गांधीगिरी

मी सावंतवाडीला रहात असताना घडलेली घटना. बांद्याला रहाणाऱ्या एका पत्रकाराशी माझी ओळख झालेली आणि मैत्री झाली. त्याला माझे विचार आणि काही लेख (नारळ, शेती इ. विषयातील) खूप आवडले. त्याने मला एका चांगल्या व्हाट्सॅप ग्रुपमधे ऍड केले जिथे अनेक पत्रकार, काही लेखक, काही लोक स्थानिक प्रतिनीधी होते… त्या ग्रुपवर विवीध चांगल्या गोष्टी चर्चेला येत असत. आणि इतर ग्रुप्सवर चालतो तसा GM/GN इ. फालतू मेसेजेस देखील असायचे. शिवाय स्थानिक बातम्या इ.

एके दिवशी त्या ग्रुपवर अशा आशयाचा मेसेज आला की “आंबेडकरांचे इतके कौतूक करतात, ते संविधान काय त्यांनी एकट्याने लिहीले नाही. अनेकांची त्यांना मदत होती. खूप मोठी कमिटी होती जीने शिफारसी केल्या आणि संविधान लिहीले. फक्त आंबेडकरांचे नाव पुढे आले पण प्रत्यक्ष त्या संविधानात त्यांचे विशेष काही योगदान नाही.” सूज्ञ वाचकांच्या सूर आणि ह्या मागचे पुरस्कर्ते लक्षात आलेच असतील. मी गांधी आंबेडकर फुले आगरकर सावरकर भगतसिंग सर्वच क्रांतीकारकांना मानतो आणि त्यांच्या त्यांच्यात कोण मोठा कोण लहान, कोण ब्राम्हण नेता कोण मराठा असले मला काही कळत नाही. त्यावेळी भारताचे स्वातंत्र्य हा मुख्य उद्देश होता आणि प्रत्येकाने त्याच्या परीने जे होईल ते केले. इतिहासाचा पिट्टा पाडून कितीही आकांडतांडव केलात तरी ह्यापैकी कुठल्याच नेत्याच्या निस्सीम राष्ट्रभक्तीवर तुम्ही शिंतोडे उडवू शकत नाही आणि ते करायचे पाप कधी करायचे नाही हे माझावर असलेले मुलभूत संस्कार..

मला तो विषय खटकला.. मी पूर्वी थोडे आंबेडकर वाचलेले आहेत आणि आंबेडकरच नाही पण हे सारे सुधारक, क्रांतीकारक नेहमी मला मोहीनी घालतात. गांधीजींचा आणि त्यांच्या सत्यवचन, आत्माची उन्नती, सदाचरण, अहिंसा इ. गोष्टींचा माझावर प्रचंड प्रभाव आहे. लहानपणी क्रांतीकारक, संतमहात्मे, शिवाजी महाराज अशी अनेक चरीत्रे वाचली आहेत… संविधान लेखन कमीटी आणि त्यात झालेले गोंधळ आणि आंबेडकरांनी ते कसे केले हे सारे वाचलेय. ह्याची सुरूवात खरे तर जेव्हा नेहरूंनी हे काम एका इंग्रज अधिकाऱ्याला द्यायचे ठरवले तेव्हा आहे. अनेक विषयात मतभेद असताना देखील गांधीनी हे काम पूर्ण विश्वासाने आंबेडकरांकडे सोपवायला लावले. आणि आंबेडकरांनी अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करून, समाजवाद साम्यवाद इ. गोष्टी निट अभ्यासून, आरक्षण सारख्या विषयांचा देखील सखोल अभ्यास करून संविधानाची रचना केली. खरे तर बहुजन समाजातील एक व्यक्ती जिने जातिव्यवस्थेवर आधारीत समाजरचनेचे चटके सहन केले त्या व्यक्तीने हे लिहील्याने आपले संविधान सर्वस्पर्षी आणि समावेशक झाले. एखाद्या इंग्रजाने किंवा सवर्णाने हे लिहीले असते तर कदाचीत समजाचा एक मोठा हिस्सा ह्यापासून दुर्लक्षीत राहीला असता.. शिवाय ह्या दरम्यान संविधान घडवणाऱ्या कमीटीमधे अनेक बदल होत गेले. काही सदस्य गैरहजर असायचे, काही निर्वतले इ.. पण आंबेडकरांनी हे निर्धाराने पूर्ण केले. …. …. तर हे सारे मी तिकडे मांडले. आंबेडकरांचे योगदान मांडले.. आयडीया ही होती की सत्य लोकांसमोर यावे. आणि त्या त्या व्यक्तिला रास्त आदर मिळायला हवा..

