“नीरा” ही नारळाची, ताडाची इ. ताड फॅमिलीमधील झाडांची काढतात. ह्याला “सॅप” असेही म्हणतात. मला फक्त नारळाची नीरा माहित आहे. मी त्यावर बोलतो. ह्यातील अनेक विषय इतर नीरांना देखील लागू पडतील..
नीरा म्हणजे नारळाच्या पोयीमधील रस. नारळाला दर महिन्याला एक पोय फुटते. ह्याच्या पुढील भागात पुंकेसर असते तर मागील भागात स्रीबिजे असतात. ह्या बिजांडांवर जेव्हा पुंकेसर पडतात तेव्हा संकर होतो आणि बिजांडांचा नारळ बनतो. हे सारे एका कडक आवरणात झाकलेली असतात. ह्याला पोय म्हणतात. एक प्रकारे नारळाची कळीच म्हणा..
आता हे लक्षात घ्या की ह्या कळीतून अनेक नारळ निघतात. एका कळीतून किमान ८-१० ते २०-२५ नारळ देखील निघतात. … एका नारळात सोडण असते ज्यापासून सर्वात उत्तम प्रतीचे जिओफायबर मिळते. आणि कोकपिट हे मातिविरहीत शेतीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. आत असते करवंटी ज्यामधे सर्वात जास्त लिग्नीन असते व ही जगातील सर्वात कडक गोष्ट समजतात जी सहज डिकंपोज होत नाही. हिच्यापासून उत्तम दर्जाचा ऍक्टिव्हेटेड कार्बन बनतात. ह्याची कॅलोरीफिक व्हॅल्यू खूप जास्त असल्याने करवंट्या किंवा करवंटीचा कोळसा (शेल चारकोल) फरनेस आणि बॉयलर पेटवायला वापरतात. त्यात असते खोबरे म्हणजे नारळाचा गर. खोबऱ्याचे अनेक गुणधर्म आहेत. सर्वात महत्वाचा इकडे मांडतो. खोबऱ्याच्या दुधात लॉरीक ऍसिड असते जे केवळ मातेच्या स्तन्य दुधात आढळते आणि अर्भकांची रोगप्रतिकारशक्ती घडवायला मदत करते. स्तन्य दुधाव्यतिरीक्त हे केवळ नारळाच्या दुधात आढळते. पुढे असते नारळाचे पाणी ज्यात अनेक मिनरल्स आणि ऍँटीऑक्सिडंट असतात. शहाळ्याचे पाणी सलायनला पर्याय म्हणूनही वापरतात! अशा नारळाला म्हणतात कल्पवृक्ष!
आता हे पुराण सांगायचे कारण म्हणजे हा बहुगुणी नारळ ज्या पासून बनतो ती ही पोय! ह्या पोयीमधे सोडणापासून पाण्यापर्यंतचे सारे गुणधर्म एकवटलेले असतात. … तर मानवप्राणी हुशार. पोय आली आणि बरी मोठी झाली की तिला उघडू देत नाही. तिला घट्ट बांधतो आणि वर टोकाला एक काप मारतात. त्यामुळे पोयीमधील “रस” थेंबथेंब गळू लागतो. ही असते नीरा. प्रचंड गुणकारी. जणू अमृतच..
पारंपारीक रित्या नीरा अगदी पहाटे उतरवतात. त्यासाठी उशीरा संध्याकाळी चुना लावलेली मडकी पोय़ीला बांधून कट मारतात आणि रात्रभर नीरा जमा करून भल्या पहाटे, सूर्य उगवण्यापूर्वी उतरवतात. सूर्यकिरणे ाली की वातावरणात उष्णता पसरते. नीरा प्रचंड व्होलाटाईल असते. थोडीशी उष्णता आणि नीरेमधे बदल घडतात, किण्वन प्रक्रीया जोर पकडते आणि नीरेची दारू बनते जी ताडी किंवा माडी म्हणून ओळखतात..
