You are currently viewing कसे असावे जीवन!

कसे असावे जीवन!

मी स्वत: एका सामान्य मिडलक्लास कुटुंबामधून आहे. आई शासकीय कर्मचारी (ESIC) आणि वडील इलेक्ट्रीशीअन (आधी एका कंपनीत आणि नंतर सामान्य इलेक्ट्रीशीअन). शिवाय वडीलांना दारू, जुगार सारखी व्यसने असल्याने घरात टिपीकल गिरणी कामगार ड्रामा परीस्थिती होती…

मी शाळेत असताना हुशार होतो, ७वी ची स्कॉलरशीप घेतलीये. शाळेत अनेक प्रशस्तीपत्रके मिळवली आहेत. आदर्श विद्यार्थी पुरस्कार घेतलाय. पण १०वी मार्क खूपच कमी पडले. ८२.५७%. शालेय जीवनातले सर्वात कमी मार्क्स. डिप्लोमा मेकॅनिकल ला पेण सारख्या ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतनमधे ऍडमिशन घेतली कारण डोनेशन साठी पैसे नव्हते. पेणला तेव्हा कॉलेजची इमारतच नव्हती. आमचा सिलॅबस आयटीआय व इंजीनिअरींग कॉलेजच्या खोल्या भाड्याने घेऊन पूर्ण झालाय. १९९८ साली डिप्लोमा झालो. कसाबसा फर्स्टक्लास मिळाला. पण इंजीनिअरींगला ऍडमिशन शक्यच नव्हते. आईने खूप खस्ता खाऊन डिप्लोमा कसा पूर्ण करून घेतला ते पहात होतो. त्यामुळे तिचे आणखी हाल करून इंजीनिअरींग करायची इच्छा देखील नव्हती… काही कंपन्यांमधे इंटरव्हू ट्राय केले आणि किर्लोस्कर च्या एका सिस्टर कंसर्न कंपनीत नोकरीचा कॉल आला. ही गोष्ट असेल १९९९ मधे एका गुरूवारची… आणि त्या दिवशी मी माझा एका मामाला भेटायला गेलो होतो. ठाण्याला रहायचा. ग्लॅक्सो कंपनीतून रिटायर झाला होता.. त्याचे नाव बाबामामा (सदाशिव सामंत)

हा माझा आयुष्यातील टर्निंग पॉइंट. ह्या पूर्वी शिवाजी महाराज ते महात्मा गांधी, विवेकानंद अनेकांचे चरित्र वाचलेत, प्रेरणा उधार घेतलीये आणि प्रत्यक्ष काही होत नाही, असा माझा अनुभव आहे. बाबामामा ने मला प्रेरणा बिरणा दिली नाही. बाबामामाने मला असे काही फॉर्मुले/उत्तरे मला दिली की त्यानंतर माझे आयुष्य बदलतच गेले. मी व्यवसायात आलो, स्वत:ची आयटी कंपनी काढली. वयाच्या २७व्या वर्षी माझी स्कोडा गाडी होती. डोंबिवलीमधे स्वत:चे रोहाऊस, गावाला घर, एक जमीन, दोन गाड्या, ९ देश फिरलो. २ देशात कंपन्या फॉर्म करून झाला. एक्सपोर्ट पासून ते शासकीय पर्यंत विवीध व्यवसाय झाले. सध्या मी आषाढी व्हेंचर्स नावाची जगातील पहिली सोशल स्टार्टअप कंपनी चालवतो. ह्या सगळ्याचा शिल्पकार, माझा ओल्या मातीला आकार देणारा वेडा कुंभार म्हणजे म्हणजे बाबामामा.. त्याचीच ही कहाणी!

