You are currently viewing नेगोसिएशन्स!

नेगोसिएशन्स!

ही अनेक वर्षांपूर्विची गोष्ट… असे म्हणण्याचे कारण मी खरेच तेव्हा खूप लहान आणि इनसिग्निफिकंट होतो. अगदी होतकरू. … सुरूवातीला “बोस्टन” नावाच्या कंप्युटर क्लासेस मधे शिकवायचो.. तिथेच्या त्या क्लासेसचे मुख्य शानबाग सर ह्यांच्याशी ओळख झालेली..

नंतर काही कारणास्तव ते क्लासेस बंद झाले आणि मी छोटीशी आयटी कंपनी काढून रांगायचा प्रयत्न करत होतो. तेव्हा ह्या शानबाग सरांकडे एक फ्लोरीडा कौटीचा प्रोजेक्ट आला होता. ८० लाख लँड रेकॉर्डस् होते. स्कॅन केलेले. मोठ्या मोठ्या कोडॅकच्या टेप्सवर ते असायचे. कोडॅकचा एक स्कॅनर होता ज्यातून त्या स्टेप्स स्कॅन होत आणि त्याच्या इमेज बनत. मग ह्या इमेजेसच्या बॉर्डर काढणे आणि त्यांना सरळ करणे आणि त्या फाइलला त्यांचा नंबर देणे असे ते काम होते. मूळ प्रोजेक्ट कोडॅककडे होता. ते ह्या इमेजेस शानबाग सरांना आऊटसोर्स करत ज्यांनी त्या क्लिन करून परत करायच्या.. एका इमेजचे साधारण २६ ते २८ पैसे मिळायचे..

शानबाग सरांनी एक टीम ठेवलेली मुलींची, डेटा एंट्री ऑपरेटर सारख्या ज्या ह्या इमेजेस ऊघडत, सरळ करत, बॉर्डर काढत, नंबर देत इ. इ. आणि ती इमेज सेव्ह करत. मूळ स्कॅन मोठ्या होत्या त्यामुळे ह्यात वेळ जायचा. आणि त्यावेळी कॉम्युटरला मेमरी खास नसायची..

अशावेळी ह्या सिनमधे हिरोची एंट्री झाली तो म्हणजे मी.. (थोडा वेळ माना हा मला हिरो प्लिज..)

ह्यात तज्ञांनी अभ्यास करून पॅटर्न शोधायचा असतो जो ऑटोमेट होइल व ह्या मुलींचा वेग वाढेल. अशाने दिवसाला होणाऱ्या इमेजेस वाढल्या की लेबर कॉस्ट कमी आणि फायदा जास्त असे सरळ समीकरण असते. आणि हे तज्ञ जो काही पैसा वाचवतात त्यात त्यांचे % असते.. म्हणजे मी जर शानबागांचे १ लाख वाचवले तर २०००० मला.. तेव्हा ही मोठी रक्कम होती माझासाठी..

हे माझे चालू होते आणि मी एक प्रोसेस ऑटोमेट केली ज्यामुळे शानबाग सरांचे ६ लाख सरळ वाचणार होते.. आणि मला लाखभर रुपये मिळणार होते. दरम्यान शानबाग सरांनी माझाबरोबर एक मिटींग लावली. मला त्यांना ती सारी प्रोसेस समजवायची होती. मी पूर्ण तयारीनिशी प्रेझेंटेशन बनवले की हा किती लेबोरीअस जॉब आहे आणि खरे तर २८पैसे ही कशी तोकडी रक्कम आहे… शानबाग सर मुरलेले बिझनेसमन होते. त्यांना कळले होते की हे प्रेझेंटेशन मिसफायर झालेय. हा विषयच नव्हता.. पण त्यांनी मला ऑफर दिली की मी हे प्रेझेंटेशन कोडॅक ला द्यायचे आणि त्यांना पटवायचे की २८ पैसे कसे कमी आहेत. जर मी त्यांना पटवतो आणि पैसे वाढवतो तर दर चार पैशांमागे एक पैसा माझा! मी तयार झालो..

आम्ही कोडॅकच्या मुख्य ऑफीसला मुंबइला गेलो.. बहुतेक किशोर नावाचे एक महाराष्ट्रीयन सिनीअर अधिकारी आणि एक नॉर्थइंडीयन मोठे अधिकारी होते. किशोर सरांना मी ओळखायचो. मिटींग लागली आणि मिटींगला कोडॅकच्या ह्या २ ऑफीसर्स बरोबर आणखी २ ऑफीसर्स जॉइन झाले जे टेक एक्सपर्ट होते. शानबाग सरांना प्रेशर आले कारण त्यांना सगळे कोण कोण आणि किती अनुभवी ते माहीत होते.. मी बिनधास्त कारण कुणालाच ओळखत नव्हतो. साडे अकराची गोष्ट असेल ही.. घमासान चालू.. मी स्टेप बाय स्टेप विषय मांडत होतो आणि प्रत्येक क्षणी त्यांच्या टेक टीमला निरूत्तर करत माझा मुद्दा पुढे रेटत होतो.. दोन्ही सिनीअर्स हैराण कारण त्यांना मला प्रेशर करता येत नव्हते.. करता करता मी २८ पैशाचा रेट ३३ पैशावर आणला. शानबाग सरांना गुदगुल्या होत होत्या. आणि लंचब्रेक झाला..

