पहिले म्हणजे बुद्धीबळ खेळल्याने बुद्धी वाढत बिढत नाही. मुळात हा बुद्धी असल्यानंतरच खेळता येणारा खेळ आहे. आणि सर्वांना बुद्धी असते असे म्हणणे म्हणजे सर्वांना शेपूट असते असे म्हणण्यासारखे आहे.. बुद्धीचे विवीध भेद आहेत. प्रज्ञा, प्रतिभा, तरल बुद्दीमत्ता, तर्क..
माझा मुलगा आठ वर्षाचा आहे. बायकोने हट्टाने इंग्रजी मिडीयमला ऍडमिशन घेतलीये (कृपया ह्यावर चर्चा नको.) पण ह्यामुळे मला मोठ्ठे टेस्टींग ग्राऊंड मिळाले आहे.. कसे?? मिडीयम कुठलेही असो, माहिती तर मिळतेच. मी ज्ञान मिळत नाही हा. माहिती. भाषा, इतीहास, भुगोल, विज्ञान आणि गणित हे वेगवेगळे असले तरी आहेत तर माहित्याच ना.. जर ह्या तुम्हाला कळल्या, उमजल्या तर ते झाले ज्ञान.. उदा. वस्तू खाली पडते ही माहिती. गुरूत्वाकर्षण हे ज्ञान.. नक्की किती वेगाने हे विज्ञान.. त्याचा फायदा घेण्यासाठी तंत्रज्ञान आणि गणित..
तर आपण होतो माझा मुलावर.. साहेब तिसरीत आहेत. चौदापर्यंत पाढे पाठ. गणितात प्रोग्रेस कार्डवर कायम A or A+ .. मी त्याला म्हटले ही घे ५ चॉकलेट्स.. असे ४ सेट तुला दिले तर टोटल किती चॉकलेट्स दिले? साहेबांनी एक दोन तीन चार पाच .. आठ… अकरा.. तेरा. .. सोळा … अठरा एकोणिस .. विस! असे मोजले.. आता सांगा माहितीचे ज्ञानात, विज्ञानात रुपांतर झाले का? पाढे आले.. कळले का? वापरता आले का??
हा बुद्धीचा एक भेद सांगीतला.. ज्यात आपण फक्त आपल्याला माहित असलेली माहिती “वापरू” शकतो का? आता ही किती प्रभावीपणे वापरू शकतो ह्यातून ठरतो तुमचा बुध्यांक किंवा आयक्यू – intelligence quotient! कसा? दोन प्रकारे.. ज्यांना लहानपणीचे पाढे पक्के आठवतात आणि बिजगणीत चांगले होते ते दुकानात, भाजीवाल्याकडे पटापट आकडेमोड करतात पहा.. १८ + ३५ + ५२+ ८३+ १६+ ३७ हे तुम्ही वाचता वाचता पटापट करू शकत असाल तर हे बरीज वजाबाक्या तुमच्या डोक्यात फिट् बसल्यात. एक स्टेज पुढे तुम्हाला तीन आकडी, मग ४-५-६ आकडी बेरजा, वजाबाक्या लिलया सोडवता येतात. मुख्य म्हणजे जेव्हा असे तुम्ही करता तेव्हा तुम्ही मेंदूचा मोठा भाग वापरात आणता.. हातचे लक्षात ठेवायला, आकडेमोड करायला .. जितका मोठा भाग तु्म्ही वापरता आणू शकता तितक्या तुमचा प्रोसेसेस वाढतात आणि वेळ कमी लागतो.. उत्तर फास्ट मिळते.. अर्थात तुम्ही जास्त हुशार..
ह्या नंतरचा बुद्धीचा प्रांत म्हणजे नियमांबरोबर अधिकाधीक अनुभच लक्षात ठेवणे.. आपण व्यापार खेळतो. तेव्हा अनेकदा आपल्याला ऑड भाडी भरावी लागतात. समजा भाडे आहे ३७/- आणि तुमच्याकडे आहेत २००ची नोट तर आपण मोजतो आणि परत करतो १६३/- हे मोजायला समजा तुम्हाला ३ सेकंद लागले.. पुन्हा असाच प्रसंग येतो आणि परत ३७/- भाडे, २००ची नोट .. तेव्हा परत तु्म्ही ३ सेकंद घालवणार की तुमच्या लक्षात आहे १६३?? आणि अशी किती कॅल्कलेशन्स किंवा “रेडी उत्तरे” तुम्ही लक्षात ठेऊन ती पटापट वापरू शकता? जसे हे प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर पहा अनेकदा आपल्याला दिसते की पत्रकार, वकील प्रश्न विचारताना किंवा विषय मांडताना अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या घटना संदर्भासहीत अचुक वापरतात आणि समोरच्याला निरूत्तर करतात.. असेच जण पुढे स्टारडम मिळवतात बाकीचे बातमीदार किंवा होतकरू रहातात.. हे घडते बुद्धीचातूर्यांच्या एका एँगलने जिथे तुम्ही तुमचा अनुभव/ज्ञान वापरता आणि वेळ ट्रेडऑफ करता..