 • पहिल्यांदा जेव्हा भेटलो बाबामामाला तेव्हा डोक्यात फिक्स होते की आईने खूप खस्ता खाल्ल्यात आणि आता आपण सारे सोडून तिला मदत करायला हवी. मिळेल ती नोकरी पकडून एकदा घरी मदत पोचवायला हवी. बाबामामाने मला इकडे एक त्रयस्थ भुमिकेतून विचार करायला शिकवले. बहुतेक वेळा आपला हा (गैर)समज अहंकारातून होतो. आपल्याला वाटते की आपण कुणीतरी सुपरहिरो आहोत आणि आपण एकदम सगळा गेम बदलू शकतो. पण असे कधीच नसते. ह्याचा प्रत्यय पहायचा तर स्वत:ला त्या गेममधून बाहेर काढून पहा. त्या क्षणी माझा अक्सिडेंट झाला, किंवा मी मेलोच तर मग काय माझे आई-वडील-बहीण सारे रस्त्यावर येणार का? की ते पण जीव देणार? प्रत्यक्ष असे काहीच होत नाही. प्रत्येकजण येइल तसे आयुष्य जगतच असतो. “तुम्ही नसलात (किंवा सक्षम नसलात) तर फक्त एकच आयुष्य नासते – तुमचे स्वत:चे!” .. हे जेव्हा तुम्हाला कळते तेव्हा तुम्ही सर्वात कठीण निर्णय घ्यायला शिकता. थोरा मोठ्यांची चरीत्रे वाचा. त्यानी घेतलेले अनेक निर्णय त्यांच्या जवळच्यांसाठी खूप वेदनादायक आणि धाडसी होते. त्यातून जवळच्या माणसांकडूनच विरोध होतो कारण त्यांना वाटणारी असुरक्षीतता. आणि परीणाम म्हणजे तुम्ही तुमची स्वप्ने सोडून देता आणि सरधोपट वाट पकडता.. आणि ४० वर्षांनी फक्त पश्चाताप! अर्थात हे मी तुम्हाला फिलॉसॉफीकल सांगतोय. तेव्हा मला देखील हे प्रिंसीपल कळले नव्हते..
 • बाबामामाने मला सांगीतले की आयटीमधील एक कोर्स कर. तेव्हा त्याच्या ओळखीत ISR नावाच्या इंस्टीट्यूटमधे AS/400 चा कोर्स होता. १२००० फी होती बहुतेक. इतके पैसे नव्हतेच. बाबामामाने सांगीतले की पैसे मी भरतो तू मन लावून कोर्स कर आणि मला टॉप करून दाखव, मी तुझा नोकरीचा देखील विषय सोडवतो. एक मात्र आहे की मी बाबामामाला १००% फॉलो करायचे ठरवले, आणि केले. घरच्या परीस्थितीचा विचार डोक्यातून काढला. आणि प्रचंड मेहनतीने तो कोर्स केला. मास्टर केला. मला त्याच इंस्टीट्यूटमधे फॅकल्टी म्हणून नोकरी मिळाली, लगेच. नंतर तिथे एक अमेरीकेतील प्रोजेक्ट आला, ज्यावर मला काम करायची संधी मिळाली इ. इ.
 • नंतर आले Y2K … आठवतो का हा शब्द आणि गोंधळ?? त्या दरम्यान माझा सारख्या एक्सपर्टना (आत्मस्तुती साठी क्षमस्व) खूप संधी होत्या. नेमकी एका प्रॉब्लेममुळे ISR बंद झाली. मी इतर इंटरव्हू देत होतो. बाबामामाच्या ओळखीत एक सदगृहस्थ होतो ज्यांच्या ओळखीने मला जपानमधे नोकरीचा कॉल आला. ६००००/- पगार होता. आईचे घोडे तर गंगेत न्हाले होते! सगळे खूष! इथे माझा आयुष्यात दुसरा टर्न होता…
 • मी बाबामामाकडे गेलो होतो. त्याची स्टाइल एक होती. तो संभाषणांची सुरूवात प्रश्नातून करायचा. एखादा विषय देऊन तुला काय वाटते… अशी.. आणि हे continuous assessment सारखे होते. तुम्ही कुठलेही मत कॅज्यूअली मांडू शकत नाही. तुमचे मतच पुढील प्रश्न बनून येऊ शकते. ते देखील लगेच असे नाही. भविष्यात कधीसुद्धा.. तर त्या दिवशी असाच विषय चालू झाला आणि फिरत फिरत आला “संधी” ह्या विषयावर.. “तुला जपानची नोकरी जॅकपॉट संधी वाटते का?” अशा