You are currently viewing दक्षीणमुखी वास्तू आणि पर्याय

दक्षीणमुखी वास्तू आणि पर्याय

केवळ हिंदूच नाही तर जगातील सर्व धार्मिक मान्यतांनुसार पूर्व ही उगवतीची दिशा, तर पश्चिम मावळतीची, उत्तर/उर्ध्व ही इश्वराची सकारात्मकतेची दिशा तर दक्षीण/अधो ही नकारात्मकतेची, आसूरी शक्तींची दिशा आहे. सुदैवाने हे सारे सुर्याच्या उगवण्या मावळण्यावर अवलंबून असल्याने अख्खया जगासाठी ह्या दिशा नेहमी सारख्याच असतात. म्हणजे भारतातील पूर्व अमेरिकेत पश्चीम होत नाही ..

जर हे गृहितक मान्य असेल तर …

दक्षीण मुखी वास्तू (घर, दुकान, ऑफीस) घेतल्यावर त्या वास्तूचे तोंड नेहमी दक्षीण दिशेला असते. अशाने त्या वास्तूमधे सकाळी दरवाजा उघडताना, संध्याकाळी प्रार्थना करताना किंवा कुठलिही गोष्ट करताना आपण दक्षीण दिशेला तोंड करून करतो ज्यामुळे सकारात्मक उर्जेपेक्षा नकारात्मक उर्जेकडे आपली उपासना होते

– असा समज आहे!

तसेच प्रवेशद्वार दक्षीण दिशेला असेल तर ह्या नकारात्मक उर्जा त्यादिशेने थेट घरात प्रवेश करतात आणि नकारात्मकतेने सारे ग्रासून टाकतात. अशाने वास्तूमधे नैराश्य, आळस, दु:ख, कंटाळा ह्या भावनांना पोषक वातावरण असते

– असा समज आहे!

त्या दिशेने येणारा प्रकाश व वारा देखील निराशाजनक, नकारात्मक असतो

– असा समज आहे!

एकूणच अनेक समज-अपसमज-गैरसमज आहेत. ह्याला प्रतिवाद करता येईल असे अनेक मुद्दे आहेत, जसे की –

  1. एखाद्या अत्यंत निराश, नकारात्मक व्यक्तीला पुर्वमुखी/उत्तरमुखी वास्तूत ठेवले तर लगेच तो जीवनात यशस्वी होईल का?
  2. एखाद्या यशस्वी, सकारात्मक, धडाडीच्या व्यक्तीला दक्षीणमुखी घरात ठेवले तर लगेच तो अपयशी व्हायला लागेल का?
  3. दक्षीणमुखी वास्तूत गेले की अपयश आणि पूर्वोत्तर मुखी वास्तूत यश असा किती डेटा आहे?
  4. केवळ वास्तूची दिशा पूर्व/उत्तर असली तर नकारात्मक शक्ती इतर कुठल्याही प्रकारे वास्तूमधे प्रवेश करू शकत नाही का?

असे अनेक प्रतिवाद करत राहता येतील…

ज्याचा ह्या “थोतांडावर” विश्वास नाही त्यांना फरकच पडत नाही… पण ज्यांचा आहे त्यांना काय?? कारण नाहीतर हा प्रश्न पडलाच नसता आणि तुम्ही हे उत्तर वाचत नसता!

तर मी जेव्हा “आषाढी व्हेंचर्स” स्थापन केली तेव्हा मी अशा प्रसंगाचा परत सामना केला. आषाढीचे जुने ऑफीस, छोटासा गाळा होता, परफेक्ट दक्षीणमुखी. बिल्डींग बनून ८ वर्षे झाली पण तो गाळा विकला देखील जात नव्हता आणि कुणीच भाड्याने घ्यायला तयार नाही. मी आस्तिक आहे पण अशा गोष्टींमधे वहावत जात नाही. त्यामुळे मला हे भेडसावत नाही. मी तो गाळा घेतला ताब्यात आणि आषाढीचे कामकाज तिकडून चालू केले… खरे सांगतो, मला १५ दिवसातच काही खूप वाईट अनुभव आले. दोन ठिकाणी नुकसान देखील झाले. ह्याला योगायोग देखील म्हणता येईल. आमच्याकडे एक अपंग काकांना कामावर ठेवले होते. ते देखील सारखी कुरबूर करायचे की ह्या जागेत कंटाळवाणे वाटते, आजारी पडल्यासारखे वाटते. मी, माझी पत्नी आणि मुलगा आम्ही तिघांनीही तिथे काम केले आहे, आम्हाला कधी तसे काही वाटले नाही… पण लोक मुद्दाम चौकशा करत की दक्षीणमुखी गाळा घेतला कसा .. इ इ ..

