हे आहे माझा डोंबिवलीच्या घरा समोरील औदुंबरचे झाड. केवळ ८-९ वर्षे वय असेल, पण चांगलेच मोठे झाले आहे. माझी आई गुरुमर्गत आहे. ती जाते तिकडे औदुंबर येतोच. गावी पण आले आहे एक झाड. पण जोवर आपण झाडाची मुंज करून (म्हणजे झाडावर संस्कार करून) त्याचे विधिवत पूजन करायला सुरुवात करत नाही तोवर त्यात देवत्व आलेले नसते. त्यामुळे कुठलाही किंतू मनात न बाळगता ते झाड तोडायला हरकत नाही. जर तुम्ही त्याची पूजा केली असेल तर मात्र योग्य अधिकारी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या…
दुसरे एक सांगितल्या शिवाय राहवत नाही. वड, पिंपळ, औदुंबर सारख्या काही वृक्षांना महावृक्ष म्हणतात. जीवन साखळी मध्ये ह्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवळ ऑक्सिजन निर्मितीच नाही तर पाखरे, किडे, छोटे प्राणी ह्यांच्या असंख्य पिढ्यांचे ते अधिवास असते. तुम्ही तुमचे अधिवास बांधताय हे खरे, आणि आनंदाची गोष्ट आहे, पण हे करताना इतर अनेक जीव विस्थापित व्हावे का? जमल्यास ते झाड राखून त्याच्या भोवती किंवा बाजूने घर बांधता येऊ शकेल का असा विचार करून पहा. किंवा हे झाड असलेला प्रदेश देवघर म्हणून राखून ठेवता आला आणि उर्वरित भागात घर बांधता आले तर? अशाने त्या निसर्गातील अनेक जीवांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि तुम्ही बांधत असलेली वास्तू अजूनच समाधानकारक असेल असे वाटते. ह्याचा अध्यात्म, पाप पुण्याशी काही संबंध नाही. व्यवहारात आपल्याला अनेक गोष्टी अशा कराव्याच लागतात ज्याची अध्यात्मिक उकल वेगळी असू शकते. मला तुम्हाला त्या धर्मसंकटात पडायचे नाही. पण आपण सारे एकूणच ज्या जीवन साखळीचा भाग आहोत तर कुठेतरी ही जाणीव असायला हवी आणि जमली तर जपायला हवी…
४ पदरी कोकण महामार्ग जेव्हा बांधला तेव्हा झाराप, जे माझे आजोळ, त्या गावच्या नाक्यावर असलेले एक मोठे झाड तेव्हा तोडले. ही झाडे खूप जुनी, म्हणजे माझा लहानपणी २५-३० वर्षापूर्वी त्यांच्यावर खेळतोय इतकी जुनी आहेत. त्यांना २ माणसे देखील मिठी मारू शकत नाही असा त्यांचा रुंद बुंधा होता. विकासाच्या कल्पणेपोटी ती माणसाने तोडली. अनेक झाडे अशा प्रकारे तोडली. मी त्या वेळी हजर होतो. असंख्य पक्षी जो.कोलाहल करत होते तो आजही ऐकू येतो. काळजाला चिरा पडणारा आवाज होता तो. ह्याच पक्षांची रम्य किलबिल ऐकत कोकणात लहानपण गेले. पण तो आवाज विसरू शकत नाही. त्यांचे अनेक पिढ्यांचे घर नाही, विश्व उध्वस्त झाले होते… त्या रात्री जेवणही गेले नाही. एकच प्रश्न तेव्हाही सतावत होता, आजही उत्तर नाही – काय करून ते इतके जुने झाड परत निर्माण करू शकतो?? जे तुम्ही बनवू शकत नाही, ते मिटवण्याचा अधिकार तुम्हाला नाही असे मला वाटते..