ह्यावरून विशिष्ठ वर्गाला खूप त्रास झाला आणि इतक्या छोट्या ग्रुपवर ट्रोलींग चालू झाले. “ते एकटे नव्हतेच ना.” “सर्वांचा सहभाग होताच.” मग “कॉनग्रेसने बहुजन वोटबँकसाठी खेळलेले हे कार्ड आहे” इथपासून ते “आंबेडकरांपेक्षा श्रेष्ठ अनेक विधीज्ञ देशात होते ज्यांना मुद्दाम डावलले” इ. हे असताना मी मला जमेल तसे मत मांडतो होतो. त्यावेळेस मी एकदा म्हणालो “आपण हे देखील मान्य करू की त्यांनी अगदी एकहाती, एकट्याने लिहीले नाही संविधान. पण लिडरशीपला खूप महत्व असते. सर्वांना सामावून घेऊन इतक्या मोठ्या टीम कडून हे काम करणे आणि ते वेळेत यशस्विरित्या पूर्ण करणे हे देखील सोपे नाही. शिवाजी महाराजांनी काय एकट्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केले का?? अनेक मातब्बर सरदारांची, असंख्य मावळ्याची त्यांना साथ होती. तानाजी, बाजीप्रभू, येसाजी, जीवा महाला अनेक नावे आहेत ज्यांचे हिंदवी स्वराज्यात मोलाचे योगदान आहे. खरेतर ह्यांना काढून आपण शिवरायांचा इतिहासच कळू शकणार नाही. पण आपण म्हणताना हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनीच केली असे म्हणतो ना? फोटो लावताना, सत्कार करताना?” अशा आशयाचे वाक्य पोस्ट केले आणि तितक्यात मला फोन आला एका क्लायेंटचा.. तो बराच वेळ चालला आणि संध्याकाळी आम्ही सारे गेलेलो शिरोड्याच्या समुद्रकिनाऱ्यावर.. दरम्यान मी व्हाटसॅप पाहीलेच नव्हते..

शिरोड्याला रात्री जेवायला बसलो आणि मला एक फोन आला. अत्यंत ऍरोगंट आवाज, “विनय सामंत बोलतोय का?” .. “तुला काय माज आलाय का रे?? तुझी हिम्मत कशी झाली आमच्या महाराजांना असे म्हणायची??”

मला अधी कळले नाही.. मी म्हटले “कुठल्या महाराजांना मी काय म्हणालो?”.. मला कळेना की मी नक्की कुठल्या राजाला काय बोललो की एखाद्या अवतारी पुरूषाला बोललो की नक्की काय? त्यावर त्या व्यक्तीने त्याची ओळख सांगीतली. स्थानिक मराठा नेत्याचा तो मुलगा. वडील कोकणातील मोठ्या नेत्याचे एकदम खास. त्यामुळे ऍरोगन्स विचारूच नका.. त्याने तो दुपारचा व्हाटसॅप वरील विषय सांगीतला.. मग मला ट्यूब पेटली.. पण मी तर तेव्हाही महाराजांना काही बोललोच नव्हतो .. त्यामुळे मी म्हटले, तुमचा काही गैरसमज होतोय, मी काहीच वाईट बोललो नाहीये..

त्यावर त्या व्यक्तीचे म्हणणे : तुझी हिम्मत कशी होते आंबेडकर सारख्या बरोबरीने आमच्या महाराजांचे नाव घ्यायची? लायकी आहे का त्या आंबेडकरची? खेटराकडे उभी करण्याची तरी लायकी आहे का ह्या समाजाची? तू ब्राम्हण आहेस ना? भडव्या तुला कळत नाही कोणाची बाजू घ्यायची. आधीच त्यांना माज चढलाय.. लायकी नसताना डोक्यावर बसलेत. आरक्षण आणि एट्रोसिटी ने आधीच आपल्या लोकांची वाट लावलीये आणि तुझासारखे चार पुस्तके शिकलेले लोक ह्यांना डोक्यावर बसवता.. “

मी आधी न घाबरता उत्तर देत होतो. ह्यांना घाबरले आणि आधीच आवाज नरमला तर मग ऐकतच नाहीत.. आणि अगदी अंगावर आले असते तर कुणाशी बोलायचे, पोलिसात जायचे का असे आराखडे मी एका ठिकाणी मांडत होतो. ओळखी होत्याच..

आणि शानूने हाक मारली “बाबा जेवण थंड होतोय…” तो तेव्हा ५ वर्षाचा होता. नॉनव्हेज भरवायला त्याला बाबाच हवा, असे आमचे एकदम घट्ट होते.. एका क्षणात मी भानावर आलो..

आणि फोनवर आवाज “उद्या सकाळी मला येऊन भेट नाहीतर मी तुझा घरी येतोय आणि पुढे जे होईल त्याला जबाबदार तुझा तू…” … आता गेम झालेला होता.. मला तो माणूस माहीत होता. स्थानिक पोलिस स्टेशनला काहीच झाले नसते. साधी NC लागली नसती. उलट त्यालाच हिंट मिळाली असती. रातोरात एसपींपर्यत पोचणे जमवता आलेही असते, पण खूप फोन फिरवावे लागले असते, आणि अशा वेळेस प्रसंग चिघळत जातात. मी त्याचा वडीलांच्या मतदारसंघात रहायला होते. मला कधीही त्रास देणे त्यांना सहज शक्य होते.. आणि पोलीस काय २४ तास तुम्हाला सुरक्षा देऊ शकत नाहीत..

