माझी “परफेक्ट लाईफ पार्टनर”ची आयडीया म्हणजे खूप सुंदर, हुषार, चारचौघात उठून दिसणारी वगैरे नसून, ती समंजस आणि कुठल्याही प्रसंगात साथ न सोडणारी असावी अशी होती. आता लव्हमॅरेज करा की अरेंज, हे काही तुम्हाला चेक करता येत नाही.. सट्टाच एक प्रकारचा..
मी एक सॉफ्टवेअर प्रोफेशनल असून छोटा व्यावसाईक आहे. आई शासकीय नोकरी आणि वडील इलेक्ट्रीशीअन अशा सामान्य घरातून मी आलोय. मला खूप करीअरीस्ट, ऍम्बिशिअस मुलीशी लग्न करायचे नव्हते.. कारण त्याचा थेट परीणाम नवरा-बायकोचे नाते आणि भविष्यात मुलांच्या वाढीवर होतो. ह्याचा कुठेही स्त्रीला कमी लेखणे किंवा घरकामात अडकवणे ह्याच्याशी संबंध नाही. पण लग्न करताना प्रत्येकाच्या अपेक्षा असतात. तशी मला कौटुंबिक आघाडीवर पार्टनर हवी होती, आर्थीक किंवा व्यावसाईक आघाडीवर नाही. इतकेच. माझे लग्न “नमिता गवाणकर” नावाच्या मुलीशी झाले. साधी सरळ बिकॉम केलेली, BARC मधै जॉब करणारी, सामान्य मुलगी. खुप हुषार नाही, सुंदर नाही, काही वेगळेपणा नाही.. पण मला आवडली. अरेंज मॅरेज. ह्या पूर्वी माझी काही अफेअर्स झाली आहेत. छान छान मुलींबरोबर (नमिताने वाचले तर आजपासून जेवण खारट जेवायला लागणार बहुतेक..) पण मला नमिता आवडली.. खरेतर ती किती साधी आहे हे मला लग्नानंतर कळले..
लग्नानंतर सारे होतच जाते.. तुमची मने जुळतात. आवडीनिवडी कळतात.. एकमेकांसाठी थांबणे, वाट पाहणे, रोमान्स, फँटसीज.. थोड्या वेळाने का होईना दुधात साखर विरघळत जाते… गोडवा वाढत जातो.. पण मला सांगायचेय ते ह्या नंतर आहे..
जेव्हा माझे तिच्याशी लग्न झाले तेव्हा मी खूप यशस्वी आणि श्रीमंत होतो. २ बंगले, ३ गाड्या, स्वत:चे ऑफीस, बँकबॅलन्स, परदेश दौरे.. लग्नानंतर वर्षभराने काही गडबडी व्हायला लागल्या.. मी शेअरमार्केटमधे पावणेदोन कोटी रूपये घालवले आणि मोठा झटका बसला. बँकांनी माझा २ प्रॉपर्ट्या टेकोव्हर केल्या. गाड्या विकाव्या लागल्या. केनयामधे माझे एक मोठे काम चालू होत असतनाच माझा २ पार्टनरनी मला धोका दिला. तिथे मोठे नुकसान झाले.. एकापाठोपाठ हे सारे घडत होते आणि काहीच चांगले होताना दिसत नव्हते.. प्रत्येक दिवस मला मागे ढकलत होता. दर दिवसाला १५०००/- रू फक्त व्याज भरत होतो.. अनेक पावले मागे आलो…
हे सारे होत असताना एक वाइट गोष्ट मानसीक पातळीवर होत असते ती म्हणजे – प्रलोभने! अनेक मला ओळखणारे बिझनेस हाऊसेस, कंपन्यांच्या मला स्टँडींग ऑफर्स होत्या की हव्या त्या टर्म्सवर जॉइन कर. कारण मॅनेजमेंट आणि मार्केटींगमधले माझे करीअर साऱ्यांना माहीत होते. पण ही एक चूक मला आयुष्यभराच्या गुलामीकडे घेऊन गेली असती.. ह्यावर एकच पर्याय होता ते म्हणजे सर्कल्स बदलणे.. आणि ह्यासाठी मुंबई सोडायचा निर्णय मी घेतला. कोकणात जायचे स्ट्रॅटेजीकली ठरलेच होते.. ते आधीच व्हायला लागले होते. माझी आई, मित्र, सहकारी ह्यांचा विरोध होता. सर्वस्तरातून कुचेष्ठा चालू होती.. मला जवळून ओळखणारे देखील keeping fingers crossed! एकदा सासरेबुवा देखील म्हणाले, “तुम्हाला मुलगी दिली ती तुमचे यश आणि धडाडी पाहून.. हे काय करताय??”.. आणि अशा वेळेस अनेक प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. प्रत्येक उत्तर नविन प्रश्नाला जन्म देत जाते आणि पदोपदी तुमचा आत्मचिश्वास डळमळीत करते..
ह्या घोर प्रसंगात एकच व्यक्ती कुठलिही शंका न घेता माझा मागे उभी होती ती म्हणजे नमिता! जेव्हा प्रॉपर्ट्या विकल्या जात नव्हत्या आणि बँकेने राहत्या बंगल्यावर नोटीस दिली तेव्हा तिने तिचे सारे दागीने दिले आणि सांगीतले हे वापर.. सद्गुरूंच्या कृपेने तिचे दागीने वापरावे लागलेच नाहौ. तिच्या निर्धाराची पुण्याईच इतकी जबर की काही दिवसात प्रोपर्ट्यांचे डील्स झाले आणि आम्ही बँक क्लिअर केली..
पण मुलींच्या दृष्टीने हे सोपे नसते. तिच्या बहिणी, मैत्रीणी.. त्याच्या कुचाळक्या, टोमणे, गॉसीप्स.. तिच्या माहेरून तिला विचारले जाणारे प्रश्न.. माझ्या सासऱ्यांचा स्वभाव.. अनेक घटक होती. ती देखील तेव्हा लहानच होती आणि हा प्रसंग देखील पहीलाच.. पण ती शरण गेली नाही. आणि अशा परीस्थितीतही मला सोडले नाही. माझाबरोबर गावी शिफ्ट झाली.. इथे माझे गावचे घर होते पण तिथे रेंज नव्हती. म्हणून आज ५-६ वर्षे आम्ही विवीध तालूक्याच्या ठिकाणी भाड्याने राहतो. डोंबिवलीला अजूनही घर आहे तरी.. अनेकांनी तिला टोमणे मारलेत ह्यावरून… पण ती फक्त हसते.. उत्तर देत बसत नाही..
आता परत परीस्थिती बदलतेय. बिझनेस पिकअप करतोय. गाडी आहे. शासकीय प्रोजेक्टसवर काम आहे. परदेश दौरे चालू झालेत… नायजेरीयाचे राजे हिज हायनेस इट्सु नुपे इथे कुडाळला येऊन मला भेटून गेले.. आता परत सारे नातेवाइक संपर्कात आहेत.. हेचे ते सारे हे आता म्हणतात “आम्हाला माहीत होते तू नक्की ह्यातून बाहेर पडणार..” .. मित्रपरीवार गोतावळा जमा झालाय..
ह्यातून एक कळलेय.. बाकी कुणी असो वा नसो.. एक पात्र कामय माझा बरोबर असणार! आणि मला ह्याचा अभिमान नाही. कृतज्ञता आहे!