जेजे लोक ८-१० वर्षे संगणक क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांना मारीओ हा गेम आणि ही स्क्रिन अपरिचीत नाही. फार प्राचीन काळी बनवलेला हा गेम. मी १९९८ ला खेळलोय. म्हणजे त्या पूर्वी..
ह्यामधे हा मारीओ नावाचा माणूस असतो. तो पुढे-मागे जाऊ शकतो आणि उडी मारू शकतो. जर त्याला पॉवर मिळाली तर तो गोळ्या मारू शकतो जेणेकरून शत्रू मरतो.. हा जेव्हा पुढे जायला सुरूवात करतो तेव्हा अडथळे येतात.. जीवन जगल्यासारखे आहे हे.. तुम्ही जीवन जगायला सुरूवात केली की एक एक अडथळे येतात.. मग ते पाईप किंवा उंचवटे असतात ज्यावरून तुम्हाला उड्या मारायच्या असतात.. किंवा असे काही किडे जे चावले तर तुम्ही मरता.. तुम्ही ह्या किड्यांच्या डोक्यावर उडी मारली तर ते मरतात.. पण काही किडे असे असतात की त्यांना काटे असतात. त्यांच्यावर तुम्ही उडी मारली तरी तुम्हीच मरता.. पण अशा किड्यांना अडथळ्यांना चुकवण्यासाठी वरून उडी मारून जायचा पर्याय नेहमीच तुमच्याकडे असतो..
ह्या गेम मधे गेमकर्त्याचे एक मला आवडते.. संकटे तुमच्या अंगावर येत नाही. ती आयुष्यात देखील सहसा येत नाहीत. आपण एक एक झोन पुढे सरकत असतो.. आपल्याला आयुष्यात पुढै जायचे असते.. पुढील पॉवर मिळवायची असते.. पुढील लेव्हल पहायची असते.. हे सारे आपल्याला शिक्षण घ्यायचेय, नोकरी, मग लग्न, मग बंगला, मग गाडी, मग मुलं, मग फॉरेन टूर, मग सेकंड होम… लेव्हल्स आहेत पहा.. आणि हे करण्यासाठी तुम्ही निरनिराळ्या झोन एंटर करतात जिथे संकटे असतात.. ती तिथेच असतात.. प्रत्येक क्षेत्रात एक नविन चॅलेंज तुमची वाट पहात असते.. पण ते तुमच्या मागे येत नाही.. ते त्याच झोन मधे असते.. एखाद्या झोन मधे किडे असतात.. एखाद्या झोनमधे ड्रॅगन.. एखाद्या ठिकाणी काटेरी झाड.. ही झोन तुमच्या करीअर/लाईफ मधे असते.. तुम्हाला चॉईस असतो.. वरून उडी मारून किंवा इग्नोर करून जा.. नाहीतर चुकवा.. नाहीतर पॉवर वापरा आणि डिस्ट्रॉय करा.. ह्यातील काही करताना चुकलात तर परीणाम भोगावे लागतात.. वेळ जातो, संधी जाते, लाईफ जाते..
आता मारीओ तर साधा सरळ आहे. प्रामाणिक आहे.. मग त्याने एकाच ठिकाणी उभे रहावे ना. काहीच करू नये. तसेही आयुष्य संपणारच आहे.. पण मारीओ जातो पुढे.. तो ज्या झोनमधे जातो त्यातील “किडा” दुष्ट नाहीये. तो किडा आहे. तो जसा आहे तसा आहे. आणि समोरच्याला टच झाला की मरणार हा नियम आहे.. जेव्हा तुमचा स्पर्ष किड्याला होतो आणि तुम्ही मरता किंवा पॉवर कमी होते तेव्हा वाईट काही नाही.. हा फक्त नियम आहे..