1995 ला 10वी पास झालो। तिथवरच्या आयुष्यातील सर्वात कमी मार्क पडले। 82.57%. खूप रडलो होतो, मी आणि आई.. मावशीचे मिस्टरणी सल्ला दिला की ह्याला डिप्लोमा ला घाला। चांगला स्कोप असेल। ते देखील शक्यतो मेकॅनिकल। आणि मग मी पेणच्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घेतला..
घरची परिस्थिती बेताची होती। वडिलांची नोकरी गेलेली। आई एकटी कमवणारी। बिचारी कुठून कुठून कायकाय करून मला पैसे पुरवायची। कॉलेज नव्हते, हॉस्टेल नव्हते। 3–4 मित्र रूमवर भाड्याने राहायचो आणि शेअर करायचो। खानावळ होती। अनेक श्रीमंत मुले देखील होती। त्यांना पाहून खूप जलफळायला व्हायचे। पण परिस्थितीपुढे इलाज नव्हता..
आठवड्यातून एकदा घरी जायचो। कोकण रेल्वे मार्गावर शटल चालायचे तेव्हा। तिकिटे काढत नसू। ते पैसे वाचवायचो आणि ट्रेनमध्ये भेळ, वडा वगैरे खात असे..
आमची पुस्तके आणि रेफरन्स बुक्स महाग होती। परवडायची नाही। मग लायब्ररीतून पुस्तके घेऊन नोट्स काढायचो.. पण किती काढणार ना?? एकदा डोंबिवली वेस्टला गेलो होतो तेव्हा एक झेरॉक्स वाला होता। 50 पैसे झेरॉक्स होती। एक महत्वाचे पुस्तकातील 60–70 पाने झेरॉक्स केली। त्याने विचारले की तुला असे झेरॉक्स लागतात का? मी म्हटले हो, पण 50 पैसे परवडत नाही। मला बोलला एक वेळी 100 झेरॉक्स काढशील तर तुला 40 पैसे रेट लावीन। आणि 500 वगैरे करशील तर 35 पैसे। हे इंटरेस्टिंग होते.. मी काही पुस्तकातील रेफरन्स त्याच्याकडून करून घेतले। हे माझं काही मित्रांनी पाहिले। त्यांना पण आयडिया आवडली। पण त्यांच्याकडे झेरॉक्स 75 पैसे होती। मग त्यांनी मला सांगितले की मी त्यांना झेरॉक्स आणून दिल्या तर ते 50 पैशाने घेतील.. असे 7–8 मित्र रेडी झाले। एकूण 1200 पेक्षा जास्त झेरॉक्स लागणार होत्या। मला 15 पैसे मार्जिन होते। अचानक श्रीमंत झालो होतो। केले ते सारे। सारे करून साधारण 160/- सुटले.. पहिली कमाई होती.. खूप बरे वाटले। एक दिवस तसेच ठेवले.. आलेली लक्षमी लगेच खर्च करू नये म्हणतात.. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये बवाल झाला। मला 20–22 मुले भेटली। सगळ्यांना झेरॉक्स हव्या होत्या.. जवळजवळ 4000 झेरॉक्स.. मला 600/- मिळणार होते। हे माझे एक महिन्याचे मेस चे बिल होते। खूप खुश होतो। सगळ्यांनी रेफरन्स दिले आणि ऍडव्हान्स दिला..
मी डोंबिवलीला आलो, त्याच्याकडे गेलो.. त्याला सांगितले की 4000 कोपीज पाहिजे। मला बोलला, खूप काम आहे, हे नाही करू शकत। दुसर्याकडून घे.. भेंxx .. आता काय करू?? खूप गयावया केले, त्याच्या हातापाया पडलो.. त्याला काय वाटले काय माहित, मला बोलला भांडुप आणि विद्याविहार ट्राय कर.. तिथे रॉकेल झेरॉक्स नावाचा प्रकार असतो, ते करतील। तसाच गेलो भांडुपला। तिकडे स्टेशनच्या बाहेर असे झेरॉक्सवले होते.. मी ते दृश्य पाहून सुन्न झालो होतो.. दुकानांवर बोर्ड होते : “100 Copy 25 Paise”..
एकाला गाठले, त्याला सांगितले 4000 कोपीज आहेत। तो बोलला आता देऊन जा उद्या सकाळी कॉलेक्ट कर। पण इतकी सारी पुस्तके कशी मार्क करणार। चूक होई शकली असती। आई ला पीसीओ वरून फोन केला आणि रात्री येत नाही सांगितले। रात्रभर त्याच्या बरोबर बसून झेरॉक्स मारल्या। खूप उशीर झाला होता। त्यानेच स्टेशनला एका गाडीवर जेवण घातले। 40/- पोटभर जेवण। खूप टेस्टी लागले.. हिशोब केला.. सकाळी पहिल्या गाडीने घरी आलो.. आईला भेटलो आणि परत निघालो.. कॉलेजला पोचलो। ज्याचे त्याचे सारे झेरॉक्स दिले। सगळे खुश होते माझ्यावर.. खिशात 1150/- खुलखुलत होते.. मेसचे पैसे आधी दिले। एक महिना आईचे प्रेशर कमी केल्याचा आनंद होत.. मग गेलो मिसळ खायला तांडेल कडे.. ऑर्डर केली, एक तिखट मिसळ…
तांडेल ने विचारले, “काय रे एकटाच??”
पहिल्यांदा एकटा अख्खी मिसळ एकट्याने खाल्ली। आधी किमान 3 मित्र बसायचो। रस्सा फ्री असतो ना। शेअर करायचो। परवडायचे.. आजही आठवते..