धादांत खोटे!

जर तुम्ही योग्य गोष्ट करताय हे तु्म्हाला माहीत असेल व त्यामुळे कुणाचे जाणून बुजून नुकसान होणार नाहीये तर तुम्ही खोटे बोलायला हरकत नाही. आता “योग्य” म्हणजे काय? आणि तुमच्या दृष़्टीने जो योग्य ते सर्वांच्यासाठीच योग्य आहे का वगैरे किस आपण पाडत राहू शकतो. ह्यासाठी लोकमान्य टिळकांचे गीता रहस्य वाचा. त्यात पहील्याच भागात व्यास, शंकर इ. थोर विचारवंतांचे सत्य ह्या विषयावर खूप छान विचार उदाहरणासहीत दिले आहेत. त्यात एक प्रसंग असा आहे की गाय एका दिशेने गेली आणि खाटीकाने विचारले की कुठे गेली तर ह्याचे खरे उत्तर द्यावे का आणि पाप लागते का?? तर ह्यावर शेवटचे भाष्य भगवान शंकराचे असे की तुमची पुण्याई/इच्छाशक्तीच इतकी प्रबळ असायला हवी का प्रसंगच तुमच्यावर यायला नको..

२००४-०५ साली आम्ही एक “घरगुती विज वाचवणारे उपकरण” बाजारात आणले होते. इलेक्ट्रीकल पॉवरसेव्हर. त्याकाळी “विज बचतीचा डोंबिवली पॅटर्न” नावाने महाराष्ट्र टाइम्स व इतरही विवीध वर्तमानपत्रांनी त्याला गौरवले होते.. सामान्यपणे घरात फ्रीज, पंखा, वॉशींगमशीन असेल तर घरात एक पॉवरसेव्हर लावल्यास विजेची बचत होतेच. ह्याची छान थिअरी आहे. “Capacitor Based Power Factor Correction & Electricity Saving” असे सर्च करून अधिक माहीती घ्या. भविष्यात खूपच चिनी प्रॉडक्टनी ह्यात धुमाकूळ घातला व आम्ही आमचे उत्पादन मागे घेतले. तर त्याकाळी आम्ही ह्या पॉवरसेव्हरच्या प्रचार प्रसारासाठी महाराष्ट्र गुजराथ गोवा असा खूप प्रवास केला होता. अनेक प्रेझेंटेशन द्यायचो, इंटरव्ह्यू, प्रेस चालूच असायचे. माझी पहीली गाडी ह्या उत्पादनाच्या जिवावर आली होती..

तर एकदा आम्ही गुजराथ दौऱ्यावर असताना मोठी मिटींग लागली. साधारण २०० पिस ऑर्डर होणार होते. एका पिसमागे आमचे ३-४०० रूपयांचे मार्जीन असायचे. म्हणून २०० पिस मोठी ऑर्डर. अद्याप मी खोटे बोललो नाहीये हा 😉 .. तर ह्या मिटींगला गेलो आणि हॉल तुडूंब भरला होता. आम्हालाच समोर जाता येइना. खूपच गर्दी होती. कसेबसे गेलो समोर आणि नमस्कार चमत्कार झाले. डेमो केला. सर्वांना खूप आवडले. ऑनदस्पॉट ऑर्डर चालू झाल्या. डिस्काऊंट स्किम होत्या मल्टीपल प्रोडक्टवर. तो अजून गोंधळ.. अशा वेळी प्रश्नोत्तरे चालू असायची. नाहीतर गर्दी आवरणे कठीण जाते. मी पॉवरफॅक्टरच्या स्टोरीज आणि काय काय सांगत किल्ला लढवत होतो. अचानक समोरच्या गर्दीतून मला प्रश्न आला “तुमच्या प्रोडक्टवर लिहीलेय डायनॅमिक पॉवरफॅक्टर करेक्शन. हे कसे काय?” .. खरे तर माझ्या प्रॉडक्टमधे घंटा काही डायनॅमिक नव्हते. पण मार्केटींग स्टंट करावे लागतात ना. आपण नाही का वाचतो ‘एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल’ तसे आमचे डायनॅमिक.. पण अर्थात हे तिकडे तर सांगू शकत नाही म्हणून मी थाप मारली “प्रॉडक्ट लोड सेंस करते आणि आवश्यक तितकाच पॉवरफॅक्टर सप्लाय करते, म्हणून मी डायनॅमिक म्हटले आहे. प्रॉडक्ट सातत्याने पॉवर सेंस करून बदलत राहते” .. हे ना असे करूच शकत नाही. ह्यासाठी इंडस्ट्री ग्रेड, इंस्टॉलेशन बेस पॉवरफॅक्टर करेक्शन डिव्हाइल लागते, जे मोठे देखील असते आणि खूप महाग सुद्धा.. आणि हे मला माहीत होते. पण दिले ठोकून..