आशयाची ती चर्चा होती. आणि त्या विषयाला पूर्ण फिरवत त्याने मला फरक समजावून सांगीतला “संधी” आणि “स्ट्रेंथ” मधला. माझात ती संधी मिळवायची आणि निभवायची क्षमता आहे म्हणून ती संधी माझापर्यंत आलीये. जर तसे नसते तर ती आली नसती आणि आली असती तर घेता आली नसती.. हे समजायला खूप कठीण आहे. पण संधी आणि क्षमता हे रथाची दोन चाके आहेत. योग्य क्षमता साध्य करून ती योग्य प्रकारे व्यक्त केल्यास योग्य संधी मिळतेच. हा फॉर्मुला तुम्ही तुमच्या करीअरमधे लावून पहा, अनेक कोडी सुटतील.. जेव्हा क्षमता नसताना संधी मिळते, किंवा जबरदस्ती किंवा वशील्याने किंवा लाचलुचपतीने, तेव्हा निर्माण होणारे रिझल्ट देखील त्याच प्रतीचे असतात. आणि क्षमता योग्य प्रकारे ओळखली नाही, किंवा तिला अहंकार, अतिमहत्वाकांक्षा, आगाऊपणा, गर्व, आळस ह्याची आवरणे चढली तर उत्तम संधी निसटतात व मग सुमार दर्जाच्या संधींवर क्षमता फुकट जाते…
 • सूज्ञांना हे कळले असेल की मी त्या दिवशी जपानची ऑफर सोडली व व्यवसायात यायचा निर्णय घेतला. बाबामामाने हे शिकवले की जर तू ह्या वयात अशी नोकरी मिळवू शकतो जिथे तुला ६०००० पगार मिळू शकतो, तर ती क्षमता दुसऱ्या कुणासाठीही वापरण्यापेक्षा स्वत:साठी वापर व स्वत:चा व्यवसाय चालू कर..
 • ह्या नंतर माझा आयुष्यात अनेक रोलरकोस्टर राइड्स आहेत. घरातून प्रचंड विरोध होता. सामंतांना व्यवसाय लाभत नाही इथपासून ते माझा पत्रिकेत पार्टनरशीपमधे धोका संभवतो, शनीची साडेसाती, मित्रांच्या संगतीने बिघडलाय इ. इ. अनेक गोष्टी झाल्या. अनेकांनी समजून काढली. ज्या आईने माझासाठी इतके केले तिनेच मला घरातून बाहेर काढले. दरम्यान कॅन्सरने वडीलांचे निधन झाले. मी जे करायचे ते करतच होतो. त्यामागचे माझे सूत्र होते सातत्य. २००५-०६ साली दुसऱ्या एका वेड्या माणसाबरोबर माझी मैत्री आणि नंतर पार्टनरशीप झाली. त्याचे नाव समीर आठवले. त्याचा सारखा कमिटेड आणि मेहनती माणूस मी आजवर पाहीला नाही. दुर्दैवाने काही कारणास्तव आमची पार्टनरशीप नंतर मोडली. परंत साधारण २०००-०१ साली जपानची सोडलेली ऑफर ते २००६ पर्यंतचे स्ट्रगल ह्यानंतर मी काही वळून पाहीले नाही. २००७ साली माझी पहिली गाडी स्कोडा ऑक्टाव्हिआ जिला मी आजही प्रेमाने एंजेल म्हणतो तिथून पुढे सगळा चढता ग्राफ आहे २०१२ पर्यंत
 • कमिटमेंट : हा शब्दाचा अर्थच मला बाबामामाने कळवला. तो ग्लॅक्सो नावाच्या कंपनीतून सिस्टीम्स मॅनेजर म्हणून रिटायर झाला. तो एक गोष्ट नेहमी सांगतो : जेव्हा ग्लॅक्सो कंपनी भारतात नविन होती तेव्हा (बहुतेक खूप पूर्वी १९९० च्याही आधीचे हे असावे..) .. ग्लॅक्सोमधे एक “तरूण गुप्ता” नावाचे सीएओ आले होते. आणि त्या वर्षी ग्लॅक्सोने १०० कोटीच्या धंद्याचे टारगेट घेतले. तरूण गुप्तांनी भारतातले सर्व सिनीअर, रिजनल व स्टेट मार्केटींग मॅनजर बरोबर मोठी मिटींग घेतली व सर्वांना सांगीतले की १०० कोटीचे टार्गेट जर ह्या वर्षात गाठले तर सर्वांना विवीध इंसेटिव्ह इ. ग्लॅक्सोचा पूर्वीचा व्यवसाय पाहता हे टार्गेट अडीजपट होते, जे तांत्रीक दृष्ट्या