सूर्य कुठेही उगवला की प्रकाश पडतोच!

२००० साली लातूरला गेलो होते. तिथे श्री शरदचंद्र परचुरे ह्यांच्या बरोबर पार्टनरशीप केली आणि दिव्या इंफोटेक नावाची कंपनी चालवत होतो. स्थानिक मुलांना एडवान्स टेक्नॉलॉजी शिकवणे आणि लोकलचे प्रोजेक्ट करणे अशा स्वरूपाचे काम होते. मी आणि माझा एक सुबोध भावे नावाचा मित्र होता ते दोघेही मुंबईवरून शिफ्ट झालो होतो. डोक्यात खूप मोठे व्हायचे, करीअर करून दाखवायचे इ. सारे खूळ होते. परचुरे काकांनी रहायची, जेवण-खायची सारी व्यवस्था केली होती. परचुरे काका म्हणजे ज्ञानाचा समुद्र. एकही विषय असा नाही जो त्यांना ज्ञात नाही. COEP चे इंजिनिअर. नंतर ३० वेगवेगळे डिप्लोमा आणि सर्टीफिकेशन कोर्सेस केले होते.. माझे जावा तेव्हा खूप स्ट्रॉन्ग होते तर माझा इंटरव्हू घेता यावा ह्यासाठी ह्या माणसाने ८ दिवसात प्रोग्रामिंगचा जावासहीत क्रॅश कोर्स केला. मला इंटरव्हूला घाम फुटला होता. मी विचारले, “काका तुम्ही मला जावा कोअरचे प्रश्न विचारताय, तुम्ही कधी शिकला?” .. मला म्हणाले, “४ दिवस झाले” .. एका आयुर्वेदीक डॉक्टरना असेच समोरासमोर डिबेटमधे घाम फोडला होता. सिव्हील, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, केमिकल हे इंजिनिअरींग, शिवाय कॉम्प्युटर ते आयुर्वेद .. काही संबंध आहे का? शिवाय प्रशासकीय साऱ्या बाबी माहीत कारण जिल्हापरिषदेचे बभ्रुवन काळे खास मित्र. साखर तंत्रज्ञानाबद्दल विशेष माहिती. LLB झाले होते. महाराष्ट्रातील पहिला BOT हायवे जयसिंगपूरचा काकांनी गडकरींबरोबर पार्टनरशीपमधे केला. तेव्हा BOT ची नियमावली पहिल्यांदा बनवली गेली जी काकांनी लिहीली. आणि इतके सारे करून सर्वात आवडता विषय अध्यात्म. रामायण महाभारताचा प्रचंड अभ्यास. मंत्रशास्त्रामधे जिज्ञासा. ज्योतिषाचा अभ्यास! काका म्हणजे जिवंत विश्वकोश…

मला लातूरमधील पहिला दिवस आठवतो.. सकाळी लवकर पोचलो, काकांना भेटलो, नाष्ता वगैरे झाला आणि काकांनी सांगीतले की तुम्ही वर जा ४ कॉम्पुटर आहेत, तुम्हाला प्रॅक्टीस करायची तर करा, आणि आवश्यक सारी सॉफ्टवेअर इंस्टल करा.. गेलो वर. ३ कॉम्प्युटर बंद फक्त एक चालू जिथे त्यांची सेक्रेटरी बसून फक्त प्रिंट घ्यायची. तिला विचारले ह्या तिघांना काय झाले, तर म्हणाली माहित नाही तुम्हीच पहा.. एक एक कॉम्प्युटर उघडला. प्रत्येकात काही ना काही गडबड होती. तिला विचारले की इकडे मेंटेनन्सचे काम कोण करते तर म्हणाली तो बाहेरगावी गेलाय ४ दिवसांनी येईल… मग म्हटले चला भिडूया.. मग त्या तिन पिसीमधील सारे पार्ट काढले. निट चेक केले आणि एकमेकांचे पार्ट वापरून २ पिसी व्यवस्थित चालू केले. नेटवर्कमधे आणले. तिच्या पिसीला कनेक्ट केले. तोवर जेवणाची वेळ झाली होती. काकांची हाक आली. खाली गेलो तर काकांनी तिला सांगीतले की ते दुसरे लेटर प्रिंट करून आण. तिने आणले तोवर आमचे हात धुवून झाले होते. काकांनी माझा आणि सुबोधच्या हातात लेटर्स दिली. उघडून पाहिले तर पार्टनरशीपचा ड्राफ्ट.. काकांना विचारले हे काय? काका म्हणाले, “वर झाली ती तुमची परीक्षा होती. जर एकही पिसी तुम्हाला चालू करता आला नसता तर तुमचे टर्मिनेशन लेटर देखील टाईप करून ठेवले होते. प्रिंट कुठली मारायची इतकाच विषय होता.. पण तुम्ही तर दोन पिसी चालू करून दाखवलेत. काम करायला मजा येईल .. चला जेवून घ्या!” ..

