एक वेगळा केनया!

बरेच लोक केनियाने पाठवलेल्या १२ टन धान्याची थट्टा करीत आहेत. केनियाला सोशल मीडियावर “भिकारी, गरीब देश” अशी तर भारताला त्यांनी मदत पाठवली म्हणून त्या आडून मोदींना नको नको ती दूषणे दिली जात आहेत. … आता केनियाबद्दल एक छोटीशी कथा ऐका..

तुम्ही अमेरिका, मॅनहॅटन, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ओसामा बिन लादेन ही सर्व नावे ऐकली असतीलच. बहुतेक लोकांनी हे ऐकले नसेल, ते म्हणजे ‘केनिया आणि टांझानियाच्या सीमेवर पडणारे ‘इनोसाईन’ गाव आणि येथील स्थानिक जमात म्हणजे “मसाई”!

मसाई लोकांपर्यंत अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्याची बातमी पोहोचायला कित्येक महिने लागले. तिथेच जवळच्या गावात राहणारी आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी किमेली नाओमा सुट्टीवर जेव्हा केनियाला परत आली तेव्हा तिने मसाईच्या स्थानिक जमातीला ९/११ च्या हल्ल्याविषयी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली घटना सांगितली तेव्हा ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली.

एखादी इमारत इतकी उंच असू शकते की ती पडली तर तिच्याखाली गाडली जाऊन इतकी माणसे मरू शकतात वगैरे गोष्टी सध्या झोपडीत राहणाऱ्या त्या मसाई लोकांसाठी अविश्वसनीय होत्या. परंतु तरीही त्यांना त्या हल्ल्यात सापडलेल्या अमेरिकी लोकांबद्दल वाईट वाटले आणि त्याच विद्यार्थिनीच्या माध्यमातून केनियाची राजधानी नैरोबीमधील अमेरिकन दूतावासाचे उपप्रमुख विल्यम ब्रॅंगिक यांना एक पत्र पाठवले. त्यांनी ते पत्र वाचले.

विल्यम ब्रॅंगिक प्रथम विमानात चढले. काही काळ हवाई प्रवास आणि मग तिथून मसाई जमातीच्या गावाला जाण्यासाठी अनेक मैलांचा मोडक्यातोडक्या वाटेने प्रवास करत ते तेथे पोहोचले.

गावात पोहोचल्यावर, मसाई लोक एकत्र जमले आणि त्यांनी सोबत १४ गायी घेऊन ते अमेरिकन दूतावासाच्या उपप्रमुखांकडे पोहोचले. मसाई जमातीच्या एका जेष्ठ पुरुषाने गाईंचा दोर त्या उपप्रमुखांच्या हातात देऊन एका फलकाकडे बोट दाखवलं. त्या फलकावर काय लिहिले होते ते तुम्हाला माहिती आहे?

त्यावर लिहिले होते –

“या दु:खाच्या घटनेत अमेरिकेच्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही या गायी दान करीत आहोत”.

होय, ते पत्र वाचल्यानंतर, जगातील सर्वात सामर्थ्यवान आणि संपन्न देशाच्या राजदूताने चौदा गायींचे दान गोळा करण्यासाठी शेकडो मैलांचा प्रवास केला होता.

पण पुन्हा प्रश्न उद्भवला तो गायींच्या वाहतुकीची अडचण व कायदेशीर बंधने ! या दोन्हीमुळे त्यांनी गायी नेण्यात असमर्थता दर्शवली परंतु त्या सर्व गाई विकून त्यातून येणाऱ्या रकमेतुन एक दागिना किंवा आभूषण खरेदी करून त्यास मसाई लोकांच्या कृतज्ञते बद्दल ९/११ च्या मेमोरियल म्युझियममध्ये ठेवण्यात येईल असा प्रस्ताव ठेवण्यात आला.

पण ही गोष्ट अमेरिकेतील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्यावर काय घडलं माहित्ये?

त्यांनी आभूषणांच्या जागी गायीच स्वीकारण्याचा आग्रह धरला. मग ऑनलाईन याचिकांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या की त्यांनी गाय ठेऊन घ्याव्या, आभूषणे करू नयेत.

मग अधिकाऱ्यांना, नोकरशहांना ईमेल पाठवल्या गेल्या, राजकारण्यांशी चर्चा केली गेली, आणि लाखो अमेरिकन लोकांनी या अभूतपूर्व प्रेमाबद्दल मसाई जमातीचे आणि केनियाच्या जनतेचे आभार मानले आणि त्यांचे अभिनंदन केले, आणि गायी स्वीकारल्या.

दान देणाऱ्याच्या हृदयाकडे पहा, त्याच्या भावना पहा. लहान लहान खड्यांकडे पाहू नका, ते लहान खड़े उचलून रामसेतु निर्माणकार्याला हातभार लावणाऱ्या खारीची श्रद्धा पाहा.

#सुदाम्याचे_पोहे #दानशूरकेनिया

राजीव शुक्ला यांच्या मूळ हिंदीतील लेखाचे मित्रवर्य Rahul Suryakant Boke यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या पोस्टमध्ये अर्थाला धक्का न लावता काही संपादन करून सादर.

मी ह्या देशात राहून आलेलो आहे. खरेच खूप गरीब देश. पण त्यांची ही “Originality” खूपच वेगळी आणि स्तुत्य आहे. माझा लग्नाच्या वेळेस केनयामधील एक दांपत्य भारतात आले होते. त्यांना आईने केलेले बेसनचे लाडू खूप आवडलेले!

Leave a Reply