कालीमातेच्या पायाखाली महादेव कसा?

आख्यायिका अशी की जेव्हा शुंभ-निशुंभ नावाच्या राक्षसांनी इंद्रपद हिरावले आणि सर्व देवांना त्राही त्राही करून सोडले तेव्हा सर्व देवतांना शक्तीस्वरूपीणी भगवती देवीची आठवण झाली व ते उपासनेला बसले. बहुतेक कैलासावर. तिथे पार्वतीदेवी प्रकट झाली व शंकराला म्हणाली, “स्तोत्र माझेच हे गाती, शुंभाने तुच्छ लेखीले. पराभूत निशुंभाचे एकत्र सर्व देव हे”.. आणि मग “पार्वती पासोनी तेथे अंबिकोद्भव जाहीला, कौशिकी नाम ह्यासाठी प्राप्त झाले तिला जगी” .. तर ही कौशिकी जो मातेचा तिसरा अवतार समजला जातो ज्याचा जन्म शुंभ-निशुंभ राक्षसांच्या वधासाठी झाला.. पुढे असे आहे, “कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी जाहली. हिमाचलावरी कालीका सर्वत्र ख्याती जाहली” .. म्हणजे कौशिकीच्या जन्माने आणि तेजाने साक्षात हिमगौरी पार्वती काळी जाहली आणि त्यामुळे तिला कालीका हे नाव मिळाले. ही कालीका दहा महाशक्तींपैकी एक, आणि सर्वात उग्र समजली जाते. उग्र म्हणजे रागीट, तामसी आणि भयंकर… ह्या नंतर देवीमहात्म्यात कालीचा अनेक वेळेस उल्लेख आहे..

शुंभ निशुंभाच्या युद्धाच्या सुरूवातीलाच काली प्रकट होते आणि शंकराला आदेश देते की तू स्वत: शुंभ-निशुंभाकडे जा आणि त्यांना माझा संदेश दे की स्वर्ग आणि इंद्रपद सोडून पाताळात जा नाहीतर तुमचा समाचार घेऊ.. इथे एक पहाण्यासारखे आहे की शंकर हा हिंदू धर्मात सर्वोच्च अधिकारी समजला जातो. पण त्या शंकराला जी आज्ञा देऊ शकते अशी आदिशक्ती, जिला ह्या प्रसंगानंतर “शिवदुती” नावाने गौरवण्यात आले ती सर्वोच्च शक्ती आहे. तिच्यापासूनच सर्वांचा उगम आणि लय आहे. देवीमहात्म्यमधील महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही तिन्ही मूळ आदीशक्ती जगदंबेचीच रुपे, ज्यांनी वेळोवेळी दानवसंहारासाठी अवतार घेतले!

ह्या नंतरच्या प्रसंगात जेव्हा धूम्रलोचनाचा वध कौशिकी करते तेव्हा शुंभ-निशुंभ आपल्या सर्वोत्तम योद्ध्यांपैकी चंड-मुंड नावाच्या भावांना युद्धावर पाठवतात. दोघेही भयंकर असे दैत्य जेव्हा चालून येतात तेव्हा कौशिकीचा राग अनावर होतो आणि परत तिथे चंडीका रुपाने काली स्वत: प्रकट होते आणि दोघांची मुंडकी कापून आणते. केवळ रुद्रपराक्रमी अशी ही चंडीका म्हणजेच आदिमाया कालीका ह्या प्रसंगामुळे “चामुंडा” नावाने प्रसिद्ध होते.. कौशिकी कौतुकाने तिला म्हणते, “चामुंडा म्हणूनी लोकी, तुझी सत्किर्ती होईल” …