सगळे ठीक होते. आम्ही दर दिवशी एक एक पाऊल पुढे सरकत होतो. सुबोध थोडा स्लो होता आणि स्वभावाने साधा. काकांचा स्वभाव खूपच कडक आणि संघाची शिस्त. ४-५ महिन्यात अनेक बाबतीत काकांमधे आणि सुबोधमधे वाद व्हायला लागले. वाढत गेले. आणि “ये दोस्ती हम नही छोडेंगे” स्टाईलने आम्ही दोघांनी काकांपासून वेगळे झालो.. तेव्हा काकांनी खूप समजावले होते की अशी दोस्तीबिस्ती काही नसते, हे अळवावरचे पाणी आहे. पण तेव्हा डोक्यात फिल्मी खुळं असतात ना.. तथावकाश ४ महिन्यांनी मला देखील सुबोधमधील लिमीटेशन्स जाणवायला लागले आणि एके दिवशी त्याने मुंबईत परत येऊन नोकरी करायचा निर्णय घेतला…

लातूरला माझा कामामुळे अनेक ओळखी झालेल्या होत्या. मी त्या वापरून काही कामे मिळवायचा प्रयत्न केला। थोडी मिळाली देखील पण पुरेशी नव्हती. एकदोन ठिकाणी मी काम मागितल्यावर त्यांनी परचुरे काकांना रेफरन्स विचारला आणि अर्थात तिकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही त्यामुळे माझा हातातील कामे गेली. त्यामुळे डोक्यात खूप खुन्नस होती. मग मी शपथ वाहिली की लातूरमधेच परचुरेंच्या घरासमोर त्यांच्यापेक्षा मोठे घर बांधून स्वत:ला सिद्ध करून दाखवीन. त्या दरम्यान खूप हाल झाले. काही वेळेस दिवसभरात एक वेळ जेवून दिवस काढावा लागायचा. खूप हाल व्हायचे. काही केल्या ओपनिंग मिळत नव्हते. अशात एकदा डोंबिवलीला घरी आलेलो आणि तेव्हा माझा सख्खा मामा संजू मामा घरी आलेला होता. त्याला माझा लातूरवारी बद्दल आईने सांगीतले होते.. तेव्हा त्याने मला वरील गोष्ट सांगीतली, “अरे यशस्वी व्हायचे तर लातूरमधेच राहून कशाला व्हायला हवे? जगाच्या पाठीवर कुठेही हो ना. आणि तुला परचुरेंना मोठे होऊन का दाखवायचे आहे. त्यांच्यापेक्षा मोठे घर लातूरमधे घेऊन काय साध्य होणार? त्यापेक्षा अमेरिकेत एक मोठे घर घेऊन दाखव. तुला काय वाटते त्यांना खबर लागणार नाही?? सुर्य कुठेही उगवला तरी त्याचा प्रकाश सर्वांनाचा दिपवून टाकणारा असतो..”

पण आपण मथ्थड असतो.. इगो खूप मोठा असतो. इतका मोठा की तो तुमच्या साऱ्या इच्छा-आकांक्षासहीत तुम्हाला गिळंकृत करू शकतो. मी परत फिरलो नाही… असेच दिवस गेले आणि लातूरमधे एक नेटवर्क मार्केटींग कंपनी अडचणीत आली. त्याच्या सॉफ्टवेअरचे काम मिळाले. ते केले. त्यानंतर दुसरे.. असे करता करता ४-५ कंपन्यांची कामे केली. मग वडीलांना कॅन्सरचे निदान झाले आणि घरची परिस्थिती अचानक खूपच बिघडली. मग मुंबईला शिफ्ट झालो.. मुंबई-पुण्यात अनेक कामे मिळवली… मोठा होत गेलो. २०१० साली मला एक इमेल आली.. मजकूर साधारण असा होता..

प्रिय विनय,

सेंद्रीय शेती संदर्भातील तुझा कामाबद्दल कळले. तुझी एकूणच प्रगती पाहून आनंद वाटला. तुझे वैयक्तिक अभिनंदन करायला माझाकडे तुझा दूरध्वनी क्रमांक नाही. तुझा हा इमेल तुझा कंपनीच्या वेबसाईटवर मिळाला. डोंबिवलीला काकीची मैत्रीण सौ. xxxx xxxx रहाते जी तुझाबद्दल सांगत असते. त्यामुळे तुझी खुशाली कळतेच. मी सध्या पुण्याला असतो. कधी इकडे येणे होत असेल तर नक्की भेट.

अनेक आशिर्वाद,
शरदचंद्र परचुरे

Leave a Reply