आधी हे तुमच्या लक्षात आले असेल की माझ्या गांधीगिरीचा भोxxx झाला होता आणि सारी हिम्मत गायब. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही सिंह असता.. पण जेव्हा परीवारावर येते तेव्हा सारी मर्दुमकी गळून पडते. माझा डोळ्यासमोर चित्र होते की जर ७-८ जण घरी आले आणि त्यांनी मला मारतानाच माझा बायकोबरोबर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला किंवा एखादा फटका मुलाला लागला तर माझा गांधीगिरीची ही किंमत मोजायची तयारी आहे का??

मी त्याला फोन केला .. घेतला नाही. व्हाट्सऍप ग्रुपवर मेसेजेस पाहीले. तिथे त्याने तीच धमकी दिली होती. दोनअडीजशे मेसेजेस येऊन गेले होते आणि विवीध लोकांनी विवीध गोष्टी लिहील्या होत्या.. ४-५ जणांनी माझी बाजू देखील मांडली होती. शेवटी ह्याची ही धमकी होती. मी त्याला उत्तर टाकले की सकाळी ९ वाजता मी सावंतवाडी गार्डनमधे येतो.. अर्ध्या तासाने त्याने तो मेसेज वाचलाय ह्याची खात्री केली..

सकाळी मला दोन मित्रांचे फोन आले की जाऊ नको, काही होत नाही. पण मला माहीत होते की ह्यांना दारावर आणण्यात काही अर्थ नाही. घरी काही सांगीतले नाही. मारतील कदाचीत, पण मारून टाकणार नाहीत इतकी मनाची समजूत घातली होती.. कसा प्रवास असतो पहा मनाचा … एकदा भिती तुमच्या मनात आली की तुमचे खरे भेकड, डरपोक स्वरूप कसे प्रकटते ते पाहण्यासारखे आहे.. गेलो गार्डनमधे.. ६ जण आले. दोन जण लांब ऊभै राहीले लक्ष ठेवायला.. आणि ४ जण आले. एकजण टिपीकल डोक्यावर भगव्या रंगाचा टिळा.. अंगात सदरा .. मला फोन करणाऱ्याने मला ओळख विचारली. मला बोलला “बसा” … मी पहील्यांदा त्याच्या तोंडून आदरार्थी ऐकले.. थोडा.. अगदी थोडा धीर आला.. मला समजवणीच्या सुरात कालचाच विषय सांगीतला.. वरून हे सांगीतले .. “आम्ही हिंदू धर्म आणि शिवरायांसाठी आयुष्यावर, करीअरवर पाणी सोडून संघटनेचे काम करतोय. तुम्ही चुकीच्या लोकांच्या प्रभावाखाली आहे. मी सांगतो ती पुस्तके वाचा म्हणजे तुम्हाला खरे काय ते कळेल. तुमच्या सारख्या ब्राम्हण लोकांनी ह्यांना समान हक्क मिळवून दिले. नाहीतर ह्या लोकांची लायकीच नव्हती. आणि हे लोक आपला धर्म बुडवणार. फक्त ब्राम्हण आहे म्हणून तुला काही करत नाही. नाहीतर पायाने चालत घरी गेला नसतास.. ” … तसेही माझात त्यावेळी त्याला कुठले तत्वज्ञान सांगायची हिंमत नव्हती आणि ताकदही नव्हती.. फक्त आजू बाजूला पहात होतो. काही लोक लांबूनच फेऱ्या मारत होते, पण लक्ष पूर्ण आमच्याकडे होते. तितक्यात तो भगवा टिळा वाला धर्मरक्षक आला आणि बोल्ला, “चल भाई. बास झाले” आणि ते सारे २ मिनीटात गायब झाले.. एकूण १० मिनीटांचा प्रसंग असेल हा… काय अनुभवले ते शब्दात नाही सांगता येणार.. तितक्यात एक माणूस आला आणि बोलला “तुला मारले का? किंवा धमकी दिली का? अजिबात घाबरू नको. आमचे लक्ष आहे. तुला धक्का लागायला देणार नाही..” मी त्याला विचारले की तुम्ही कोण.. पण त्यापूर्वीच तो गेला.. मला खरेच उठायला आणि ह्या साऱ्यातून सावरायला ५ मिनीटे लागली. नमिताला फोन केला की घरी काय परीस्थिती … सारे नॉर्मल होते.. तसाच मंदीरात गेलो. देवाला नमस्कार केला आणि मग घरी गेलो.. बराच वेळ मुलाला घेऊन बसलो होतो…

त्या दिवशी कळले : शिवाजी, गांधी, फुले, भगतसिंग जन्माला येतात. हिरोगिरी करून त्यांची नक्कल करता येत नाही. आपली लायकी नाही. त्या दिवशीपासून मी फक्त ह्यांना मनोमन नमस्कार करतो. अनुकरण करण्याचा प्रयत्न करत नाही!

Leave a Reply