You are currently viewing कर्म आणि भाग्य!

कर्म आणि भाग्य!

आटपाट नगर असते आणि त्याचा एक राजा असतो. त्याची राणी गर्भवती असते. तिला पहिली मुलगी होते. त्या रात्री तो तिच्या महालातून एका स्त्रीला जाताना पहातो. तिला थांबवून विचारतो, “तू कोण आहेस आणि काय करते आहेस?” .. ती सांगते की ती सटवी आहे आणि मुलीचे भविष्य लिहायला आली होती. राजा विचारतो, “काय लिहीलेस? चांगलेच काही लिहीलेस ना?” .. ती सांगते, “तुझा राज्यावर काही वर्षानी परचक्र येणारे ज्यात तुझा पराभव अटळ आहे. त्यामधे ही मुलगी कुणीतरी जंगलात पळवून नेईल आणि ती उरलेले आयुष्य हालाखीत घालवेल. ती आयुष्यभर गोधड्या विणेल आणि उपजिवीका करेल. पण तिला कधीच उपाशी झोपावे लागणार नाही!”… राजाला खूप वाईट वाटते. पण काय करणार ना?

पुढील वर्षी राजाला एक मुलगा होतो. परत त्याला सटवी दिसते. ह्या वेळेस ती सांगते, “तुझा राज्यावर काही वर्षानी परचक्र येणारे ज्यात तुझा पराभव अटळ आहे. त्यामधे हा मुलगा कुणीतरी जंगलात पळवून नेईल आणि तोही उरलेले आयुष्य हालाखीत घालवेल. तो आयुष्यभर हरणांची शिकार करून त्यांचे मांस/कातडी वगैरे विकून उपजिवीका करेल. पण त्याला देखील कधीच उपाशी झोपावे लागणार नाही!”… राजाला खूप वाईट वाटते. तो आपल्या राजगुरूंना हा प्रसंग सांगतो. पण कुणाकडेच काही पर्याय नसतो…

आणि तसेच होते.. परचक्र येते ज्यात राजाचा दारूण पराभव होतो. राणी आपल्या दोन्ही मुलांना आणि अंगरक्षकांना घेऊन जंगलात पळून जाते. पण शत्रू तिचाही पाठलाग सोडत नाहीत. ती मुलांना जंगलात दोन ठिकाणी लपवते जी नंतर जंगलातील टोळ्यांच्या हाती लागतात. इकडे राजा आणि राणी दोघेही मारले जातात. ती मुलगी जंगलातील एक म्हातारी वाढवते. तिला गोधड्या बनवायला शिकवते. ती ह्या गोधड्या बनवून विकायची. तिला कशाबशा एका गोधडीचे ३-४ तांब्याची नाणी मिळत असत. ज्यामधे तिचे केवळ पोट भरण्यापुरतेच भागायचे. राजपुत्र एका पारध्याच्या घरी वाढतो जिथे तो पारध शिकतो. तो रोज शिकार करायचा आणि मांस/कातडे इ. विकून पोटापुरता चरीतार्थ चालवायचा. दोघे भावंड हळूहळू मोठी होतात..

