लहान मुले आणि संशोधक वृत्ती

दोन प्रकारे मला ह्याचे उत्तर देता येइल. हे मी माझा ८ वर्षाच्या मुलाबाबत करतोय तेच तुमच्या बरोबर शेअर करतोय.. पण तत्पुर्वी… सर्वात महत्वाचे आहे तुम्ही तुमच्या मुलाचे सातात्याने निरीक्षण करणे आणि त्याची आवड, कलात्मकता शोधणे..

संशोधक हा खूपच व्यापक शब्द आहे. लहान मुलांसाठी शोधक वृत्ती, सर्जनशीलता, तर्क, आकलन क्षमता, अभिव्यक्ती, स्मरणशक्ती व लिंकींग हे विषय महत्वाचे ठरतात. हे सारेच सगळ्याच मुलांमधे सगळे भरपूर असेल असे नाही. त्याचे बदलते प्रमाण आणि मिक्समॅचच तुमचे युनिक मुल असते! त्यामुळे ह्यातले काय महत्वाचे, काय मोठे असा विषय नाही. पण शोधक वृत्ती अनेक कलागुणांना मॅग्निफाय करायला खूप वाव देते. ती असायलाच हवी..

डॉक्टर, संशोधक तुम्हाला सांगतील की मुलांना चित्र, खेळ, निसर्ग, प्राणि दाखवा, ओळख करून द्या, माहिती द्या व मुले तुम्हाला प्रश्न विचारतील व शोधक वृत्ती विकसीत होइल. मी असे अनेक प्रयोग करून पाहीले पण तितकेसे यश मिळाले नाही. माझा मुलगा खूप चंचल आहे आणि अभ्यास सारखा विषय किंवा तुम्ही त्याला काही शिकवताय असे वाटले तर मग तो गायब! हे माझासमोर मोठेच चॅलेंज होते. ह्यातून मला एका गेमची आयडीया सुचली ती खालील प्रमाणे –

प्राणि ओळखा : पहिले म्हणजे हा खेळ आहे. त्यामुळे माझा मुलासारखा वांड कॅटेगरीतील मुलगा देखील सहज सामील होतो. काही मुले डल असतात पहा. त्यांना सहजपणे इतरांमधे सामील होण्यात वा टिपीकल खैळ खेळण्यात इंटरेस्ट नसतो. पण अशी मुले देखील ह्या खैळात लगेच सामील होतात आणि मन लावून खेळतात. ह्या खेळाची सुरूवातच गमतीदार आहे.. आपण एक प्राणि मनात पकडायचा. सोपा आणि मुलांच्या परीचयाचा.. आणि मुलांना सांगायचे प्राणि ओळखायला. एकदाच चुकू शकतो. बरोबर ओळखला तर चॉकलेट किंवा काहीतरी बक्षीस. आता प्राणि चुकू शकत नाही तर ओळखणार कसा ना? मग त्यांनी प्रश्न विचारायचे. प्राणि कसा आहे त्याचे. जमिनीवरचा की आकाशातला की पाण्यातला, शाकाहारी/मांसाहारी?, मोठा/मिडीयम/लहान, रंग, झाडावर चढतो का?, शेपटी आहे का? पाठ कशी आहे.. हे मी तुम्हाला सँपल सांगतोय.. तुम्ही मुलांचे ह्या विषयावर नॅरो डाऊन प्रश्न ऐका.. पहीले ३-४ प्राणि समजेपर्यंत वेळ जातो. पण साधारण ६-७ प्रश्नांमधे मुले प्राणि ओळखतात. आणि मुले प्राणि बरोबर ओळखतात ह्या पेक्षा ते प्रश्न विचारायला, पडताळायला, पुढला प्रश्न अधिक अभ्यासपूर्ण विचारायला शिकतात.. आणि हे तुम्ही बाकी कुठल्या प्रकारे शिकवू शकत नाही. ह्या खेळात तुम्ही मुलांना वर्गीकरण शिकवता, प्राण्यांचे गुणधर्म शिकवता, निसर्गाच्या जवळ नेता… ह्या खेळाचे आम्ही खूप व्हेरीएशन केले आहेत. फळे ओळखा, भाज्या ओळखा, जेवणारील पदार्थ ओळखा, गाडी ओळखा. हा खेळ मी ६ ते १२ विवीध वयोगटांत खेळलोय आणि दर वेळी धमाल व्हेरीएशन मिळतात..

एकदा मी सहज हॉटेलमधे बसलेलो आणि आमही (मी, बायको आणि शना) आम्ही हा खेळ खेळायला लागलो. त्या हॉटेलमालकाचा मुलगा गल्ल्यावर बसलेला तो ऐकत होता. आमच्या दोन राऊंड झाल्यावर तो थेट आला आणि म्हणाला मी पण खेळू. मला तर आनंदच झाला. धमाल म्हणजे माझा मुलगा, एक नंबर वांड, त्याने मुद्दाम कठीण प्राणी पकडला. ८ प्रश्न पण प्राणी कळेना. १० प्रश्नाला त्या मुलाने उत्तर दिले, प्राणि होता मुंगी! आणि आपण मोठे इतके डोळ्याला झापडे लावलेले असतो की प्राण्यांमधे किडे पण असू शकतात हे धरलेच नव्हते. त्यामुळे मी एकदापण त्याला विचारले नाही की पाय किती? त्या मुलाने ९वा प्रश्न विचारला की पाय किती. ह्याने सांगीतले ६ आणि उत्तर मुंगी! त्या दिवशी त्या मुलाला चॉकलेट देताना मला इतका आनंद झाला होता की विचारू नका!