ह्या सर्वांचा थोडा का होईना मानसीक परीणाम होतोच. मग आपल्याला देखील वाटू लागते की आपण विस्तवाशी खेळतोय का? मग एक छोटासा उपाय केला..

ह्याच गाळ्यात आम्ही चांगला व्यवसाय केला. आणि पहिले वर्ष संपता संपता आम्ही मोठ्या जागेत शिफ्ट झालो. ही सुबत्ता आम्हाला त्या गाळ्याने दिली. शिवाय आषाढीला एक बक्षीस मिळाले. आषाढीचे ३-४ उत्पादने तिथेच मार्केटमधे आली आणि यशस्वी झाली!

त्यामुळे मला हे सांगायचे आहे की, तुमचा विश्वास असो वा नसो, तुम्हाला योगायोग वाटो वा अनुभव.. ह्यावर पर्याय आहे.. आणि तो एकदम सोपा सरळ आहे. आपल्याकडे दोन मुख्य लढवय्या देवता आहेत – दुर्गा आणि मारूती. शस्त्रधारी आणि प्रखर! मुळात हा विषय आहे आपापल्या मनातील नकारात्मकता, निराशेचा आणि त्याचे कनेक्शन आपण बाहेरच्या संकेतांशी जोडतो. मग कुठे आपल्याला दक्षीणमुखी वास्तू दिसते, कुठे काळा रंग, कुठे एखादे काटेरी झाड, एखादा घुबडासारखा पक्षी.. जर ही नकारात्मकता मुळापासून नष्ट करायची असेल तर तिचा सामना अशा प्रखर शस्त्रधारी शक्तींशी घडवायचा…

जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल की आपल्या वास्तूमधे नकारात्मकता आहे, आजारपण आहे, प्रयत्नांना यश मिळत नाही, हातातोडाशी येऊन घास निसटतो, कुणाची वाईट नजर आहे त्यावेळेस प्रवेशद्वाराच्या थेट समोर पंचमुखी हनुमानाची शस्त्रधारी तसबीर लावायची. पुजा वगैरे करायची गरज नाही. प्राणप्रतिष्ठा करायची गरज नाही. ह्या शक्ती स्वयंसिद्ध आणि प्रखर आहेत. दोन्ही वायुतत्वाच्या आहेत. कुठेही तात्काळ उपस्थित होतात. हे फोटो लावा आणि सकाळ संध्याकाळ हनुमानचालीसा, संकटमोचन म्हणा त्या तसबिरीसमोर. तुमच्या समाधानासाठी अगरबत्ती धूप दाखवा. ८ दिवसात परीणाम पहा.

पंचमुखी हनुमानाची एक चांगली लिंक

चालीसा, अष्टक सारे ऑनलाईन म्युझीक आहे. मोठ्या आवाजात चालू करा आणि ऐका. आपसूकच पाठ होईल..

“को नही जानत है जगमे कपी, संकटमोचन नाम तेहारो” हे लक्षात ठेवा आणि विश्वास ठेवा..

असेच तुम्ही दुर्गेबाबत करू शकता. पण थोडे सोपस्कार करावे लागतात. नुस्ता फोटो चिकटवला असे करू नका. ती आदिशक्ती आहे. मातृस्वरूपा असली तरी थोडे योजनाबद्ध व्हायला हवे… त्याबद्दल परत कधीतरी बोलूया..

Leave a Reply