लग्नातील उनाडक्या!

माझा बायकोच्या चुलतभावाच्या लग्नातील धमाल किस्सा!

घरचेच लग्न असल्याने फॅमिलीमधील अनेक परीचीत होते. आमचा साधारण मागच्यापुढच्या वयाच्या भावंडांचा मोठा ग्रुप होता. अर्धे लग्न झालेले आणि अर्धे लग्नाळू. काम काहीच नव्हते. फक्त एकमेकांच्या खोड्या काढायच्या, त्रास द्यायचा हेच चालु होते. कुणाला तरी मेकअप वरून चिडव, कुणाला अजून लग्न झाले नाही म्हणून चिडव, कुणाच्या मुलाला रडव आणि आई-बाबांना कामाल लाव असे धमाल चालू होते. मी असले माकडचाळे करण्यात आघाडीवर असतो..

नमिताच्या, माझा बायकोच्या भावाचे म्हणजे अजीतचे लग्न. मुलगी दिसायला छान होती. स्वभाव देखील छान. एकूणच स्थळात नाव ठेवण्यासारखे काही नव्हते. तर असेच खोड्या काढताना मी म्हटले, “अजीतला जॅकपॉट लागला नाही..” .. ह्यावरून चर्चा चालू झाली की अजीत कसा साधा सरळ करीअरीस्ट आणि त्याला ही कशी मिळाली इ इ .. तर त्यावर मी शेवटची कमेंट केली, “थोडी थांबली असती तर जरा चांगला नवरा मिळाला असता ना?” .. नमिताने मला एक फटका दिला.. दोन मेहूण्यांनी खुन्नसने पाहीले.. त्यांच्या भावाला बोललो ना.. झाले तो विषय तिथे संपला..

मग आम्ही गेलो अभिनंदन करायला. मी, नमिता, माझा मुलगा शानू आणि काही जण असे एकत्रच होतो. गेलो स्टेजवर आणि अभिनंदन वगैरे केले.. शानू लहान होता. तिने/नववधूने शानूला उचलून घेतले आणि त्याची पापी घेतली.. आमचे वीर पचकले, “ए काकी तू थोडी थांबलीस का नाही, चांगला नवरा मिळाला असता ना? काय घाई होती का तुला??” … भयाण शांतता.. सगळे चिडीचूप.. सगळ्यांनाच कळले होते की खोड्या अंगाशी आल्यात.. पण वहीनी खूप स्पोर्ट होती.. एकदम हजरजबाबी.. पटकन म्हणलाी, “अरे तू भेटला नाहीस ना आधी. मग हा भेटला तर करून घेतले लग्न. आधी भेटला असतास तर तुझाशीच केले असते..” .. सगळे जोरात हसायला लागलो.. एका क्षणात सारे प्रेशन रिलीज झाले…

खाली आल्यावर तरी एकजण पचकलाच.. “खरेच जॅकपॉट रे…”

Leave a Reply