एकदा राजकन्या गोधडी विणत असताना एक योगी तिकडे येतात. हे ते मूळ राजगुरू असतात. त्यांना ती मुलगी मूळ कोण हे माहित असते. ते तिची विचारपूस करतात आणि तिला सांगतात, “तू आज जी गोधडी बनवते आहेस ती १ सुवर्ण मोहरा मिळल्या शिवाय विकायची नाही” .. ती मुलगी नम्रपणे म्हणते, “अहो इतक्या महाग कुणी घेणार नाही गोधडी” .. योगी तिला सांगतात, “फक्त मी काय सांगतो ते ऐक आणि करून पहा” … बिचारी सकाळपासून बाजारात बसलेली असते. दिवस भर अनेक गिऱ्हाइके येतात. नेहमी २-३ तांब्याची नाणी देणारे आज १० नाणी द्यायला देखील तयार असतात. पण ही योगींनी सांगीतल्या प्रमाणे एक सुवर्णमुद्रावर अडून बसते. शेवटी सुर्यास्त झाल्यावर एक व्यापारी अचानक येतो आणि एक सुवर्णमुद्रा देऊन गोधडी घेते… राजकन्या आनंदी होते आणि योगींना धावत येऊन सारे सांगते. योगी तिला म्हणतात, “तुला आवडते ते सारे कपडे, खाणे विकत घे. ही सुवर्णमुद्रा आज पूर्ण खर्च करायची. एक तांब्याचे नाणे इतके देखील बाकी रहायला नको!” … ती म्हणते, “अहो महाराज मला ही महिनाभर पुरेल.. कशाला उधळपट्टी करु?” … योगी तिला परत सांगतात, “शंका काढू नको, फक्त सांगतो तितके कर” … ती सारी मुद्रा खर्च करते. छान कपडे घेते, सुग्रास अन्न जेवते. खूप आनंदी होते. दुसऱ्या दिवशी योगी महाराज तिला दुसरी गोधडी घेऊन बसायला सांगतात, पुन्हा तेच – किंमत एक सुवर्णमुद्रा.. त्या दिवशी देखील संध्याकाळी उशीरा दुसरा व्यापारी येतो आणि एक सुवर्णमुद्रा देतो. परत ती सारी मुद्रा खर्च करते. तिसऱ्या दिवशी तेच.. असे काही दिवस गेल्यावर योगी तिला सांगतात, “हे सुत्र लक्षात ठेव, रोज गोधडी महागच विकायची, ऐषोरामात रहायचे पण सारे पैसे संपवायचे. एक पैसा संचय करायचा नाही” … त्या मुलीचे आयुष्यच बदलून जाते..

योगी महाराज त्या राजपुत्राकडे येतात. बिचारा एखादा ससा तरी मिळेल म्हणून वाट पहात बसलेला असतो. योगी त्याला सांगतात, “मी फक्त सांगतो ते ऐक आणि कर. जोवर कस्तुरीमृग येत नाही तोवर शिकार करायची नाही” .. तो म्हणतो, “महाराज माफ करा पण ह्या जंगलात कस्तुरीमृग खूपच कमी आहेत. त्यासाठी थांबलो तर उपाशी मरावे लागेल” .. महाराज त्याला तेच सांगतात.. फक्त सांगतो ते करत जा.. उन्हे उतरताना अचानक कुठून तरी प्रकट व्हावा तसा कस्तुरीमृग त्याच्या समोर येतो. सहज शिकार होते. त्या दिवशी त्याला भरपूर धन मिळते. कारण कस्तुरीमृगाची खूप मागणी असते. त्याला देखील योगीमहाराज सांगतात की आजच्या आज सारे पैसे खर्च कर. तो ऐकतो. दुसऱ्या दिवशी परत कस्तुरीमृगच मारायचे… परत सारे धन संपवून टाकायचे.. काही दिवस गेल्यावर योगी त्याला देखील सांगतात, “हे सुत्र लक्षात ठेव, रोज कस्तुरीमृगच मारायचा. दुसरी शिकारच नाही. ऐषोरामात रहायचे पण सारे पैसे संपवायचे. एक पैसा संचय करायचा नाही” … आता त्या मुलाचे देखील आयुष्य पूर्णपणे बदलून जाते..

योगी महाराज आपल्या आश्रमात एका झाडाखाली छान ध्यान करत बसलेले असतात. समोरून एक अत्यंत थकलेली, जीर्ण झालेली स्त्री येताना दिसते. ती येऊन राजगुरूंच्या समोर हात जोडून उभी रहाते. ते तिला विचारतात की तू कोण आणि इकडे काय करते आहेस?.. ती म्हणते, “मी सटवी आहे” .. योगी महाराजांना आश्चर्य वाटते, “अगं तू तर साक्षात देवी. इतरांचे भाग्य लिहीणारी. तुझी ही अवस्था कशी झाली?”… त्यावर ती म्हणते, “महाराज तुम्ही राजकन्या आणि पुत्राला भेटला आणि त्यांना गुरूमंत्र दिला. आता मला रोज राजकन्येसाठी एक व्यापारी मॅनेज करावा लागतो जो एक सुवर्णमुद्रा देऊन गोधडी घेईल. आणि राजपुत्रासाठी रोज एक कस्तुरीमृग जन्माला घालावा लागतो आणि वेळेत तो राजपुत्राच्या समोर शिकारीसाठी आणायला लागतो. ह्यामुळे मी थकून गेले आहे!” …

हे सारे एका सोप्या वाक्यात : खुदी को कर बुलंद इतना की हर तकदीरसे पहले, खुदा बंदेसे खुद पुछे, बता तेरी रजा क्या है?

Leave a Reply