिवसभर खिडक्या-दरवाजे लावून बसायची. तरी माकडे छपरावर उड्या मारून तिला हैराण करायचे.. काकांना सुचत नव्हते काय करावे.. एका सिनीअर शिक्षकांशी बोलले. ते म्हणाले की ती किमान १२ वी करेल तर बालवाडी तरी उघडून देता येईल. मग काकांनी तिला समजावले. परीक्षा देत रहा. नापास होशील ना? ह्याहून जास्त काय होईल? तिचा अभ्यास घेतला. ४ वेळा नापास झाली. शेवटी पास झाली. मग काकांनी तिला एक बालवर्ग (प्रिस्कूल) उघडून दिले. गावातील मुलांना इंटरेस्ट नव्हता. पटसंख्या भरत नव्हती.. मग काकांनी शक्कल लढवली की रोज जी मुले येतील त्यांना गोळ्या देणार. त्या आमिषाने मुले यायला लागली आणि काकींची बालवाडी छान चालू झाली.. काही वर्षांनी अंगणवाडीत तिला मर्ज केले गेले. मग काकीनी अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका इ. जबाबदाऱ्या देखील निभावल्या..
कोकणातून ज्यांना शेगावला दर्शनाला जायचे असेल त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि सोय काका करत असत. तसेच शेगावमधून ज्यांना कोकण पहायला यायचे असेल त्यांना सारी सोय करून देत. काका शेगाव-सिंधुदूर्गमधले एक रिलायेबल ट्रॅव्हल प्लॅनर बनले होते. हजारो लोकांना दोन्हीकडील ट्रिप्स त्यानी घडवल्या..
नोकरी करता करता काकांनी गावाकडे शेती वाढवली. २ जागा घेतल्या आणि कमर्शिअल शेड्स बनवल्या. त्या भाड्याने दिल्या. पण ते कोकणाच्या प्रेमात पडले. तेच सांगतात. त्यांना इकडेच रहायचे आहे. इकडचा निसर्ग, वातावरण सारे त्यांना खूप आवडते. कुडाळमधे छान घर बांधले आहे… ७-८ वर्षापूर्वी कुडाळच्या MIDC मधे एक छोटी जागा घेतली. त्यावर १००० स्क्वेअरफूट चे युनिट बांधले. अनेक अधिकाऱ्यांच्या हातापाया पडून ते पूर्ण केले. एक गोष्ट ते सांगतात. कुडाळ MIDC ची एक परवानगी एका स्थानिक अधिकाऱ्याकडून मिळते. रत्नागिरीहून आलेले अधिकारी संध्याकाळच्या गाडीने जाणार होते. काका त्या स्थानिक अधिकाऱ्याकडे गेले. त्यांचा स्टँप तुटलेला होता. आणि नविन स्टँप मिळायला ४ दिवस लागले असते. काकांनी त्या अधिकाऱ्यांना हातापाया पडून तो स्टँप घेतला. चार पट पैसे देवून तात्काळ तो रिपेअर करून घेतला. आणि रेल्वे स्टेशन ला जाऊन अधिकाऱ्यांना कागद सादर केले आणि परवानगी मिळवली.. असे खूप किस्से आहेत… वर तुम्ही जो फोटो पहाताय तो आहे काकांनी बांधलेल्या युनिटचा. त्यांना तिकडे फूड प्रोसेसिंग फॅक्टरी चालू करायची आहे.. अस्मिता फूड्स नावाने!
मला काका खूप आवडले.. जमेल तसे जमेल तिकडे काळाला अंगावर घेतलेय ह्या माणसाने…
प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना काही क्षमता, काही शक्यता घेऊन येते. अनेकांना आपल्या क्षमतांची कधी जाणीवच नसते. जगायचे म्हणून जगत रहातात. संकट आले की गळून जातात. संधी मिळाली की स्वार होतात.. केवळ प्रवाहपतीत! काका अपवाद आहेत. त्यासाठी त्यांनी स्टिव्ह जॉब्स किंवा इलॉन मस्क असायची गरज नाही.. स्वत:ला फक्त हे विचारा की, तुमच्याकडे सांगायला काही गोष्ट आहे का? Do you have a story to tell?
हे आपले काका म्हणजे : पुरुषोत्तम मोतीराम वाढोकार, रा. कुडाळ!