अशक्य होते. पण बरेचदा मोठ्या कंपन्या अशी exhaustive स्ट्रॅटेजी ठेवतात आणि पूर्ण ताकद आजमावतात. तरूण गुप्तांनी प्रचंड जोर लावला. देशभर दौरे, सतत फॉलोअप, सेमिनार्स, ट्रेनिंग आणि ग्लॅक्सो इंडीया अक्षरक्ष: ढवळून निघाली होती.. पेटून उठली होती हा जास्त चांगले शब्द प्रयोग होइल.. आणि वर्ष संपले.. शेवटच्या दिवशाच्या ऑर्डर कंपाइल करता ग्लॅक्सोने त्या वर्षी ९२ कोटीचा टर्नओव्हर केला! (त्या काळी संगणकाचा वापर मर्यादीत असल्याने सारे हिशोब वगैरे लावून फायनल फिगर हाती यायला आठ-दहा दिवस जायचे.) हा चमत्कार होता. तरूण गुप्तांना ह्या परफॉर्मन्सवर आशीया-पॅसिफीक लेव्हल ला प्रोमोशन मिळाले. ग्लॅक्सोमधे अनेकांना प्रोमोशन मिळाले, मोठे मोठे इंसेटिव्ह मिळाले. धमाल होती. ठरल्याप्रमाणे भारतातील सर्व मार्केटींग आणि इतर मॅनेजरीअल स्टाफची “सेलिब्रेशन मिट” ठरली. एका मोठ्या स्टार हॉटेलमधे हा समारंभ होणार होता. भारतातून सारे ऑफीसर्स लोटले होते. आणि रात्री ९:३० वाजता तरूण गुप्ता सर्वांना संबोधन करायला उभे राहीले. त्यांनी प्रथम सर्वांचे अभिनंदन केले. सर्वात जास्त सेल बुक करणाऱ्या मॅनेजर्स व सपोर्ट स्टाफचा आवर्जून उल्लेख करून सर्वांचे आभार मांडले. आणि मग असे काही घडले जे अनपेक्षीत होते… तरूण गुप्ता म्हणाले “आपण सर्वांनी एक वर्षात प्रचंड शक्तीप्रदर्शन करत हे ९२ कोटींचे उद्दीष्ट साध्य केले ते अचंबीत करणारे आहे. आणि मी ह्यासाठी तुमचा अनंत आभारी आहे. पण…. पण आपले ठरले होते १०० कोटी! मी स्वप्न पाहीले होते १०० कोटींचे. ते अद्यापही अपूर्ण आहे. जरी माझे आज प्रोमोशन झाले असेल, जरी आज तुम्हा सर्वांचे प्रमोशन झाले असेल, इंसेटिव्ह मिळाले असतील, तरी आपण सर्वांनी घेतलेले आव्हान अजूनही अपूर्ण आहे. म्हणून १०० कोटीची ही फिगर जोवर माझा ऑर्डरबुकमधे येत नाही, तोवर मी भाजी खाणार नाही.” त्या दिवशी तरूण गुप्तांनी ५स्टार हॉटेलमधे पानातील भाजी व डाळ बाजूला काढून ठेवली आणि नुस्ती रोटी खायला सुरूवात केली. त्याक्षणी त्या कॉन्फरन्स मधे असलेल्या प्रत्येक माणसाने ताटातील भाजी/डाळ बाजूला ठेवली. हे जगातील असे एकमेव सेलीब्रेशन जिथे लोक नुस्ती रोटी खाऊन परतले. बाबामामा सांगतो त्या दिवसानंतर ग्लॅक्सोमधे कँटीनला भाजी बंद झाली. लोकांनी डब्यात भाजी आणणे बंद केले. आणि १५व्या दिवशी ग्लॅक्सोच्या अकाऊंट्स डिपार्टमेंटने १०० कोटीचे टार्गेट पूर्ण झाल्याचे डिक्लेअर केले. सर्व मॅनेजमेंटने तरूण गुप्तांसाठी विशेष पार्टी आयोजीत केली ज्यात अनेक प्रकारच्या भाज्या होत्या म्हणे आणि त्या दिवसापासून सर्वांनी परत भाजी खायला सुरूवात केली. बाबामामा त्या मॅनेजर्सपैकी एक होता, ज्याने बिनभाजीची पार्टी अटेंड केली होती. त्यांची तरूण गुप्तांवर इतकी श्रद्ध होती की हे सारे टीममेट्स घरी देखील भाजी खात नव्हते.. तरूण गुप्ता काही शिवाजी महाराज नव्हते, की विवेकानंद नव्हते. मी आजवर ह्या माणसाचा फोटो देखील पाहीला नाही कधी. पण ह्या गोष्टीने माझा आयुष्याला अनेक कठीण प्रसंगात दिशा दिली आहे!