नंतर रक्तबीज नावाचा सेनापती युद्धात उतरतो. हा समरप्रसंग भयानक आहे. अनेक प्रकारे अर्थपूर्ण आहे. रक्तबिजाला वरदान असते की त्याच्या शरीरातून रक्ताचा थेंबही जमिनीवर पडला तर तितके सारे रक्तबीज राक्षस जन्माला येतील. त्यामुळे त्याला मारणे शक्य नसते. त्याच्या संहारासाठी सात मातृशक्ती युद्धक्षेत्री प्रकट होतात. विवीध देवतांच्या तत्वरूप शक्ती मातृ/स्त्री स्वरूपात प्रकट होतात. इंद्रापासून ऐंद्री, ब्रम्हापासून ब्रम्हाणी, विष्णू पासून वैष्णवी, शंकरापासून माहेश्वरी, वरहा पासून वाराही, नरसिंहापासून नारसिंही, कार्तीकेया पासून कौमरी अशा कौशिकी आणि चामुंडेच्या सहाय्याला उपस्थित होतात. मग घनघोर युद्ध होते आणि साऱ्याजणी मिळून रक्तबीजावर अनेक वार करतात. पण त्यामुळे जिकडे तिकडे रक्तबिजाचे रक्त पडते आणि त्यातून असंख्य रक्तबीज जन्माला येतात. विषाणूचा प्रसार व्हावा असे काहीसे हे असते. ह्यामुळे सर्व देवतागण घाबरतात. त्यावेळेस कौशिकी कालीला विनंती करते की तू तुझे तोंड उघड आणि जीभ सगळीकडे पसर. जिथेजिथे रक्तबीजाचे रक्त पडेल तिथे ते प्राशन कर. अशाने नविन राक्षस जन्माला येऊ शकणार नाही. अशा प्रकारे रक्तबीजाच्या संहारासाठी कालीका भयंकर रूप धारण करते आणि जीभ पसरून रक्तबीजाचे सारे रक्त प्राशन करते. पण अशाने तिच्यातील तामसी वृत्ती प्रचंड वाढते व ती भयानक दिसू लागते व संहार करू लागते. ह्यामुळे देवता भयभीत होतात की सृष्टीचा नाश होईल. म्हणून ते शंकराला विनंती करतात की हिला आवर. पण तिच्या पराक्रमापुढे आणि तेजापुढे साक्षात भगवान शंकराचा देखील पाड नसतो .. म्हणून शंकर लीन होतो आणि तिच्या वाटेत आडवा पडतो. जेव्हा कालीचा पाय शंकरावर पडतो तेव्हा मातृशक्तीला भान येते आणि ती शांत होते.. म्हणून शंकराच्या अंगावर पाय ठेवून कालीकेचे रूप दर्शवतात. एकाच वेळेस प्रचंड पराक्रम, साहस, तमोगुण, संहार आणि मातृत्व, संयम, भान अशा परस्पर विरोधी भावनांचे एकत्र प्रतिक असलेले हे महाकाली रूप आहे.

ह्या नंतर देवीमहात्म्यात माझा सर्वात आवडता प्रसंग आहे… रक्तबीज वधानंतर शुंभ-निशुंभ स्वत: युद्धासाठी येतात. दोघेही भीमपराक्रमी. आधी निशुंभ सर्व मातृशक्तींना पराभूत करतो आणि देवीवर असंख्य चक्रे सोडतो. देवी झाकोळली जाते. पण ती त्यातून बाहेर पडते आणि निशुंभाचा वध करते. मग शुंभ चालून येतो आणि तिला म्हणतो, “गर्वांध होशी का दुर्गे? मान्यता व्यर्थ ही तुझी.. सहाय्य तुज सर्वांचे तेणे विजय हा तुझा” .. म्हणजे तुला अनेक देवतांचे आणि मातृशक्तींचे सहाय्य आहे म्हणून तुला हा विजय मिळतोय, तर गर्व करू नको.. त्यावर साक्षात भगवती म्हणते, “दुष्टा अन्य नसे कोणी, मीच मी एकटी जगी. माझ्या विभूती या साऱ्या मद्रुपी मिळती पहा” … हे माझे देवीमहात्म्यमधील सर्वात आवडते वाक्य. काय असते लिडरशीप! काय असते जबाबदारी आणि त्याचे भान.. काय असते स्वयमेव मृगेंद्रता.. केवळ अप्रतीम. आणि स्वत: देवी उवाच.. आणि ह्या नंतर सर्व मातृशक्ती देवीमधे विलीन होतात आणि एकटी भगवती रणक्षेत्री शुंभाला दिसते. तेव्हा ती त्याला म्हणते, “एकटी मी रणी येथे, स्थिर व्हावे तुवा शुरा..” … आणि मग त्याचा पाडाव करते..

हे “एकटी मी रणी येथे, स्थिर व्हावे तुवा शुरा..” मला वैयक्तीक जीवनात देखील प्रचंड आवडते आणि देवी कृपेने काही वेळेस आचरणात आणायला मिळाले आहे!

Leave a Reply