खूप वर्षांपूर्वीची गोष्ट… साधारण ३०-३२ वर्षांपूर्वी.. मी तेव्हा ४ थी किंवा ५ वीत असेन.. मला बर्फाचा गोळा खायला खूप आवडायचा. आणि पाणीपुरी. आई आठवड्यातून एकदा आम्हाला (मी आणि लहान बहीण तृप्ती) साऱ्या मौजा करायला द्यायची. मिठवाली बोरे आवळे, खारी बिस्कीटे एक भय्या घरोघरी मोठी पेटी डोक्यावर घेऊन जायचा, मेदूवडा चटणी, उसाचा रस, म्हातारीचे केस… खरेतर परीस्थिती बेताची होती.. पण बिचारी काही ना काही मॅनेज करत असे.. खूप धमाल यायची… तेव्हा अनेक गोष्टींचा अभाव होता.. पण नात्यांमधे समजूतदार पणा होता.. वाटून खायची वृत्ती होती.. एकमेकांसाठी चॉकलेटचा एक तुकडा सोडायचा भाबडा त्याग होता.. समाधान होते… त्या काळातील ही गोष्ट…
तर … त्या दिवशी दुपारी शाळेतून आलो आणि मला घरी एका कोपऱ्यात २० पैशाचे नाणे मिळाले.. आठवते का? त्याकाळचे ते ऍल्युमिनीअमचे नाणे??
एकदम खजीनाच मिळाला होता.. सर्वात महत्वाचे म्हणजे तेव्हा २० पैशात गोळा मिळत असे. मला तोंडाला पाणी सुटले होते.. मी पटापट शाळेचे कपडे बदलले.. आणि ते २० पैसे खिशात घालून भर दुपारचा गोळावाला शोधायला निघालो.. एके ठिकाणी मिळाला.. त्याला दिले पैसे आणि एक छान गोळा बनवायला सांगीतला.. तो गोळा हातात आल्यावर इतका हर्ष झाला होता की विचारू नका…
पण हा आनंद काही फार काळ टिकला नाही.. “तू इकडे कुठे??” … ओळखीचा आवाज.. आणि गोळा हातातून पडला… मागे आईसाहेब उभ्या.. आज नेमकी हाफडे घेऊन ती लवकर आली होती.. झाले कल्याण.. “तुला गोळ्याचे पैसे कुणी दिले? का तू शाळेत कुणाचे चोरलेस??” … आणि उत्तर द्यायच्या आधीच डोळ्यासमोर अंधारी आली होती.. काजवे चमकत होते.. आईची पहीली कानफडात पडली होती…
मी बोललो, “अग घरी कोपऱ्यात पडलेले मिळाले..”
“पण ते तुझे होते का? जी वस्तू तुझी नाही ती उचलायची नाही, वापरायची नाही हे शिकवलेय ना? रस्त्यात देखील पैसे पडलेले मिळाले तर उचलायचे नाही हे सांगीतलेय ना??” .. आमच्या आईसाहेब म्हणजे टिळकांचा पुनर्जन्म की काय वाटेल असा नियमांचा महामेरू होता… एकी कडे हे प्रश्न दुसरीकडे माझा थोबाडाचा रंग पटापट बदलत होता.. इतक्यात तिची एक बांगडी फुटली आणि मला १५-२० सेकंदांचा ब्रेक मिळाला..
“अगं रस्त्यावर नव्हते पडले.. आपल्याच घरी पैसे पडले होते ना? मग ते वापरले तर काय प्रॉब्लेम??” ..
“अरे जानेदो ना भाभीजी, छोटा बच्चा आहे.. ” गोळावाला बिचारा त्याच्या २० पैशाला जागत होता..
तोवर आईसाहेबांनी शस्त्र बदलले.. तिकडे बाजूला पडलेली एक काठी उचलली आणि मला फटकवत माझी वरात घरी निघाली. सगळे रस्त्यावर जाणारे पहात होते.. पण आईने माफ केले नाही…
“घरी मिळाले म्हणून पैसे तुझे झाले का? जी वस्तु तू कमवली नाही ती तुझी कशी? आणि जर तुला एखादी वस्तू अशी मिळाली तर लहान बहीणीची आठवण का नाही आली तुला?? २० पैसे काय मिळाले तू भावाची जबाबदारी कसा विसरला??” …. घरी येऊपर्यंत खूप तमाशा झाला होता.. अंगावर अनेक वळांच्या खूणा…
आणि एक संस्काराची खूण कायमची मनावर उठली होती .. “अस्तेय” .. जे तुझे नाही.. तू कमवले नाही… ते तुझे नाहीच.. ते घ्यायचेच नाही.. मी कधी कमीशन चे व्यवहार करत नाही. भुरटे उद्योग करून पैसे मिळवू शकत नाही. मी कधी चणेवाल्याकडे फुकट चणेपण घेऊ शकत नाही…
मी त्या नंतर कधीच गोळा खाल्ला नाही.. मला आठवते त्यानंतर पहीला गोळा मी नमीता बरोबर गोव्याला हनीमूनला खाल्ला.. तेव्हा तिला पण ही गोष्ट सांगीतली होती..
आजही गावी वडीलोपार्जीत जमीनींचा विषय निघतो.. “बहीणींना वडीलोपार्जीत जमीनीमधे समान हक्क का बरे? त्यांच्या साठी करायचा तो खर्च केला ना? लग्नातदेखील खर्च केला. मग आता काय आहे त्यांचे इकडे.. ” हे असले विषय मला भेडसावत नाही. वडीलांनंतर मिळालेल्या सर्व प्रॉपर्टीत माझी बहीण बरोबरीची हिस्सेदार आहे. ..
एक संस्कार जर योग्य झाला तर आयुष्यभराचे अनेक प्रश्न सोडवतो… आता माझा प्रयत्न आहे, माझा मुलाला अस्तेय शिकवायचा… गोळा आणि काठी न वापरता…