कर्ज हा ट्रॅप आहे!
सामान्य माणूस मुख्यत्वे गृहकर्ज, वाहनकर्ज ही दोन कर्जे घेतो. हल्लीच्या काळात Zero Down Payment आणि क्रेडीट कार्ड EMI सारख्या गोष्टी उपलब्ध झाल्याने कर्जाचे प्रमाण वाढतच चालले आहे ज्याचा फायदा अर्थसंस्थांना होतो. पण कर्ज काढणे चुकीचेच. कर्ज काढणे ही मिसमॅनेजमेंट आहे. मुख्यत्वे मराठी माणसावर झालेल्या संस्कारानुसार नोकरी लागली की आधी तो गृहकर्जासाठी अर्ज करतो. काही वेळेस थोडे सेव्हींग करून डाऊनपेमेंट करून गृहकर्ज काढले जाते. नवरा-बायको मिळून एकाचा पगार EMI साठी तर दुसऱ्याचा घरखर्चासाठी असेही प्लॅनिंग करतात… लग्नात देखील मुलाचे स्वत:चे घर आहे का किंवा बुक केले आहे का हे पाहिले जाते… हे सारे खूप विचीत्र आणि चुकीचे आहे..
समाजातील यशस्वी लोक पहा. सिने कलाकार, खेळाडू, व्यवसाईक. हे सारे मुंबई-पुणे सारख्या ठिकाणी भाड्याने राहतात. पेईंग गेस्ट पासून शेअरींग पर्यंत सारे प्रकार करतात. आणि ४५-५० नंतर स्वत:ची घरे घेतात किंवा बांधतात. कर्ज काढून फेडत बसत नाही. मराठी माणसाचे उमेदीचे सारे आयुष्य गृहकर्ज फेडण्यात जाते. आणि हे फेडताना कर्ज घेतल्याचे दुप्पट किंमत तुम्ही फेडत असतात.. आयु्ष्यभर मरमर करून सारा पैसा बँकेत घालत असता. अनेक प्रतिथयश लोक प्रिमीअम एरीआमधे भाड्याने घरे घेऊन राहतात, दुकाने घेऊन व्यवसाय करतात. पण आपल्याकडील “लिक्विड कॅश” घरात/प्रोपर्टीमधे अडकवत नाही की कर्जाच्या विळख्यात फसत नाहीत..
गृहकर्ज आणि इतरही कर्जांच्या बाबतीत अजून एक गोष्ट म्हणजे पहिलया काही वर्षाच्या हफ्त्यांमधे व्याजाची रक्कम जास्त आणि मुद्दल कमी असते. मुळात तुम्ही १५ वर्षे कर्ज फेडत बसणार ह्या गृहितकावर ही रचना असते. पहिले ५ वर्षे हफ्ते भरल्यानंतर देखील मूळ मुद्दल फक्त २०% च कमी झालेले असते. अशात जर तुम्ही डिफॉल्ट झालात तर भयंकर मोठे नुकसान होते. बँक फ्लॅट ताब्यात घेऊन त्यांच्या मर्जीने ऑक्शन करते. त्यातून डिफॉल्टची रक्कम, पूर्ण मुद्दल, दंड, प्रोसेसींग चार्जेस इ. सारे वसूल करते…
हेच उलट प्लॅनिंग करून करता येते, जसे बहुतेक यशस्वी लोक करतात. हे लोक प्लॅन करतात की आपल्याला अमुक गाडी किंवा घर घ्यायचे आहे. मग त्यासाठी पैसे मिळवतात, जमवाजमव करतात. भले त्याला ३-४ वर्षे लागो की १० वर्षे. पण जेव्हा तुम्ही ह्यासाठी प्लॅनिंग करून बँकेत पैसा साठवता तेव्हा तुम्हाला त्यावर व्याज देखील मिळते. किंवा एखाद्या स्किममधे वगैरे गुंतवले तर परतावा मिळतो. अशाने १००/- जमवायचे असताना कदाचीत ६०/- मधेच तुमचे काम झालेले असते. दरम्यान त्या प्रॉपर्टीची किमत वाढू शकते हे मला मान्य आहे, पण तुमचे उत्पन्न देखील वाढत असते. मुळात EMI चे प्रेशर नसल्यामुळे तणाव कमी असतो. शिवाय स्वातंत्र्य असते RELOCATE व्हायचे. किंवा दरम्यान इतर चांगला ऑप्शन उपलब्ध झाल्यास तिथे गुंतवणूक करता येऊ शकते..
व्यवसायाच्या बाबत तर कधीच कर्ज काढू नये. तुमची विक्री/नफा कधील पहिल्या दिवशी चालू होत नाही. पण इंटरेस्ट पहिल्या दिवशी लागू पडतो. व्यवसाईकांनी टर्म लोन कधीच घ्यायचे नसते. लागलीच तर CC/OD घ्या. पण टर्मलोन सारखी चूक नाही. व्यवसाय चांगला चालायला लागला आणि एक्सपांशन करायचे आहे, मोठी ऑर्डर प्रोसेस करायची आहे तर जरूर कर्ज घ्यावे. पण तशी स्टॅबिलीटी आणि कंफर्मेशन ताब्यात हवे. व्यवसाईकांनी कायम OD/CC घ्यावी आणि ते एकच अकाऊंट ठेवावे. ह्यामुळे येणारे पैसे लोन बॅलन्स करत राहतात.
व्यवसाईकांनी कर्ज काढून इंफ्रास्ट्रक्चर करू नये. शक्यतो आधी भाड्याच्या इंफ्रास्ट्रक्चरमधे प्रगती करावी व मग सेटअप विकत घ्यावे. व्यवसाईकांनी मशीन्स, टेक्नॉलॉजी, मार्केटींग, एक्सपोर्ट अशा ठिकाणी गुंतवणूक करावी..
व्यवसाईकांनी FD करायची सवय लावावी आणि त्यावर OD करून त्यातून खर्च करावे. ह्यामुळे क्रेडीट सायकल्स चांगल्या होतात..
कुठली कर्ज घेणे चांगले :
- शैक्षणिक कर्ज
- व्यवसाईकांसाठी CC/OD, FD-OD
- व्यवसाय वृद्धीसाठी कर्ज
- दुसऱ्या घरासाठी कर्ज/Asset Development : हा गमतीदार विषय आहे. तुमच्याकडे कर्जरहीत घर किंवा गाडी आहे, आणि तुमचा CIBIL चांगला आहे तर अशा वेळेस तुम्ही कर्ज घेतले पाहीजे. मग ते घरासाठी घ्या की गाडीसाठी. आणि ते घर/गाडी/प्रॉपर्टी घेतल्याक्षणी भाड्याने लावा. अशाने तुम्हाला ह्या असेट पासून उत्पन्न चालू होते. घर असेल तर त्याचे मूल्य वाढतच जाते. आणि भाडे वाढेल तसे तुमचा EMI चा ताण कमी होतो..
“आपल्याला चांगली नोकरी/उत्पन्न आहे, आता बिनधास्त कर्ज घेऊ शकतो” हा प्रचंड मोठा गैरसमज आहे. कोरोना मुळे अनेकांचे डोळे उघडले असतीलच. आणि स्वत:चे घर घेतले म्हणजे सेटल झाला हा दुसरा मोठा गैरसमज!