कुणीही कितीही सांगतले तरी शुद्ध पारंपारीक पद्धतीने शुद्ध नीरा प्राप्त होत नाही. टिकवता तर अजिबात येत नाही. त्यासाठी त्यावर प्रक्रीया तरी करतात किंवा त्यात प्रिजर्वेटीव्ह मिसळतात. बाजारात मिळणारी नीरा मुख्यत्वे ताडाच्या झाडाची आणि खूप जास्त प्रमाणात साखरेचे पाणीच असते.
CPCRI, Kasargod येथील शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र हेब्बार ह्यांनी शुद्ध नीरा झाडावरून उतरवण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत केले आहे. ह्यामधे एका मोठ्या कंटेनरमधे बर्फ ठेवून अत्यंत थंड वातावरणात नीरा गोळा करतात आणि थंड असतानाचा ताब्यात घेतात व तात्काळ डीप फ्रीज करतात..
अशा प्रकारे अत्यंत शुद्ध आणि गुणकारी नीरा मिळते. ही टेस्ट करायला तुम्हाला कासरगोडला जावे लागेल. माझा माहितीमधे तरी महाराष्ट्रात नीरा प्रकल्प नाही..
आता तुम्हाला वाटेल नीरेचे काय इतके कौतूक! तर ह्या नीरेपासून साखर बनते. ह्या साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स उसाच्या साखरेच्या एक दशांश असतो. म्हणजे डायबेटीक लोक देखील बचकाभर साखर खाऊ शकतात. शिवाय ह्यात असतात किटोन्स आणि मिनरल्स. त्यामुळे ही बनते आरोग्यवर्धक साखर.. अहो तुम्ही ही पाहिलीये. मोठ्या स्टार हॉटेलमधे, अगदी मॅकडी मधे ब्राऊन कलरची जी साखर असते ती ही नीरेची साखर…
ताडाच्या निरेची देखील साखर बनते पण तितकी चांगली लागत नाही..
आता सर्वात महत्वाचे… जगासमोर एक मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. नविन पिढीमधे अशी मुले जन्माला येत आहेत जी “जन्मत:” डायबेटीक आहेत. ह्यांचा प्रॉब्लेम म्हणजे मार्केटमधे असणाऱ्या बहुतेक गोड वस्तू, मुलांच्या आवडत्या सर्व गोष्टी, जसे की चॉकलेट आईसक्रीम ज्युसेस इ इ सारे ह्या बाळांसाठी केवळ विष आहे! आता?? ह्यावर उपाय आहे नीरेची साखर…
हे आव्हान ओळखून एका अमेरिकन उद्योजकाने इंडोनेशीयामधील शेतकऱ्यांना संघटीत केले व त्यांना नीरेचे महत्व पटवून इंडोनेशीया मधे अक्षरश: क्रांती घडवली. हजारो शेतकरी व लाखो नारळाची झाडांवरून तो नीरा उतरवतो, त्याची साखर बनवतो व जगभरात पुरवतो. ह्या स्थानिक शेतकऱ्यांचा त्याला प्रचंड विरोध होता कारण तो होता गोरा. त्याने त्यांच्यासाठी तिथे मंदीर बांधले. त्या मंदीरात त्यालाच बिचाऱ्याला प्रवेश नव्हता. मग एक शाळा बांधली.. असे करत करत मघ उभी राहीली बिग ट्री फार्मस! आणि तो उद्योजक म्हणजे बेन रिपल्स ज्याला प्रत्यक्ष भेटायचा आणि बरोबर कॉफी प्यायचा योग आला इंडोनेशीया दौऱ्यात. त्या कॉफीमधे साखर ह्या नीरेची होती!
Home – Big Tree Farms
LEARN MORE Our Goods Big Tree Farms family of products are organic, ethically sourced and offer healthier alternatives to the norms. COCONUT…Read More…
इति नीरा पुराण समाप्त!