किशोर सर आमच्या बरोबर जेवायला होते. आणि ते शानबाग सरांचे घनिष्ट मित्र होते. तर शानबाग सरांनी माझे ४ पैशाला एक पैशाचे डिल त्यांना सांगीतले, ह्या अटीवर की मिटींगमधे ह्याचा परीणाम होऊ द्यायचा नाही. किशोर सरना खूप कौतूक वाटले माझे आणि त्यांनी मला शाबासकी दिली.. मला म्हणाले “छान विनय. सांग तुला काय आवडते ते मागवू आज…” मला चिकन ६५ प्रचंड आवडायचे.. मी मागवले. अख्खे एकट्याने खाल्ले.. मस्तच होते..

आलो वर.. दुसरी राऊंड… कसे काय माहीत, कोडॅकच्या टेक टीमचा विरोध मावळला होता. जाणवत होते.. अर्ध्या तासात मी ३५ पैशावर गेलो. किशोर सरांच्या सिनीअर ना मात्र हे आवडत नव्हते.. आणि बिलात नुकसान देखील होणार होते ना..

ते म्हणाले “किशोर इसका कुछ कर.. ये बोलता रहेगा तो प्रोजेक्ट जायेगा हाथसे” …

किशोर सर बोलले, “अरे ह्याला २ चिकन ६५ आणारे कुणीतरी.. विनय आता तू एक शब्द बोलायचा नाही. फक्त चिकन ६५ खात रहा.. “

शानबाग सर बोलले “तू बोल रे राजा.. तुला संध्याकाळी ६५ च्या कढईत बसवतो..”

आणि सगळे हसायला लागले.. धमाल आली होती. मग किशोर सरांनी त्यांना १ पैशाचा खेळ सांगीतला.. ते म्हणाले “बेटा तेरे १ पैसे के चक्कर मे कंपनी बिकवायेगा क्या तू??”

अशा धमालधमाल मधे आमचे फायनल झाले ३६ पैसे पर इमेज आणि आम्ही उठलो. मला २ पैसे सुटणार होते त्यामुळे मी खूष होतो आणि शानबाग सर देखील.. किशोर सरांना हे डील झाल्याचा आनंद होता. कोडॅकला बहुतेक त्या इमेजचे १.२०/- मिळत असावेत.. सारेच खूष होते.. किशोर सरांनी सांगीतले की उद्या पानशेत ला जाऊया. त्यांच्या परीचीताचा कुणाचे घर होते. तिकडे पार्टी करूया..

दुसऱ्या दिवशी दुपारी आम्हाला किशोर सरांनी आणि त्या सिनीअर सरांनी पिकअप केले आणि आम्ही पानशेतला जायला निघालो.. वाटेत शानबाग सर बोलले की रात्रभर काय करणार? बोर होणार, तर पत्ते खेळूया. मग मधे कुठेतरी आम्ही कॅट घ्यायला थांबलो. ह्या सगळ्यांना सिगरेट पण मारायची होती.. मी आणि ते सिनीअर सर गाडीत आणि शानबाग सर आणि किशोर सर त्याच्याकडे गेले सिगरेट्स आणायला.. मी गाडीतूनच त्यांना ओरडून सांगीतले पत्ते विसरू नका..

त्यांनी त्या पानपट्टी वाल्याला विचारले कसे कॅट. काहीतरी ३० रूपयाला असावे. शानबाग सर बोलले २ दे ५० ला.. तो बोलला “नही परवडता है साब.. यहा इतना धंदा भी नही होता… “

दरम्यान किशोर सरांना हुक्की आली “विनय इकडे ये. हा कॅटचे पैसे कमी नाही करत. तू तर इतका मुरलेला नेगोसिएटर आहे ना.. बघ किती पैसे कमी करतो ते” …

मी गप बसावे ना, पण बेडकीचा फुगून बैल झाला होता.. गेलो शहाणपणा करायला “क्या भैय्याजी दो कॅट ले रहे है. साब ने सिगरेट भी लिया.. थोडा तो कम होता है ना.. और ये रखके क्या करोगे.. ऐसेही खराब हो जायेंगे. उससे अच्छा देदो..”

पानवाला “अरे भाई लेना है तो लो वर्ना जाने दो. मुझे नही परवडता. खराब होगा तो देखूंगा.. तब आजे सस्तेमे ले जाना मुझसे”… असे म्हणून त्याने कॅट उचलले. माझा इतका मोठा पोपट झाला होता.. शानबाग सर आणि किशोर सर जोरजोरात हसत होते. मी गुपचुप ६०/- दिले आणि कॅट घेतले.. परत आल्यावर त्या सरांना ह्यानी हे रामायण सांगीतले.. त्यावर सर म्हणाले “अरे किशोर, उस पानवालेको लेके आ, कोडॅक मे सिनीअर नेगोसिएटर की नोकरी देते है.. बहोत पैसे बचायेगा.. जो विनय को नही माना वो बडी तरक्की करेगा देख..” त्या संपूर्ण ट्रीप मधे माझी सर्वांनी इतकी खेचलीये इतकी खेचलीये की विचारू नका..

Leave a Reply