आणि प्रसंग अंगावर आला ना.. त्या व्यक्तिने ओळख सांगीतली की तो गुजराथ इलेक्टीसिटी बोर्डमधे इंजीनिअर आहे आणि वरीष्ठ अधिकारी आहे आणि त्यांना अशा प्रकारचे कुठलेही तंत्रज्ञान माहीत नाही. मी हे ऐकून गांगरलो. एका क्षणात सारे आवाज बंद आणि सेल काऊंटर थंड पडले. सगळे लक्षपूर्वक ऐकू लागले की आता काय होते.. हा आता अटीतटीचा प्रश्न झाला. कारण मी जर माझे वाक्य मागे घेतो तर प्रॉडक्ट कायमचे नामशेष झाले असते. त्या दिवशीच्या ऑर्डर तर गेल्याच पण लोकांनी फटकावले देखील असते. आणि GEB ला काम करणाऱ्या अधिकाऱ्याला तू चुकीचा आहेच असे देखील मी म्हणू शकत नव्हतो. सगळा उरलासुरला धीर गोळा केला, कुठून कुठून हिंमत बांधली आणि त्यांना म्हटले “ह्या टेक्नॉलॉजीला ‘प्रोग्रेसिव्ह पॉवर फॅक्टर करेक्शन’ तंत्रज्ञान म्हणतात जिचा अविष्कार जर्मनीमधे झाला. हा इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरींगचा भाग आहे. आणि आम्ही देखील सदर उत्पादनात सिमेन्स कंपनीचे सर्कीट आणि सुटे भाग वापरतो. हे तंत्रज्ञान सिमेंसने घरगुती विजबचतीसाठी महाराष्ट्र सरकारला ऑफर केले होते पण काही कारणास्तव झाले नाही. त्याचाच आधार आणि सुटे भाग वापरून आम्ही हे बनवले आहे म्हणूनच ह्याला महाराष्ट्र सरकारची अधिकृत परवानगी देखील आहे”.. ह्यातील शेवटचे वाक्य सोडले तर वरचे सारे धादांत खोटे होते. वर म्हटले “आपण इतके सिनीअर अधिकारी आहात तर आपण ‘प्रोग्रेसिव्ह पॉवर फॅक्टर करेक्शन’ बद्दल ऐकले असेलच. आता सिलॅबसमधे आहे हा विषय. वाटल्यास तुम्ही ऑनलाइन चेक करा” … हे ऐकल्यावर त्या बिचाऱ्या अधिकाऱ्याची गोची झाली. नाही म्हणाला तर ह्याला कसे माहीत नाही असे होते.. बिचारा कसानुसा हसला आणि बोलला “वा. छान करताय तुम्ही. काही मदत लागली तर सांगा..”

त्या दिवशी ३४० पॉवरसेव्हर विकले आणि एक डिस्ट्रीब्युटर पण नेमला!

**माझा पॉवरसेव्हर खरेच विजबील वाचवतो. हे मी आजही सिद्ध करू शकतो. शिवाय माझाकडे तसे महाराष्ट्र शासनाचे टेस्टरिपोर्ट देखील आहेत. खोटे बोललो पण खोटे बोलून फसवणूक केली नाही. पण मी ह्या व कुठल्याच खोटे बोलण्याचे समर्थन देखील करत नाही. प्रसंग होता, निभावला इतकेच.

Leave a Reply