ह्याच्या पुढील लेव्हल म्हणजे तर्क.. वरचेच उदाहरण द्यायचे तर तुम्ही २००ची नोट देणार हे गृहीत धरून आधीच १६३ रेडी ठेवायचे.. अर्थात हे उदाहरण खूपच बकवास आहे.. पण तर्क ही बुद्धीची एक वेगळीच स्वतंत्र शाखा आहे.. अनेकदा अनेक प्रचंड बुद्धीमान लोक तर्काच्या कसोटीवर उतरत नाहीत. ह्या उलट e = mc2 किंवा सापेक्षतावाद, थिअरी ऑफ टाइम, इतर डायमेंशन इ. अनेक थिअरीज तर्काच्या आधारावर आहे. आणि गंमत पहा… न्यूटन सारख्या प्रचंड विद्वानाने मांजरीसाठी मात्र दोन भोके केलेली…
ह्या सर्वाहून पॉवरफूल म्हणजे जेव्हा असा प्रसंग येतो, जो पुर्वी कधी आलाच नाही, तुमच्याकडे रेडी अनुभव नाही, कॅल्क्युलेशन कसे करायचे ह्याची दिशा देखील नाही.. तेव्हा पूर्णपणे नविन काहीतरी शोध लावणे.. “नवनवउन्मेष शालिनी प्रतिभा” … जसे आज कोरोना वर काम करणारे वैज्ञानिक.. खरे तर कोरोना वर काम करणाऱ्या लोकांमधे तुम्हाला बुद्धीमत्तेचे वरील अनेक कंगोरे दिसतील.. अनुभव पणाला लावणे, तर्क करणे, धाडसी प्रयोग करून पाहणे, निरीक्षण करत आपले प्रयोग बदलत नेणे व नवनवउन्मेषशालीनी!
जर हे पटले असेल…
बुद्धीबळ तुम्हाला हे सारे करायला देते. ६४ च घरे. ६ च प्रकारच्या सोंगट्या ज्यांचे मुख्य ६ नियम.. टोटल मला वाटते २०-२२ नियम असावेत, मोजत बसत नाही, आणि दोन रंग.. पण चेसमधे एकदा खेळलेला खेळ परत कधीच खेळला गेला नाही. असे म्हणतात की सारे “चांगले” व्हेरीएशन एकदा खेळायचे असे ठरवले तर एकदा खेळलेला खेळ परत खेळायला २.५ कोटी वेळा खेळावे लागेल.
- बुद्धीबळ प्रथम तुम्हाला एरीआ फोकस करायला शिकवते.
- ठरलेले फिक्स नियम आहेत. ते तुम्हाला “समजतात” का? फिडेचे नियम.. गल्लीत तुम्ही कसेपण खेळा त्याला अर्थ नाही. आपण गल्लीत एक टप्पा आऊट पण खेळतो.. त्याला क्रिकेट म्हणता येणार नाही..
- तुम्हाला ते नियम वापरून प्लॉट बनवता येतो का, समोरच्याच्या चालीला योग्य प्रकारे ऍड्रेस करून डिफेंड करता येते का? समोरचा असेच का खेळला हे तुम्हाला ३-४ मुव्हतरी आधी कळते का? तुम्हाला समोरच्याची किमान पुढील ४-५ मुव्हजची सारी व्हेरीएशन तर्काने तयार करून त्यानुसार उत्तम पर्याय निवडून त्याला जेरीस आणता येते का??
- हे सारे तुम्हाला कमीत कमी वेळात आणि दर वेळी वेगळ्या पद्धतीने करता येते का??
- चेसच्या अॅकडमिक ओपनिंगच्या बाहेरची ओपनिंग आली तर तुम्ही ती हाताळू शकणार का??
- समोरच्याचा चुका तुम्हाला कळतात का? आणि त्याचा फायदा घेता येतो का??
- समोरचा तुमच्यापेक्षा वयाने, अनुभवाने कितीही मोठा असला तरी तुम्ही त्याच्याशी दडपण न येऊ देता नैसर्गिक खेळ खेळू शकता का??
जर हे सारे जमत असेल तर बुद्धीबळ येते असे मी म्हणेन. बॉलला बॅट मारता आली म्हणजे क्रिकेट आले का?? तसेच फक्त सोंगट्या सरकवता आल्या म्हणजे चेस आले असे नाही? आणि जर तुम्हाला चेस आला, तर सर्वात महत्वाचे म्हणजे ही सारे तत्वे, अनुभव, तर्कशास्त्र, फोकस तुम्ही प्रत्यक्ष जीवनात देखील अनुकरू शकता आणि तुमचे जीवन समृद्ध होते. अनेक मोठ्या कंपन्यांचे CEO, अनेक वैज्ञानिक, अनेक फिलॉसॉफर चेस खेळतात… ते कदाचीत फिडेच्या लिस्टमधे नसतील. रेटेड नसतील .. पण त्यांना चेस कसा आणि का खेळावा हे कळलेय.. त्यानी जिवनात तो अनुसरलाय.. म्हणून ते तिथे आहेत जिथे ते असायला हवे..