स्मरणशक्ति : असाच एक खेळ मी मुलांच्या ग्रुपबरोबर खेळतो. ह्यात एक मोठे कापड घ्यायचे आणि घरातल्या ५० नॉर्मल वस्तू त्यावर पसरून ठेवायच्या. आणि मुलांना बोलवायचे. त्यांना त्या पहायला लावायच्या. एक मिनीट. आणि दुसऱ्या खोली जाऊन किती वस्तुंची नावे येतात ते कागदावर लिहायला लावायचे. कितीही हुशार मुलगा असला तरी साधारण ३०-३२ नावे येतात..

आता मुलांना परत बोलवायचे आणि सांगायचे की वस्तु लक्षात नका ठेवू. ग्रुपींग करायला शिका. म्हणजे पेन, पेंसील, रबर दिसले तर तो अभ्यास ग्रुप, घड्याळ-टाय-स्टॅपलर तर तो बाबाचा ग्रुप, पीन-क्लिप सारख्या गोष्टी आइच्या, सुरी-काटे-चमचे किचन ग्रुप असे तुम्हाला वाटतील तितके ग्रुप्स करा.. पण ग्रुप लक्षात ठेवा वस्तू नाही. आणि आता वर ग्रुपची नावे लिहायची आणि खाली आठवतील त्या वस्तू.. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मुले ४२-४५ वस्तू सहज लिहीतात..

केवळ स्मरणशक्ती उपयोगी नाही. चॅनलाइज कशी करायची हे कळले तर अधिक बरे नाही का??

शब्दांच्या भेंड्या : असेच मुलाचा शब्दसंचय वाढावा म्हणून मी त्याच्या इंग्रजी शब्दांच्या भेंड्या खेळतो. पण शब्द सारे ४ किंवा ५ अक्षरांपेक्षा जास्त मोठे हवे. आणि कॉर्नर करतो. म्हणजे मुद्दाम एकच अक्षर परत परत त्याच्यावर आणायचे. अशाने तो पण हे शिकतो की एका एका अक्षरावरील शब्द कसे वाढवायचे आणि तो पण असे शब्द मुद्दाम शोधतो की त्याला आपल्याला कॉर्नर करता येइल.. म्हणजे फक्त शब्दाची सुरूवात महत्वाची नाही, शेवटपण महत्वाचा…

शेती : हा उद्योग मी कोरोना काळात केला. घरी होतो. मुलगा पण कंटाळलेला. मग त्याला म्हटले की चल आपण झाडे लावू. अशा प्रकारची की आपल्यालाच भाजी खाता यायला हवी. मग ऍमेझॉन वरून ५० बियांचे पॅक मागवले.

५० प्रकारच्या भाज्यांच्या बिया मिळतात. आधी त्याला वर्गवारी शिकवली. वेलवर्ग कुठला, मूळ वर्ग कुठला इ. त्याचा अर्थ काय, का असे म्हणतात. मग त्याला खूप सारे जेवणाचे डबे वगैरे आलेले होते ते धुवायला लावले. आधी तयार नव्हता. मला म्हणाला “हे मोलकरणीचे काम मी का करू??” मग त्याला समजावले की आपल्याला हा प्रयोग पूर्ण करायचा ना? मग ह्याला लागणारे सारे जे लागेल ते करायचे. आणि कुठलेच काम हलके नसते. ३०-३२ डबे धुतले साहेबांनी.

मग त्याला कोकोपिट आणि लेंडीखताचे पॉटींग मिक्स्चर बनवायला सांगीतले. लेडींखत म्हटल्यावर पुन्हा आमची गाडी अडलेली. पण माझा मते ह्या संधी असतात तुम्हाला तुमच्या मुलाशी बोलायच्या, त्याला शिकवायच्या, त्याचा अधिक जवळ जायच्या.. केले मग आम्ही पॉटींग मिक्सचर.. आणि रुजत घातल्या बिया.

प्रत्येक डब्यावर त्या त्या भाजीचे नाव लिहायला लावले. अक्षर विचारू नका.. मग त्याला चार्ट बनवायला शिकवला. आणि रोज पाणी कसे शिंपडायचे कुठले बी सर्वात आधी आले, कोण आळशी ह्याची नोंद कशी करायची हे दाखवले. ४-५ दिवस धमाल होती. पण त्यानंतर आमच्या शेतीवर परचक्र आले. …

आवारातल्या खारी, रॉबिन्स आणि घरी पाळलेला ससा ह्यानी दोन दिवसात साऱ्या उगवलेल्या रोपट्यांचा फडशा पाडला.. तरी आम्ही शेतकऱ्यांनी परत एकदा लागवड करायचा प्रयत्न केला पण रॉबिन्स खूप चलाख. त्यांनी दुसऱ्यांदाही प्लॅन मोडला.. आणि त्यात त्याला आमच्या सशाची साथ होती. घरका भेदी.. पण ह्या दरम्यान मी आणि मुलाने खूप धमाल केली..

Leave a Reply