 • बाबामामा ब्रिज खेळायचा. आपल्याकडे स्थानिक पातळीवर हा खेळ मुंबरी म्हणून प्रसिद्ध आहे. बाबामामा नेहमी सांगतो, “आयुष्य हे ब्रीजच्या खेळाची सिरीज असल्यासारखे आहे. एकतर २री, ३री आली म्हणुन रडत बसायचे नाही. खेळायचे. एक्के/राजे आले आणि तुम्ही १३ हात केले त्यात काय? हा डाव नशीबाचा झाला. २री, ३री हातात असताना देखील तुम्ही किती चांगले खेळता ह्यातून तुमची क्षमता सिद्ध होते. तो खरा चँपिअन..” “दुसरे म्हणजे एका डावात अडकून चालणार नाही. चांगली पाने येऊदे की वाइट.. खेळत रहा. खेळलातच नाही तर पाने बदलणार नाही.” … मी चेस खेळतो. डोंबिवलीला धनेश श्रीखंडे सरांकडे काही काळ होतो. ते सांगायचे. कधीकधी एखाद्या प्याद्यावर खूप मोठा अटॅक लागतो. प्रतिस्पर्धी आपली सर्व शक्ती – उंट, घोडे हत्ती त्या प्याद्यावर एकवटतो.. आणि मग आपणही आपली सारी शक्ती त्याला वाचवायला एकवटतो.. अशा वेळी २ वेगळे पर्याय आहेत. एक तर प्यादे पुढे सरकवायचे. म्हणजे प्रतिस्पर्ध्याने लावलेला सारा अटॅक फुकट जातो. किंवा ते सोडून प्रतिस्पर्ध्याचे जिकडे दुर्लक्ष झाले अशावर लक्ष केंद्रीत करायचे. ब्रिज/चेस सारखे खेळ आपण काही प्रमाणात जीवनात आचरले तर खुप कोडी सुटू शकतात..
 • बाबामामा रिटायर होणार होता तेव्हा त्याला ग्लॅक्सो ने सेंडऑफ पार्टी दिली होती. त्यावेळी त्याला दोन प्रश्न त्याचा सिनीअर्सनी विचारले होते :
  • सातत्याने अनेक वर्षे तुम्ही तुमचे काम वेळच्यावेळी आणि दर्जेदार कसे करता??
  • तुम्हाला वाटते का तुम्ही एक सफल आयुष्य जगलात?
   वरील दोन प्रश्नांची जी उत्तरे बाबामामाने दिली ती मी तुमच्यासाठी इथे देतोय. शब्दांकन माझे आहे. पण आशय जसाच्या तसा आहे.
 • सातत्याने अनेक वर्षे तुम्ही तुमचे काम वेळच्यावेळी आणि दर्जेदार कसे करता? : मी रोज काम सुरू करण्यापूर्वी कामाचे A B C अॅनालिसीस करतो. काही कामे खरेच C प्रतीची असतात आणि काही A प्रतीची शोस्टॉपर! A प्रतीचे काम एखाद-दुसरेच पण ह्यांना वेळ आणि अटेंशन खूप लागते. तर C प्रतीची कामे खूप पण त्यांना खूप लक्ष द्यायची गरज नसते. अनेकदा ही कामे डेलीगेट देखील करता येतात. तर मी आधी असे कामांचे वर्गीकरण करतो आणि सर्वात प्रथम C प्रतीची कामे करायला घेतो. एकतर ही कामे पटापट होत जातात ज्यामुळे तुमचा हुरूप वाढतो आणि प्रेशर कमी होते. शिवाय ह्या दरम्यान अनेकदा “अचानक पण अर्जंट” कामे देखील येतात, जी देखील हातोहात संपतात. आणि मग तुमच्याकडे निवांत अर्धा दिवस बाकी असतो जेव्हा तुम्ही पूर्ण उर्जेने आणि लक्षपूर्वक A कॅटेगरी काम करू शकता. कुणी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. तसेही A प्रतीच्या काम वाल्याला माहीत असते की ह्याला वेळ लागणारच होता त्यामुळे त्यानेही तुम्हाला डिस्टर्ब केलेले नसते..
