शाकाहार आणि जीवहत्या

विषयाचा रोख “जीवहत्या” हा असला तरी शाकाहार कसा योग्य, वेदना होते की नाही, माणूस शाकाहारीच कसा इ. वर चर्चा होते.. फळे, भाजीपाला, कडधान्य पासून ते मांसाहारापर्यंत काहीही खा जीवहत्या होतेच. ह्यात चर्चा करण्यासारखे काहीच नाही. ज्यांना झाडांची मज्जासंस्था विकसीत नाही, वेदना होत नाही असे दुर्बल समर्थन करायचे तिकडे काय बोलणार. प्राणी ओरडतात म्हणजे त्याची वेदना तुम्हाला कळते आणि झाडाला ओरडता येत नाही म्हणजे त्याला वेदना नाही हे चुकीचे समर्थनच नाही तर मानवी अहंकार देखील आहे. मानवाला अद्याप फारच कमी गोष्टी माहित आहेत. अशा अनेक गोष्टी जगात आहेत ज्या अद्याप ज्ञात विज्ञानाच्या पलीकडे आहेत. झाडांचे भावविश्व देखील ह्यातीलच एक. मी कोकणात असल्याने इथे बागायती विषयाशी माझा जास्त संबंध येतो. अनेक जुन्या, वयस्कर लोकांना भेटतो तेव्हा ते आवर्जून सांगतात की रोज ते आपल्या बागायतीत जातात. झाडांवरून हार फिरवतात. त्यांना हाका मारतात, कुरवाळतात, जीव लावतात. हे झाडे मग भरभरून फळे देतात. अशा अनेक घटना आहेत की आजोबा आजारी पडले आणि त्या वर्षी झाडांनी उत्पन्नच दिले नाही कारण “माया” कमी पडली. अशीही उदाहरणे आहेत की आजोबा/आजी वारले आणि त्या नंतर आंबा किंवा नारळ लागलाच नाही.. किंवा तुळस सुकून गेली.. कदाचीत अनेक बुद्धीजिवी लोकांना हे पटणार नाही आणि विज्ञानाने ते सिद्ध करताच येणार नाही.. पण म्हणून झाडांची मज्जासंस्था विकसीत नाही म्हणून त्यांना भावभावना नाही, वेदना नाही असे समजणे हा शुद्ध अहंकार आहे!

हिंसा कशी आणि कुठली हे आपण आपल्या सोयीने ठरवूया का? “जैन धर्मात कांदा, लसुन ,मुळा इत्यादि कंद वर्गीय भाज्या खात नाहीत” हे किती तोकडे उदाहरण आहे. बटाटे, रताळी चे काय? अळूचे कंद?

भात, गहू सारखे तृणधान्ये फलोत्पत्ती करून मरतात. मग त्यांच्या मृतदेहावरील “धान्य” शाकाहार म्हणून चालते आपल्याला??

“फळे खाऊन आपण बीज प्रसारास मदत करतो” असे म्हणणे हा खूप मोठा जोक आहे. फळे मुळात कुणी खावी ह्यासाठी निर्माण केली नाही. बीज अंकुरताना त्याला लागणारी पोषक द्रव्ये रेडी मिळावी ह्यासाठी फळांचा “गर” असतो. आपल्याला खाण्यासाठी नाही. आपण जेव्हा फळ खातो तेव्हा हिंसा तर करतोच, त्याहून जास्त आपण अपाहार करून ती हिंसा करतो..

खरं तर मांसाहाराचा जीव हत्या किंवा अहिंसा या कल्पनेशी काहीही संबंध नाही . कदाचित हेच कारण आहे की मांसाहार किंवा शाकाहार ह्याच्या चर्चेत हा विषय येतो पण तो सर्वथा irrelevent अर्थात संदर्भहीन आहे असे मला वाटते. शाकाहार किंवा मांसाहार हा स्वभावानुसार बनतो किंवा बनवला जातो. – हे परफेक्ट आहे

जितकी म्हणून प्रोटिन्स आहेत ती सर्व जीवन असते किंवा त्यात जीवन असतेच. अगदी चण्याच्या डाळीत पण अनंत जीव आहेत. चणे भिजवून ठेवा आणि बघा काय होते तिथे जीवन निर्माण होते जे पूर्वी सुप्त होते ते पाण्याच्या समप्रकाने जीवन्त होते. – हे त्रिवार सत्य आहे.

आता माझी एक चिमटी –

  • शाकाहारातील उत्तम आहार म्हणजे गाईचे दूध! किती गाई स्वत:हून येऊन दुध देतात? आपण त्यांची इच्छा नसताना देखील त्यांची आचळे पिळून, अगदी वेदना होईपर्यंत दूध काढतो. त्यात काय गायीचा सात्विक भाव उतरतो का? बरे गायी पाळतातच कशाला? दूध देतात म्हणून. भाकड गाय असेल किंवा दूध देण्यास सक्षम नसलेली तिचे काय होते?? म्हणजे “दूध” मिळवण्यासाठी गाय पाळणे हा व्यवसाय आहे! ह्यात कसले आलाय सात्विक आचरण? – नीट पहाल तर ह्या आपापल्या सोयीने केलेल्या व्याख्या आहेत..
  • दुधात आणि दुधापासून बनणाऱ्या दह्यात असंख्य जिवाणू असतात. दुधा पासून बनलेले दही तर जीवाणूंची अख्खी कॉलनीच असते. ती खातो आपण. त्यांच्या मुलाबाळांसकट.. त्यांचा आक्रोश??
  • “मध” हे शाकाहारातील एक उत्तम आहार. मध काय आहे? मधमाशीची “उलटी”.. आणि मध काय मधमाशा आपल्याला डिलीव्हर करतात का? मधमाशांना पळवून, मारून, जाळून.. मध त्यांचे घर लुटून ओरबाडून मिळवला जातो… हे सारे सात्विक आहे?
  • एक थोडे वेगळे – रेशीम कसे बनते?? रेशमाच्या किड्यांना जिवंतपणी कोशासहीत उकळत्या पाण्यात टाकतात. त्यांच्या मृतदेहावरील रेशीम सर्वात हे पवित्र वस्त्र म्हणून आपण वापरतो! वा रे मनुष्यप्राणी आणि त्याचा दांभीकपणा..

जीवो जीवस्य जीवनम हे ह्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आहे. प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवाची हत्या करूनच जगतो हे त्रिवार सत्य आहे.

Leave a Reply