  आता तुम्हौ पहाल तर आपण सर्वजण नेमके ह्याच्या उलट करतो. सर्वात महत्वाचे व कठीण काम आधी घेतो. ते कठीणच असते त्यामुळे आपला हुरूप कमीच होत जातो. अडचणी वाढल्या की प्रेशर वाढते. तोवर इतर फॉलोअप चालू होतो. हे पण काम झाले नाही आणि बाकीची पेंडींग कामे त्यामुळे प्रेशर, चिडचिड, चुका वाढतच राहते. शिवाय आगंतुक कामे. अशाने A प्रतीच्या कामाची क्वालीटी देखील बिघडते. डिले आणि घसरलेली क्वालिटी अशाने काहीच साध्य होत नाही.. आणि वाइट म्हणजे हे प्रेशर अनेकदा लोक घरी देखील कॅरी करतात किंवा दुसऱ्या दिवशीसुद्धा..
 • तुम्हाला वाटते का तुम्ही एक सफल आयुष्य जगलात? : सफल आयुष्य म्हणजे काय ह्याची प्रत्येकाची आपापली व्याख्या आहे. बरोबर की चूक ही चर्चा नको करूया. कुणाला खूप श्रीमंत व्हायचेच, कुणाला प्रसिद्धी, कुणाला सुंदर बायको हवीये, कुणाला अध्यात्मिक समाधान. आणि ह्या साऱ्याच्या मागे पळताना तुम्ही सफल/समाधानी आहात का ह्या प्रश्नावर प्रत्येकजण स्तंभीत आहे. मला वाटते जीवनातील प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा पत्त्याच्या खेळासारखा आहे. रोज नविन पाने तुम्हाला वाटून येत आहेत. वेगळ्या संधी, वेगळ्या योजना, कल्पना.. आता तुम्ही तुमच्या आठवते तितक्या आयुष्याकडे वळून पहा.. आणि एक एक दिवस तपासा.. तुम्हाला वाटते का त्या दिवशी, त्या क्षणी तुम्ही जे वागलात ते बरोबर वागलात आणि आज जर नियतीने तो दिवस, तो क्षण परत जगायची संधी तुम्हाला दिली तर तुम्ही तो एग्झॅक्टली तसाच जगाल?? जर असे आहे तर तुम्ही नक्की सफल आणि समाधानी आहात. जर तुम्हाला वाटले की हा दिवस चुकला, वेगळे करायला हवे होते तर तुम्ही असफल आहात आणि असमाधानी सुद्धा.. जितके जास्त दिवस तुम्हाला अल्टर करावेसे वाटते तितके तुमचे असमाधान मोठे. आणि म्हणूनच येणारा प्रत्येक दिवस आपण पूर्ण क्षमतेने, पूर्ण उर्जेने, तक्रार न करता, यथार्थ जगलो तर आपण सफल आयुष्य जगलो असे म्हणूया..
 • माझा बाबामामा पूर्वायुष्यात खूप विचीत्र प्रसंगातून गेलाय. चाळीच्या खोलीतले जीवन जगलाय. भावंडांची शिक्षणे पूर्ण करून त्यांना फॉरेनला धाडलेय. लग्नानंतरदेखील अनेक आव्हाने आहेत जी मी अशी सोशल मीडियावर त्याच्या संमतीशिवाय डिस्क्लोज नाही करू शकत. पण एक खूप आव्हानात्मक नकारात्मक जीवनशैलीतून प्रचंड स्ट्रगल करत बाबामामा खूप सफल आयूष्य जगलाच, पण माझा सारख्या अनेकांच्या जीवनाला त्याने दिशा दिलीये. माझा जीवनात माझा आईनंतर आणि देवापूर्वी बाबामामाचे स्थान आहे.

Leave a Reply